Saturday, April 27, 2024
Homeअग्रलेखदिलासादायक दौरा...आमदारांना मात्र आवरा!

दिलासादायक दौरा…आमदारांना मात्र आवरा!

राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. पण आत्तापर्यन्त झालेल्या बेप्रमाण पावसामुळे पूरपरिस्थिती मात्र काही ठिकाणी गंभीर आहे. पूरग्रस्त गावांमध्ये रोगराई पसरण्याचा धोका आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. चिपळूणमधील पूरपरिस्थिती तर अती गंभीर आहे.

चिपळूणच्या वशिष्ठी नदीत शेकडो मगरी आढळत आहेत. त्यातील काही रस्त्यांवरही फिरतांना दिसत आहेत. त्यामुळे चिपळूणमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणचा पाहाणी दौरा केला. जागोजागी थांबून पुरग्रस्तांच्या भावना समजावून घेण्याचा प्रयत्न केला. ‘केवळ लोकप्रियतेसाठी कोणत्याही घोषणा करणार नाही. राज्यातील पूरपरिस्थितीचा समग्र आढावा घेऊनच मदतीची घोषणा केली जाईल’. हे त्यांनी सौजन्यपुर्वक सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या.

- Advertisement -

दरड कोसळलेल्या तळये गावालाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या गावांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील असे त्यांनी जाहीर केले. कोणत्याही आपत्तीचा काही काळ लोटल्यावर जनतेलाही विसर पडतो आणि नेते आणि कारभार्‍यांनी दिलेली आश्वासने हवेत विरून जातात असा अनुभव जनतेला वारंवार येतो. पण तसा विसर यंत्रणेला पडू नये आणि नेत्यांनी दिखाऊ घोषणा केली असा जनतेचा समज होऊ नये म्हणूनच कदाचित त्यांनी सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा न करण्याची भूमिका घेतली असावी. फक्त मुंबईतील 36 पैकी 25 विधानसभा मतदारसंघातील किमान 300 ठिकाणे दरडीयुक्त ठिकाणे असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यावरून राज्यातील दरडीयुक्त ठिकाणांचा अंदाज येऊ शकतो.

या गावांमधील नागरिक नेहेमीच धोक्याच्या छायेत राहू शकतील का? त्यामुळे शासनाने अशा गावांचे पुनर्वसन करण्याची घेतलेली भूमिका अयोग्य नाही. तथापि हा निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अंमलात आणावा. या महापुराने आणि कोसळलेल्या दरडीनी अनेकांचे सर्वस्व हिरावून घेतले आहे. अनेकांनी कुटुंबीय व आप्तेष्ट गमावले आहेत. लोकांच्या मनात शासन आणि प्रशासनाविषयी तीव्र नाराजी वा संताप असणे स्वाभाविक आहे. म्हणूनच लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची मुख्यमंत्र्यांची अत्यंत समर्पक भूमिका सुद्धा आमदारांना समजली नाही हे त्यांच्या मतदारांचे दुर्दैव! आमदारांच्या बोलण्यातील गुर्मीने लोकांच्या संतापात अधिकच भर पडली असेल.

कोणत्या परिस्थितीत पाहाणी दौरा सुरु आहे? आपत्तीग्रस्तांच्या भावना काय आहेत? याचे भान त्यांच्याकडून का राखले गेले नाही? आपत्तीग्रस्तांना चार शब्द सुनावण्याची ती वेळ होती का? आमदारांच्या वेतनातून मदत करा अशा भावना पुरग्रस्तांनी व्यक्त केली त्यात त्यांचे काय चुकले? हि खरे तर सर्वच जनतेच्या मनातील भावना आहे. आमदारांच्या वेतन आणि भत्यांबद्दल जनताही आता जाणून आहे. जनतेने मागितले आणि आमदारांनी लगेच दिले असे कधी घडतच नाही. पण आमदारांना नेहेमीच न बोलता अधिकाधिक मिळतच असते. तरीही आमदारांना इतका राग का आला असावा? तो त्यांनी अत्यंत उथळपणे व्यक्त केला. स्थानिक लोकप्रतिनिधींचा बेजबाबदारपणा कोणत्याही राजकीय पक्षाला महाग पडू शकतो हे लक्षात न घेणार्‍या आमदारांची लोकप्रियता ठिसूळ ठरली तर त्याचे चटके कोणाला बसतील?

- Advertisment -

ताज्या बातम्या