Saturday, April 27, 2024
Homeअग्रलेखतरुण पिढीपुढील एक भयंकर आव्हान?

तरुण पिढीपुढील एक भयंकर आव्हान?

भारत हा तरुणांचा देश मानला जातो. तरुणाईला समाजमाध्यमांनी वेड लावले आहे. समाजमाध्यमांच्या वापरात भारतातील तरुणाईचा जगात पहिला क्रमांक लागतो असे सांगितले जाते. ते विधान कदाचित भारताची लोकसंख्या लक्षात न घेताही केलेले असू शकते.

२००४ मध्ये फेसबुक आणि २००६ मध्ये ट्विटर आले. आणि नंतर व्हाससप्प, इंस्टाग्राम अशी माध्यमे येत गेली आणि त्यांचा भारतातील वापर वाढतच गेला. या व्यासपीठांचा विविध कारणांसाठी वापर आणि गैरवापरही सुरु झाला. समाजासाठी काही करू इच्छिणार्‍या तरुणाईला या माध्यमांनी एकत्र आणले. त्यांच्या उत्साहाला आणि कार्यशक्तीला अप्रत्यक्षपणे दिशा दिली. लोकांचे अनेक समूह तयार झाले. ही व्यासपीठे भेटीगाठींचेही ठिकाण बनले. तथापि या माध्यमांच्या योग्य वापराबरोबरच अपप्रवृतीही बळावल्या. गुन्हेगारी प्रवृत्तीने तरुणींसाठी सापळा म्हणूनही या माध्यमांचा गैरवापर सुरु केला.

- Advertisement -

फेसबुक, इंस्टाग्राम अशा माध्यमांवर ओळख करून घ्यायची. ती वाढवायची. तरुणीचा विश्वास संपादन करायचा. तिला भेटायला बोलवायचे आणि अत्याचार करायचा. अशा घटना वारंवार उघडकीला येत आहेत. मुंबईमधील नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे या वास्तवाची भीषणता किती दाहक ठरू शकते हे लक्षात यावे. एका अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवर एका अनोळखी मुलाशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्या मुलाने वाढदिवसाचे निमित्त करून मुलीला एका ठिकाणी भेटायला बोलावले. त्याच्यावर विश्वास ठेऊन ती मुलगी त्याला भेटायला गेली. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सोबत असलेल्या काही मुलांच्या टोळक्याने मुलीवर बलात्कार केला.

या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे. लग्नाचे गाजर दाखवून तरुणींवर अत्याचाराच्या गुन्ह्यांचेही असेच आहे. अशा प्रकारचे गुन्हे वारंवार उघडकीस येत आहेत. तरी मुली अशा सापळ्यात अडकतात हा मुखत्वे त्यांचाच दोष मानला जाईल. उनाडक्या आणि बेजबाबदार वर्तन हा तरुण मुलांचा जणू हक्कच मानण्याची मानसिकता समाजात आढळते. भारतीय समाजात हा विसंवाद अधिक तीव्रतेने जाणवतो. केवळ समाजमाध्यमावर झालेल्या ओळखीवर विसंबून मुली अशा अनोळखी तरुणांच्या भूलथापांना बळी पडाव्यात, त्यांच्या भेटीच्या उत्सुकतेने बिन माहितीच्या ठिकाणी जातात. हे मुलींचे वागणे तरी किती शहाणपणाचे म्हणावे? सामान्यतः अशा घटनांचे वर्णन तरुणींची फसवणूक झाली असे केले जाते. पण समाजमाध्यमांचे वर्णन आभासी माध्यम म्हणून केले जाते. या माध्यमावर व्यक्तीची खरी ओळख होतेच असे नाही.

गुन्हेगारी वृत्तीची माणसे याचाच खुबीने वापर करून घेतात आणि तरुणींसमोर स्वतःची सभ्य प्रतिमा उभी करतात. अशा आभासी प्रतिमेवर भाळून तरुणी भेटायला जातात आणि स्वतःहून अशा सापळ्यात अडकतात. मग याला फसवणूक तरी कसे म्हणणार? खाण्याचे आमिष बघून उंदीर त्यांना पकडण्यासाठी लावलेल्या पिंजर्‍यात स्वतःहून जाऊन अडकतात. तसाच प्रकार अशा जाळ्यात फसणार्‍या मुली ओढवून का घेतात? तुमचे फोटो समाजमाध्यमांवर टाकू नका. वैयक्तिक बाबी कोणाला सांगू नका. या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. तुमच्या या माध्यमांवरील खात्याचे पासवर्ड कोणालाही देऊ नका. अनोळखी व्यक्तीकडून आलेली मैत्रीची विनंती (फ्रेंड रिक्वेस्ट) स्वीकारू नका. या माध्यमांवर ओळख झालेल्या मित्रांना भेटायला जाऊ नका. असे आवाहन पोलीस वारंवार करत असतात. पोलिसांच्या या सल्ल्याकडे उघड्या डोळ्याने दुर्लक्ष करणार्‍या मुली आणि त्यांचे पालकच अशा दुर्घटनांना जबाबदार नाहीत का? ‘मागच्याच ठेच आणि पुढचा शहाणा’ अशी म्हण आहे.

तथापि समाजमाध्यमांवरील ओळखीचा गैरफायदा घेतल्याच्या अनेक घटना घडतात. तरी तरुणी शहाण्या का होत नाहीत? समाजात सध्या मानवी चेहर्‍याआड दडलेल्या कोल्ह्या-लांडग्याचा सुळसुळाट वाढला आहे. त्यांच्या सापळ्यात अडकायचे नसेल तर तरूणींनाच काही पथ्ये पाळावी लागतील. समाजमाध्यमांचा वापर पूर्ण सावधानतेने करावा लागेल. मैत्री झाली तरी विश्वास टाकून चालणार नाही. सायबर तज्ज्ञांनी केलेले आवाहन गंभीरपणे घ्यावे लागेल. सापळे बनतच राहातील. पण त्यात अडकू नये यासाठी सतत दक्ष राहावे लागेल. सापळे ओळखायचे कसे ते शिकून घ्यावे लागेल.

केवळ शाळा-कॉलेजमधील परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे हे आपल्या बुद्धीचे पुस्तकी गमक आहे. प्रत्यक्ष व्यवहारात त्या गमकावर आधारित स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल अपक्व मुलेमुली स्वतःबद्दलचा अवास्तव गैरसमज करून घेत असावेत का? व्यवहार चातुर्याशिवाय वाढलेल्या परीक्षेतील गुण संपादनाला आपल्या बुद्धिचातुर्याचे गमक मानण्याची भ्रामक समजूत यापुढे करून घेता कामा नये याची खूणगाठ त्यांनी मारलेली बरी. गुण संपादनाला व्यवहार कौशल्याची पुरेशी जोड कशी देता येईल याचा शिक्षणक्रम ठरवणार्‍या शिक्षणतज्ज्ञांनी देखील विचार करण्याची गरज वाढली आहे. अशा घटनांच्या दृष्टिकोनातून तरुणींमध्ये माध्यम साक्षरता कशा पद्धतीने रुजवायची याची उपाययोजना माध्यमतज्ञही सुचवतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या