भारताचे स्वातंत्र्य चिरायू होवो !
अग्रलेख

भारताचे स्वातंत्र्य चिरायू होवो !

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

आज 15 ऑगस्ट 2020! भारत 73 वा वर्धापन दिवस साजरा करत आहे. यंदाच्या उत्सवावर तर्‍हेतर्‍हेच्या ताणतणावाचे सावट घोंगावत आहे. करोना संकट हे त्यातील अगदी अनपेक्षित उभी राहिलेली आपत्ती! त्यामुळे सर्वच उत्सवांचे स्वरूप अत्यंत मर्यादित ठेवणे भाग पडत आहे. स्वातंत्र्य दिवसही अपवाद नाही.

चीनचा आक्रमकवाद वाढत आहे. देशाच्या सीमा सतत अशांत ठेवण्याचा प्रयत्न चीनकडून नेहमीच सुरु असतो. भारताच्या शेजारी राष्ट्रांच्या राजकारणाचा तराजू सध्या दोलायमान झालेला आहे. श्रीलंकेचे नवनियुक्त अध्यक्ष चीनधार्जिणे असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या शेजारी राष्ट्रांमधील चीनचा वाढता प्रभाव भारताची दीर्घकाळ डोकेदुखी ठरू शकेल. आर्थिक मदतीच्या जोरावर भारताच्या सभोवतीच्या सर्व राष्ट्रांना आपल्या दबावाखाली ठेवण्याचे प्रयत्न वाढवत आहे. देशात किंवा देशाच्या सीमेवर काहीही अनुचित घडले तर बोट दाखवायला जागा पाहिजे, त्यासाठी भारताकडून पाकिस्तानला सतत ’लक्ष्य’ ठरवण्याच्या प्रयत्न राज्यकर्ते का करतात हे जनतेला न उमगणारे कोडे आहे.

देशांतर्गतही विविध आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत राज्यशकट चालवणे सोपे नसते. सगळ्या आव्हानांवर मात करत कारभार चालवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मूल्याधिष्टित स्वातंत्र्याची भावना कोट्यवधी लोकांमध्ये रुजवणे सोपे नाही. ही सतत चालणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. राजकीय वातावरण पुरेसे गढूळलेले आढळते. त्याचे अपरिहार्य परिणाम समाजावर होणे स्वाभाविक आहे. अनेक राज्यातील राजकारणाचे रूळ बदलत आहेत. आगगाडी रूळ बदलते तेव्हा थोडाफार खडखडाट होणारच! काही राजकीय व्यक्तिमत्व या परिस्थितीत भर घालणारी महत्वाची ’पात्रे’ ठरतात हे ही नाकारता येणार नाही. किंबहुना अशी पात्रे आणि त्यांचा अनिष्ट धिंगाणा सुद्धा वाढतच आहे.

दूरचित्रवाहिन्यांची संख्या वाढत आहे. चोवीस तास चालवण्यासाठी राजकीय बालिशपणाचे हास्यास्पद प्रदर्शन घडवले जात आहे. त्यासाठी मूळ मुद्दे बाजूला ठेऊन नको त्या विषयांवर चर्चा का घडवल्या जातात? हे ही जनतेला अनाकलनीय आहे. राजकीय पक्षांनी राजकीय परिपक्वता दाखवली आणि जनतेशी बांधिलकी जपली तर बालिशपणाचे प्रकार कमी होतील आणि राजकारणाला परिपकव भारदस्तपणा येईल. स्वातंत्र्याच्या 73 वर्षात देशाने बरेच काही मिळवले. पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर पोचणारा भारत हा पहिला देश ठरला. ’गगनयान’ मोहिमेची तयारी सुरु आहे. या मोहिमेंतर्गत 3 भारतीय अंतराळवीर 7 दिवस अवकाशात राहातील. ही मोहीम 2022 पर्यंत पूर्ण होईल असा प्राथमिक अंदाज आहे. वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा मुलांइतकाच हक्क आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने परवाच दिला आहे. देशात नवे शैक्षणिक धोरण जाहीर झाले आहे.

या धोरणात शिक्षणाची बदलत्या काळाशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तथापि समाजातील सतत वंचित राहिलेले घटक नव्या धोरणामुळे शिक्षणापासून वंचित ठेवले जातील अशीही भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे. हे धोरण खरोखरच अंमलात आले तर देश अमेरिका, जपान, चीन या देशापेक्षाही जास्त उंचीवर पोचेल असे धोरण निश्चित करणार्‍या नीती आयोगाचे म्हणणे आहे. नव्या धोरणाची वास्तवता या दोन्ही टोकांच्या भूमिकेच्या अधेमधे कुठेतरी असू शकते. त्याचा निर्वाळा जाणकारच देऊ शकतील. सर्वोच्च न्यायालयाच्या काही ताज्या निर्णयांनी देशातील धार्मिक सामंजस्य धोक्यात आणले आहे असेही मत अनेक नेते व समाजशास्त्रज्ञानी व्यक्त केले आहे. अशा अनेक समस्या जाणवत असल्या तरी उज्जवल भवितव्याबद्दलची उमेद वाढवणार्‍या घटनाही देशात सर्वत्र घडत आहेत.

करोना रुग्णांवर उपचार व मृतांवर अंत्यसंस्कार यासाठी समाज एकजूट दाखवत आहे. यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे अनेक सार्वजनिक मंडळांनी ठरवले आहे. राज्यातील अनेक गावांनी एकजूट करून करोनाला गावाच्या वेशीबाहेरच रोखण्यात यश मिळवले आहे. आजचा स्वातंत्र्य दिवसही समाज एकजुटीने साजरा करेलच. जनतेचा हा सुजाणपणा दिवसेंदिवस वाढतच राहील आणि देशाचे स्वातंत्र्य अधिकाधिक परिपक्व होत जाईल अशी आशा यामुळे जागी झाली आहे.

देशातील नागरिकांची आपल्या देशाबद्दलची व स्वातंत्र्याबद्दलची आस्था सतत वाढत जाईल. कधीकाळी भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व जगाला मान्य होते असे अभिमानाने सांगितले जाते. ते स्थान पुन्हा मिळवण्याचे कार्य करण्याची मानसिक, बौद्धिक क्षमता व जगाला गवसणी घालणारी महत्वाकांक्षा जागृत करणारे नेतृत्व देशाला यापुढेही सातत्याने मिळत राहो हीच आजच्या स्वातंत्र्यदिनी शुभकामना. भारतीय जनेतला स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा!

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com