सामाजिक सुधारणांची अटळ स्वार्थी घुसळण !

‘समाजव्यवस्थेची सतत घुसळण चालू असते. आजवर अनेक सुधारणा झाल्या. पुनःपुन्हा सुधारणांचे गाडे घसरतही राहिले. जातीजातीतील दरी हे त्याचा एक विदारक नमुना! एखादा गायक ! भावगीत, भक्तीगीत, लोकगीत किंवा शास्त्रीय संगीत गातो यावरूनदेखील वेगळी वर्गवारी ठरवली जाते. भारतीय लोक महापुरुषांनादेखील या चौकटीत बंदिस्त करतातच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे अण्णा भाऊ साठेंना मानत नाहीत. साठेंचे अनुयायी डॉक्टरांना मानत नाहीत. हे या मानसिकतेचे टोकाचे उदाहरण !

ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्यांना सुद्धा मराठी माणसे विसरू शकतात. अशाने महाराष्ट्र ‘महाराष्ट्र’ राहणार नाही’ अशी खंत प्रसिद्ध शाहीर नंदेश विठ्ठल उमप यांनी व्यक्त केली. जातीपातीवरूनच नव्हे तर ज्ञानाच्या मक्तेदारीवरूनसुद्धा समाजात दुफळी तयार होते हे समाजाचे फार जुने दुखणे आहे. याची पाळेमुळे खूप खोलवर रुजली आहेत. त्या मानसिकतेमुळे वैदिक धर्म ही विशिष्ट गटाचीच मक्तेदारी बनते. वेद जाणणारे श्रेष्ठ, उर्वरित बाकी सगळे दुय्यम आणि शूद्रांचे तर काय बोला? शिक्षण विस्तारले तसतसा उर्वरित समाजात क्षोभ निर्माण झाला. समाजात कायम उपेक्षा सहन करणार्‍यांमधील काही काळाबरोबर शहाणे झाले. त्यांनी जातीपाती आणि धर्माचा स्वार्थासाठी वापर करणार्‍यांचे बुरखे फाडले.

श्रेष्ठत्व आणि दुय्यमत्व यातील संघर्ष मात्र आजही सुरूच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे, भाऊराव पाटील, महात्मा गांधी अशी समाजसुधारकांची मोठी फळी महाराष्ट्रात उभी राहिली. या सर्वानी समाजातील भेदाभेद कमी करण्याचे अनेक नवे मार्ग सुचवले. समाजसुधारणेसाठी समाजाच्या सर्व घटकातील संत परंपरेचेही मोठेच योगदान आहे. समाजसुधारणेच्या प्रयत्नांची फार मोठी किंमत अलौकिक समाजसुधारकांना व ज्ञानेश्वरांसारख्या संतांनाही चुकवावी लागली. महात्मा गांधींना ती किंमत कुणा ‘प्रज्ञा’वंतामुळे पुनःपुन्हा चुकवावी लागली. कदाचित आणखी अनेक वर्षे चुकवावी लागेल. गांधीजींची एकदा हत्या करून त्यांच्या विरोधकांचे समाधान होऊ शकत नाही हा या मानसिकतेचा ओबगवाणा कडेलोट! म्हणून महात्म्याच्या प्रतिमेला सुद्धा गोळ्या घातल्या जातात. सध्याच्या काळात तर समाजसुधारणांनासुद्धा राजकीय स्वार्थाचे ग्रहण लागले आहे. राजकीय लाभासाठी समाजातील जातीपाती, धर्म, सार्वजनिक सण समारंभ वेठीला धरले जाऊ लागले. प्रभू रामचंद्रांनी आज्ञाधारकपणा, साधनशुचिता, सौहार्द, बंधुता अशा अनेक सद्गुणांचा उत्कर्ष आपल्या आचरणातून सर्व समाजापुढे ठेवला. म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम मानले गेले. जगभर त्यांच्या प्रतिमा आढळतात. भारतात तर खेडोपाडीसुद्धा राममंदिर नक्कीच असते. तथापि त्याही रामाला पुन्हा एखाद्या विशिष्ट सीमेत बंदिस्त करण्याचा अट्टाहास शतकानुशके चालू राहावा का ? चराचरात ‘राम’ भरलेला आहे असे सर्व संत सांगतात.

समाजसुधारकांप्रमाणेच देव-देवतांनासुद्धा जातीपातीत विभागले जाणे अपरिहार्य का ठरते? कोणताही विषय राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही या सगळ्या समाजसुधारकांचे आणि राष्ट्रपुरुषांच्या शिकवणुकीचे विकृत वाभाडे काढण्यातच विद्वानांच्या विद्वत्ता का खर्च व्हावी? प्रश्न अनेक! काळ कोणताही असो, समाजाला संघटित करण्याचे प्रयत्न होतच राहातील. विघटित करू पाहाणारांचे प्रयत्नही चालूच राहातील. दोन्ही पद्धती जगात सर्वत्र नेतृत्व चमकवण्याच्या शिड्या बनल्या आहेत. लोकशाही पद्धतीत त्यातही नव्यानव्या पद्धती आणि निमित्ते शोधली जातात.

मोठ्यांच्या अनुकरणात धन्यता मानणार्‍या सामान्य जनतेची दिशाभूल करत राहाण्याचे पुण्यकर्मही मागील पानावरुन पुढे चालूच राहाते. त्यातून काही झाकोळलेल्या नेतृत्वांना उजाळा मिळतो तर काहींना काळाचा महिमा म्हणून भूमिगत केले जाते. इतिहासाचे पुनर्लेखन, शिक्षणाचे आधुनिकीकरण, सोयीच्या कल्पनांचे उद्दातीकरण आदी अनेक नवनवे मार्ग त्यासाठी शोधले जाणे हाही कदाचित अपरिहार्य असा काळाचा महिमा असावा का?


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *