स्वर्गीय सूर निमाले !
अग्रलेख

स्वर्गीय सूर निमाले !

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

पंडित जसराजांच्या जाण्याने स्वर्गीय सूर निमाले आहेत. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीतात घराणी मानली जातात. तथापि मेवाती घराण्याचे नाव पंडितजींमुळे रसिकांना जास्त माहित झाले. त्यांचे सूर ऐकता ऐकता खरेच ब्रह्मानंदी टाळी लागल्याचा अनुभव रसिक श्रोते घेत असत. जसराजांच्या गायकीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण माणूस म्हणूनही ते तितकेच मोठे होते. कलाकार लहरी आणि विक्षिप्त असलाच पाहिजे असे समाजाने गृहीत धरले असावे. त्यामुळे अनेक कलाकारांच्या कलेपेक्षा त्यांच्या विक्षिप्तपणाचेच किस्से जास्त लोकप्रिय आहेत. अनेक मोठे मोठे कलाकार कुठल्यातरी लहरीपणाची सवय लावून घेतात. तथापि जसराज मात्र याला अपवाद होते.

त्यांचे व्यक्तिमत्व अगदी साधे होते. दर्दी रसिकांशी ते ज्या आपुलकीने संवाद साधत त्याच ममत्वाने किंबहुना त्यापेक्षा जास्त आपलेपणाने ते सामान्य माणसांना आणि त्यांच्या चाहत्यांना भेटत. नाशिककरांनीही त्यांच्या ऋजू व्यक्तीमत्वाचा अनुभव घेतला आहे. नुकतीच कृष्ण जन्माष्टमी साजरी झाली. तेव्हा जसराज यांनी गायिलेल्या ’ कस्तुरी तिलकम ललाटपटले, वक्षस्थले कौस्तुभम। या कृष्णस्तुतीची रसिकांना आठवण आली. ही स्तुती ऐकता ऐकता रसिकांच्या नजरेसमोर कृष्णाचे व्यक्तिमत्व उभे करण्याची ताकद त्यांच्या सुरांमध्ये होती.

संगीताविषयी बोलताना ते म्हणाले होते, ’ संगीत हे जीवन असेल तर जीवन सगळ्यांजवळच आहे. संगीत उपजीविका असेल तर ती देखील सगळ्यांकडेच आहे. संगीत हे प्राण असतील तर प्रत्येक सजीवांकडे तो आहेच. पण माझ्यासाठी संगीत या सगळ्यांच्या पलीकडचे आहे. माझ्यासाठी फक्त संगीत आणि संगीत आहे.’ त्यांच्या मैफिलीचे अनेक किस्से आज चर्चेत आहेत. गायिका बेगम अख्तर यांना जसराज अम्मा म्हणत. एकदा बेगम अख्तर जसराज यांच्या मैफिलीला गेल्या होत्या. त्या मैफिलीनंतर ’ मी जर लहान असते तर मी जसराज यांच्याकडेच गाणे शिकले असते’ अशी भावना अख्तर यांनी व्यक्त केली होती. सिमला येथील एका संगीत समारोहाची आठवण सांगितली जाते. जसराज यांचे गाणे सुरु झाले होते. त्याच समारोहात महेंद्र कपूर देखील कार्यक्रम करणार होते. त्यांचे मैफिलीच्या ठिकाणी आगमन झाले आणि रसिकांमध्ये चुळबुळ सुरु झाली. महेंद्र कपूर मंचावर गेले. जसराज यांच्या पाया पडले. माझ्या गुरूंचे गाणे ऐकण्याचे भाग्य मला लाभले’ अशी भावना कपूर यांनी त्या विशाल मैफिलीत जाहीरपणे व्यक्त केली होती.

पुण्यातील एका कार्यक्रमात जसराज यांच्याशी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी संवाद साधला होता. त्यावेळी जसराज म्हणाले होते, ‘हैदराबादमध्ये असताना एका कँटीन जवळच्या फुटपाथवर बसल्या बसल्या मला कधीतरी अख्तरीबाई (बेगम अख्तर) यांचे गाणे रेडिओवर ऐकायला मिळायचे. तेच माझे पहिले शिक्षण आणि तीच माझी पहिली शाळा होती. पंडित जसराज यांना ‘पदमविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. इंटरनॅशनल स्ट्रोनॉमिकल युनियनने मंगळ व गुरु या ग्रहांदरम्यान 2006 मध्ये एक छोटा ग्रह शोधून काढला होता. 2019 मध्ये याच ग्रहाचे नाव ‘पंडित जसराज लघुग्रह’ असे करण्यात आले. असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रीय गायक असावेत. असा शास्त्रीय गायक या सम हाच होतो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com