Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखलोक समजदार होत आहेत !

लोक समजदार होत आहेत !

सार्वजनिक गणेशोस्तव जवळ आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोस्तव सुरु केला होता. आज कोरोनामुळे वेगळ्याच जनजागृतीची गरज आहे. ती ओळखून राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी त्याकामी पुढाकार घेतला आहे. कोरोनावरची लस सर्वसामान्य माणसांना उपलब्ध होण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल, तोपर्यंत गर्दी न करणे, एकमेकांमध्ये अंतर राखणे, तोंडाला मुसके बांधणे हे निर्बंधच कोरोनाला अटकाव करू शकतील, असे जाणकारांचे मत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव हा उत्साहाचा आणि गर्दीचा सण आहे. गणेश मंडळे विविध देखावे सादर करतात. देखाव्यांविषयी जनतेत उत्सुकता असते. गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत रस्ते गर्दीने ओसंडून वाहत असतात. गर्दी दरवर्षी नवनवा उच्चांक गाठत असते. गर्दीमुळे कोरोनाचा वेगाने फैलाव होऊ शकतो. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सार्वजनिक आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याचे अनेक मंडळांनी ठरवले आहे.

- Advertisement -

कोल्हापुरातील 300 पेक्षा जास्त गावे ‘एक गाव एक गणपती’ बसवणार आहेत. गणेशोत्सवाचा निधी कोरोनाग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी देण्याचे कोल्हापुरातील 100 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींनी ठरवले आहे. सोलापुरातील मंडळे सार्वजनिक मंडप उभारणार नाहीत. लालबागचा राजा या प्रसिद्ध गणेश मंडळाबरोबरच मुंबईची बहुतेक मोठी गणेश मंडळे आरोग्य उत्सव साजरा करणार आहेत. औरंगाबाद येथील अनेक गणेश मंडळे वर्षानुवर्षे एकच मोठी मूर्ती बसवतात. उत्सवानंतर या मूर्तींचे जतन केले जाते. यंदा या मूर्ती जिथे ठेवल्या आहेत, तिथेच त्यांची पूजा केली जाणार आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई अशा अनेक मानाच्या गणपतींची मंदिरातच प्रतिष्ठापना होईल. उत्सवात कोणतीही सजावट न करण्याचे नागपूरमधील मंडळांनी ठरवले आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये समाजातील हजारो उत्साही कार्यकर्ते काम करत असतात. सर्वांची समज सारखीच नसते. सगळे जण वर्षभर या उत्सवाची वाट बघत असतात. सार्वजनिक उत्साहाला आवर घालणे सोपे नसते. ते धारिष्ट्य मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी दाखवले आहे.

मंडळांच्या सामूहिक शहाणपणाचे हे सामूहिक प्रदर्शन कौतुकास्पद आहे. समाजात सकारात्मक बदल व्हावे, असे वाटत असेल तर त्याची सुरुवात आपणच करायला हवी; हे मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना जाणवले असावे. दहीहंडीचा उत्सवही साजरा करताना दहीहंडी मंडळांनी समाजभान दाखवले. दिवसेंदिवस समाजाचे शहाणपण वाढत आहे. समाजजागृतीच्या सरकारी धोरणांनादेखील हातभार लागेल. समाजाला दिशा दाखवणे हे आपलेच काम आहे, असा सरकारी सेवकांचा भ्रम असतो. कोरोनाचेही तसेच झाले असावे का? रोज फर्माने सुटत आहेत. मागेही घेतली जात आहेत. रोज नवे निर्बंध जाहीर होत आहेत.

काल घातलेले निर्बंध कोणते होते, हे किती जण सांगू शकतील? जे देश कोरोनाला हद्दपार करू शकेल, त्या देशांमध्ये एक गोष्ट समान होती. ती म्हणजे, त्या देशातील सरकार आणि जनतेत एकवाक्यता, समन्वय आणि परस्पर संवाद होता. असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे. राज्य सरकार हे लक्षात घेईल का? सार्वजनिक गणेशत्सवाच्या निमित्ताने जो सामूहिक समंजसपणा निर्माण झाला आहे, तो वाढतच जाईल; यासाठी सरकार प्रयत्न करेल का? योग्य दिशेने प्रयत्न झाले तर पुणेकरांनीसुद्धा हेल्मेट बंदीचा सरकारी निर्बंध नक्कीच स्वीकारला असता, असे मत काही पुणेकर शहाणेसुद्धा व्यक्त करत असतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या