नद्या संवर्धनाचे मोठे आव्हान

नद्या संवर्धनाचे मोठे आव्हान

देशातील 311 नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत. नाशिकमध्ये उगम पावलेल्या गोदावरीसह महाराष्ट्रातील 55 नद्यांचा त्यात समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यात हा निष्कर्ष नमूद आहे. शहरीकरणाचा वेग वाढला आहे. त्याचाही दबाव नद्यांवर येत असावा का? राज्यातील 75 नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी ‘चला नदी जाणू या’ अभियान राबवले जात आहे. प्रसिद्ध जलतज्ञ डॉ.राजेंद्रसिंह यांनी नद्यांचे प्रदूषण कमी करणे ही सामाजिक जबाबदारी असल्याची जाणीव समाजाला करुन दिली आहे. राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची मोठी नदी म्हणून गोदावरी ओळखली जाते. गोदावरीसह नद्यांचे प्रदूषण अतीगंभीर आहे. नदी म्हणावे की गटारगंगा असा प्रश्न कोणालाही पडावा अशीच सद्यस्थिती आहे. थेट नदीत सोडलेले सांडपाणी आणि औद्योगिक परिसरातील प्रदुषित पाणी, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची कमतरता, पाण्यात मिसळणारी रासायनिक द्रव्ये, नदीपात्रात फेकले जाणारे निर्माल्य आणि टाकाऊ वस्तू ही नदी प्रदुषणाची काही मुख्य कारणे सांगितली जातात. यामुळे जलचर आणि मानवाचे आरोग्य धोक्यात येते. भारतातील 70 टक्के नागरिक प्रदूषित पाणी पितात असा निष्कर्ष एका जागतिक अहवालाने काढल्याची बातमी माध्यमात प्रसिद्ध झाली आहे. प्रदूषणामुळे पात्रातील पाण्यावर शेवाळाचा दाट थर निर्माण होते. पाण्यातील प्राणवायुचे प्रमाण कमी होते. काही ठिकाणी शून्यावर देखील येते. परिणामी नदीपात्रात अनेक ठिकाणी पाणी मृत होते. गोदावरी नदीही त्याला अपवाद नाही. अभियान सुरु आहे. नद्यांचे संवर्धन करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे सरकार वारंवार सांगते. पण त्यामुळे नद्या स्वच्छ कशा होणार? नद्या बारमाही वाहत्या होतील, असे उपाय योजावे लागतील. यासदंर्भात न्यायसंस्था आणि हरित लवादही वेळोवेळी आदेश देत असते. ते अंमलात आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. गोदापात्रात अनेक ठिकाणी तळाचे क्राँक्रिटकरण करण्यात आले. ते उखडून टाकण्याची आवश्यकता आहे. हीच परिस्थिती इतर नद्यांचीही असू शकेल. नद्या अमृतवाहिनी बनवणे हे ‘चला नदी जाणू या’ या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते. ते साध्य होण्यासाठी सरकार कोणचे उपाय योजत आहे? जीवनदायिनी नद्यांचे संवर्धन करण्यात समाजाचा सहभागही तितकाच मोलाचा आहे. माणसाचे आणि नदीचे नाते विरळ झाले आहे का? माणसांच्या काही सवयी नदीच्या जीवावर उठल्या असाव्यात का? लोक निर्माल्य नदीत फेकतात. नदीकाठच्या वस्त्यांमधील कचरा नदीपात्रात टाकला जातो. सर्रास वाहने धुतली जातात. कपडे धुवायला बंदी असली तरी लोक ती बंदी धुडकावून लावतात. अनेक सामाजिक संस्था गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या पात्रांमधून कचरा संकलन करतात. तरीही काही दिवसांनी परिस्थिती ‘जैसे थे’च का होते? याला लोक जबाबदार नाहीत का? सगळ्या प्रदुषित नद्यांचे दुखणे यापेक्षा वेगळे नसावे. नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हायलाच हवे. ती जबाबदारी लोकांची तर आहेच, पण प्रामुख्याने सरकारची आहे. त्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. ती कशी दाखवली जाते यावरच नद्यांचे भवितव्य अवलंबून आहे. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com