ही भीती कोण व कशी दूर करणार ?
अग्रलेख

ही भीती कोण व कशी दूर करणार ?

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

एखाद्या घटनेचे आणि त्यावरच्या सरकारी धोरणाचे कित्येकदा अपेक्षेपेक्षा वेगळेच परिणाम प्रजेवर होत असतात. कोरोनाची साथ जगभर अनपेक्षितपणे उदभवली. सरकारी कामाच्या पद्धतीप्रमाणे प्रारंभी त्या साथीची दखलच घेतली गेली नाही. नंतर मात्र सरकार खडबडून जागे झाले. नोटबंदीसारखा व्यवहारबंदीचा ( लॉकडाऊन) निर्णय तातडीने देशभर लादला गेला. कोणतीही पूर्वसूचना न देता तो अचानक घोषित झाला. ती मुदत पुनःपुन्हा वाढवली गेली. त्याला लॉकडाऊन 1,2,3,4 असे क्रमांक काय हेतूने दिले गेले असतील ?

कोरोनावर केंद्र आणि राज्य सरकारने अनेकदा आदेश काढले आणि मागे घेतले. सरकारी आदेशांमधील विसंवाद अनेकदा समोर आला. अलगीकरण, विलगीकरण, प्रतिबंधित क्षेत्र अशी नवनवी नावे जनतेला प्रथमच माहिती झाली. कोरोना रुग्णांच्या रुग्णालयातील परिस्थितीचे, तेथील मृतदेहांची अवस्था कशी आहे हे दाखवणारे चित्रीकरण दाखवण्याची चढाओढ समाजमाध्यमांवर लागली. लॉकडाऊनचा निर्णय केंद्र सरकारचा होता. तथापि नंतर त्याची जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलण्याची तत्परता केंद्राने का दाखवली? कोरोनाबाधित रुग्णांचे आणि प्रतिबंधित क्षेत्रांचे आकडे रोज वाढत आहेत. या परिस्थितीत माध्यमांनी विशेषतः दूरचित्रवाहिन्यांनी भरच घातली. कोरोना साथीविषयी समाजात जनजागृती करणे ही माध्यमांची विशेष जबाबदारी आहे याचा माध्यमांना विसर पडला. ‘सगळ्यात आधी’ बातम्या देण्याच्या स्पर्धेत कोरोनाची साथ हा 24 तास बातम्यांच्या रतिबाचा विषय बनला.

या सगळ्या गदारोळाचा परिणाम जनतेवर काय होत आहे, याचा विचार कोणीतरी केला का? ज्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी हे सुरु असल्याचा दावा केला जात आहे, त्या जनतेची अवस्था मात्र आभाळ फाटले अशी समजूत करून घेऊन धावणार्‍या भित्र्या सशासारखी झाली आहे. याची अनेक विदारक उदाहरणे समोर येत आहेत. मुंबईमधील विक्रोळी येथील एक घटना. एक आजोबा एकटेच राहत होते. गेले काही दिवस कोरोनाच्या भीतीने त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते. घरातून दुर्गंधी यायला लागली म्हणून म्हातारा गेल्याचे सर्वांना समजले. पण कधी गेला हे मात्र गूढच राहिले. शहरी भागातील अनेक इमारती रोज प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित होत आहेत. काही इमारतींमधील रुग्ण बरे झाले आहेत. तथापि अशा अनेक इमारतींमधील लोक आठवडेच्या आठवडे आपल्याच इमारतीच्या तळमजल्यावरदेखील यायला तयार नाहीत. घरातील लहान मुलांना इमारतीच्या गच्चीवरदेखील जाऊ देत नाहीत.

कोरोनाची दहशत कोणामुळे निर्माण झाली? कोरोनाची साथ आणि लॉकडाऊन याचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला, या मुद्यावर अनेक सामाजिक संस्था सर्वेक्षण करत आहेत. संस्थांची नावे वेगवेगळी असली तरी निष्कर्ष मात्र एकच आहे. तो म्हणजे लोकांचे मानसिक आरोग्य यापूर्वी कधीही नव्हते इतके धोक्यात आहे. आता लोकांचे मानसिक आरोग्य ठीक राहावे, म्हणून अनेक मदत केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण मधुमेह, रक्तदाब, किडनी किंवा हृदयविकार अशा दुर्धर व्याधींनी त्रस्त होते, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने जाहीर केली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सरकार आता रोज जाहीर करत आहे. तथापि ही झाली पश्चातबुद्धी. यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी त्याचा सर्वांगीण विचार सरकारने करायला हवा की नको?

समाजात पसरलेली दहशत दूर करणे ही सरकारचीच जबाबदारी आहे. सरकारचे धोरण अनेक राष्ट्रीय प्रश्नांबाबत संभ्रमित का असावे? चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला आहे. पण नेमकी किती भूमी चीनने गीळंकृत केली, ते प्रजेला सांगण्यास सरकार का धजावत नाही? अनेक बाबतीत जनतेला हेतुपुरस्सर अंधारात ठेवले जात असावे का? चीन आणि कट्टरतावाद्यांसारख्या देशविरोधी शक्ती समाजातील या अस्वस्थतेचा फायदा घेत आहेत. हे जगाला माहीत असलेले सत्य आहे. चीनच्या त्या आक्रमक कारवायांचा बळी ठरलेला भारत मात्र भारतीय जनतेलाच त्याबाबत अंधारात का ठेवत आहे? या सगळ्या परिस्थितीमुळे देशावर भयानक आर्थिक संकट ओढवले आहे, याही बाबतीत सरकार मौन का?

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com