डॉक्टर परमेश्वराची जागा कधीच घेऊ शकणार नाही!

डॉक्टर परमेश्वराची जागा कधीच घेऊ शकणार नाही!

डॉक्टर-रुग्ण परस्पर संबंध’ हा अलीकडच्या पंधरा-वीस वर्षात खूप नाजूक विषय बनला आहे. रुग्णालयात एखाद्या रुग्णाचा मृत्यू होतो किंवा एखादी दुर्घटना घडते, त्यासाठी जबाबदार धरुन डॉक्टरांना मारहाण करण्याच्या आणि रुग्णालयातील रुग्णोपयोगी साहित्याची मोडतोड करण्याच्या घटना वाढत आहेत. नाशिक आणि औरंगाबादमध्ये नुकत्याच अशा ताज्या घटना घडल्या. अशा घटना घडल्या की संबंधित दोन्ही घटक परस्परांना जबाबदार धरतात आणि क्वचित पोलीसात तक्रारही नोंदवतात. काही रुग्णालये त्यांच्यापुरत्या कार्यपद्धतीला काही मर्यादा घालून घेतात. औरंगाबादाच्या घाटी रुग्णालयाने रुग्णांना भेटणार्‍या नातेवाईकांच्या संख्येवर बंधने आणली आहेत. भेटीचा तास बंद केला आहे.

नाव नोंदणी करुन संमतीपत्र घेतल्यावरच एकावेळी फक्त दोन नातेवाईक रुग्णांना भेटू शकतील असा नियम केला आहे. तर नाशिकच्या घटनेत रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल केली आहे. रुग्णाला रुग्णालयात दाखल केले म्हणजे तो वाचला पाहिजे ही अपेक्षा अयोग्य नसली तरी वास्तवाला धरुन आहे का? वैद्यकीय पेशा हा ‘उमदा’व्यवसाय (नोबेल प्रोफेशन) मानला जातो. रुग्ण आणि त्याचे नातेवाईकही डॉक्टरांना देवासमान मानतात. सुमारे अर्धशतकापुर्वी समाजाचे कौटुंबिक डॉक्टर (फॅमिली फिजिशियन) होते. घरातील कोणत्याही सदस्याची तब्येत बिघडली तरी त्याच डॉक्टरांकडे जाण्याचा अलिखित नियम असायचा. डॉक्टरही त्याच आपुलकीने आणि विश्वासाने रुग्ण तपासायचे आणि दोन-तीन दिवसांचे औषध देऊन घरी पाठवायचे. परंतु दिवसेंदिवस संशोधन वाढले. नाडीपरीक्षेऐवजी अगदी किरकोळ मुद्याच्या तपासणीसाठी सुद्धा यंत्राचा वापर आवश्यक ठरवला गेला.

परिणामी पारिवारिक डॉक्टर ही पिढ्या न पिढ्या प्रचलित असलेली संस्था हळूहळू नामशेष झाली. कारण डॉक्टर रुग्णाकडे जाऊन तपासणी करु शकेल अशी छोटी यंत्रे सहसा उपलब्ध नाहीत. साहजिकच रुग्णाला रुग्णालयातच जाणे आवश्यक झालेे. आता औषधांचे प्रमाण वाढले आहे. औषधांच्या किमती देखील चक्रवाढ गतीने महागत आहेत. प्रत्येक छोट्यामोठ्या व्याधीकरता देखील भाराभर औषधे डॉक्टरांकडुनही सुचवली जातात. तरीही एकेमकांना मारहाण करण्यापर्यंत रुग्ण आणि डॉक्टरांचे परस्परसंबंध विकोपाला का जाऊ लागले असावेत? डॉक्टर आपली फसवणूक करतात असे रुग्णांना का वाटू लागले असावे? जशा डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटना घडतात तशाच अव्वाच्या सव्वा बिले घेतल्याच्या घटनाही घडत असतील.

पण त्याचा सगळा दोष सगळेच रुग्ण आणि डॉक्टर यांच्या माथ्यावर मारता येईल का? ‘ओल्याबरोबर सुकेही जळते’याचे भान रुग्ण आणि डॉक्टरांनाही ठेवावे लागेल. रुग्णालयातल्या सुविधांबाबत रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अपेक्षांनी देखील पंचतारांकित भरारी घेतली आहे. ‘डॉक्टर-रुग्ण संवाद’ हा विषय वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकवला जातो. डॉक्टरांनी रुग्णांशी कसे वागावे, बोलावे हे शिकवले जाते. तसे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रशिक्षणाची कोणतीही सोय मात्र उपलब्ध नाही. आजारी झाल्याशिवाय त्याची गरजही वाटत नाही.

अनेकदा रुग्णाला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले जात असते. खासगी रुग्णालयांच्या चकरा मारल्यानंतर नाईलाज म्हणून सरकारी दवाखान्यात दाखल केले जात असते. काही प्रकरणांमध्ये तोपर्यंत उशीर झालेला असतो हा आक्षेप काही डॉक्टर घेतात. तो आक्षेप रुग्णाचे नातेवाईक नाकारु शकतील का? डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी सविस्तर बोलावे, रुग्णाच्या आजाराविषयी आणि औषधोपचाराविषयी समजावून सांगावे अशी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अपेक्षा असते. ती गैर म्हणता येणार नाही. पण प्रत्येकवेळी तसेच घडू शकेल का? वेळेअभावी सविस्तर बोलणे शक्य होऊ शकेल का? डॉक्टर आणि रुग्णांनी परस्पर विश्वास गमावण्याची किंमत समाजाला मोजावी लागेल. वैद्यकीय व्यवसायाची विश्वासार्हता त्यामुळे पणाला लागेल.

तसे घडणे अंतिमत: कोणाच्याच हिताचे नाही. तसे घडू नये यासाठी सुजाण लोकांनी यावर उपाय सुचवण्याची गरज आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी कितीही आदळआपट आणि आकांडतांडव केले तरी प्रत्येक रुग्ण रुग्णालयातून त्याच्या घरी परत जाईल अशी हमी कोण देणार? याचे भान देखील रुग्णालयांची हानीकारक मोडतोड करणारांकडून कधी दाखवले जाईल का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com