यंत्रणेला कर्तव्यतत्पर बनवू शकणारी सुलभ पण प्रभावी क्लुप्ती!

यंत्रणेला कर्तव्यतत्पर बनवू शकणारी सुलभ पण प्रभावी क्लुप्ती!

देशात संप, आंदोलने, धरणे याचा मोठा इतिहास आहे. प्रत्येक आंदोलन नव्या भारताच्या इतिहासाचे नवे पान लिहित असते. जनसमस्या तडीस लावण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत असत. गिरणी संपासारखे दीर्घकाळ चाललेले आंदोलन, जनलोकपाल कायद्यासाठीची चळवळ लोकांच्या आजही स्मरणात आहे.

सामान्य माणसेही सरकारला जाब विचारु शकतात आणि जनमनाचा रेटा बलाढ्य मानली जाणारी यंत्रणाही हादरवू शकते हा विश्वास समाजात निर्माण करण्यात अशी आंदोलने काही प्रमाणात यशस्वी ठरली. सद्यस्थितीतही लाखालाखांचे मोर्चे काढले जातात. धरणेही धरले जाते पण असे आता अभावानेच घडते. सरकारी यंत्रणा हलवण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावरच उतरले पाहिजे असे नव्हे. थोडीशी कल्पनाशक्ती आणि समाजमाध्यमांचा योग्य वापर करण्याची क्षमता देखील सरकारच्या ताठरपणाला थोडेफार मऊ बनवू शकतेभ हे पारगावच्या काही महिलांनी सिद्ध केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पारगाव-हातोला-पांगरी या तीनही गावांना जोडणार्‍या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावर होणार्‍या अपघातांची संख्याही वाढत आहे. त्यात अनेकजण जायबंदी होत आहेत. हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी तीनही गावातील ग्रामस्थ पाठपुरावा करत होते. पण स्थानिक प्रशासन ताकास तूर लागू देत नव्हते. यावर स्थानिक महिलांनी एक साधा पण प्रभावी उपाय शोधला. त्यासाठी राखीपौर्णिमेचा मुहूर्त शोधला.

यादिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला बहिणीच्या इच्छेनुसार ओवाळणी देतो अशी परंपरा आहे. राखीपौर्णिमेला जिल्हाधिकार्‍यांना राखी बांधायची आणि ओवाळणी म्हणून त्यांच्याकडे रस्तादुरुस्तीची मागणी करायचा निर्धार तीनही गावातील महिलांनी केला. याची कुणकुण जिल्हाधिकार्‍यांनाही कदाचित लागली असावी.

त्यामुळेच महिलांनी राखी बांधण्यापूर्वीच जिल्हाधिकार्‍यांनी रस्तामंजुरीचे पत्र दिले. 100 मीटरच्या रस्त्याची मंजूरी आणि उर्वरित रस्त्याच्या कामासाठी 1 कोटींचा निधी मंजूर केला. या महिलांनी आनंदाने राखीपौर्णिमा साजरी केली. जिल्हाधिकार्‍यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्याऐवजी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना राखी बांधली. याच तीन गावांचा रस्ता फक्त खराब नाही. राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांवर रस्ते नावालाच असतात. ओढे आणि नाल्यांवर पुल नसतात.

विद्यार्थ्यांना नदी ओलांडण्यासाठी नाना कसरती करावी लागतात. बांबुच्या काठ्यांची झोळी करुन रुग्णांना रुग्णालयात आणावे लागते. राज्यातील ठिकठिकाणचे रस्ते पावसामुळे खड्ड्यात गेले आहेत. रस्त्यांच्या कामाचा दर्जा आणि रस्ते दुरुस्ती केल्याचा यंत्रणेचा दावा यामागचे पितळ ठिकठिकाणी उघडे पडले आहे. दरवर्षीच पावसाळ्यात रस्त्यांना अवकळा येते. मग विविध राजकीय पक्षांच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हाती आयतेच कोलित सापडते.

प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी खड्ड्यांमध्ये झाडे लावली जातात. मेणबत्त्याही पेटवल्या जातात. पण सरकारच्या कानावर जू देखील रेंगत नाही असे म्हटले जाते. पारगावच्या महिलांनी मात्र यावर परिणामकारक तोड शोधली आहे. लोकांच्या अनेक समस्या आहेत. त्यांची तड विधायक पद्धतीनेही लावता येऊ शकते.

पारगावच्या महिलांनी तेच केले आहे. पारंपरिक सणाचा त्यासाठी उपयोग करुन घेतला आहे. तसा तो सर्वांनाच करुन घेता येऊ शकतो हे लोकांनीही लक्षात घेण्याची गरज आहे. अर्थात, यासाठी यंत्रणेतील अधिकारी वर्ग उस्मानाबादच्या जिल्हाधिकार्‍यांप्रमाणेच संवेदनशीलता दाखवतील अशी जनतेने अपेक्षा करावी का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com