Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखसुजाण नागरिक घडवणारा एक विधायक उपक्रम!

सुजाण नागरिक घडवणारा एक विधायक उपक्रम!

गणेशोत्सवाचा आज तिसरा दिवस. गणेशोत्सवानिमित्त ठिकठिकाणी अथर्वशीर्षाचे सामुहिक पठन सुरु आहे. पुण्यातील दगडुशेठ गणपतीच्या मंदीरासमोर तब्बल 31 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठन केले. अथर्वशीर्षातील एका श्लोकात गणेशाचे वर्णन ज्ञानाचा आणि विज्ञानाचा पुरस्कर्ता असे केले आहे. बालगणेशाने बुद्धीचातुर्य कुठे आणि कसे दाखवले, ज्ञानाचा पुरस्कार कुठे आणि कसा केला याच्या अनेक कथा सांगितल्या जातात.

वाचन हा देखील ज्ञान मिळवण्याचा एक शाश्वत मार्ग आहे. वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी ठिकठिकाणी भरीव प्रयत्न सुरु असतात. ‘…शास्त्र ग्रंथ विलोकन; मनुजा चातुर्य येतसे फार’ अशा शब्दात जुन्या काळच्या एका काव्यात वाचनाचे महत्व स्पष्ट होते. वरील उक्तीला अनुसरण्याचा प्रयोग औरंगाबाद व लातुरला सुरु झाला आहे. या दोनही जिल्ह्यात ‘वाचू आनंदे’ हा उपक्रम सुरु झाला आहे. तो सध्या 150 शाळांमध्ये राबवला जातो. समग्र शिक्षा मोहिमेतंर्गत या शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे.

- Advertisement -

शाळांनी पुस्तके एका स्वतंत्र खोलीत ठेवली आहेत. त्या खोलीला वाचनकक्ष असे नाव दिले आहे. दर शनिवारी सकाळचा एक तास वाचनासाठी राखीव ठेवला जातोे. या तासाला विद्यार्थ्यांनी वाचन कक्षात जातात. तिथे ठेवलेली पुस्तके हाताळतात आणि जे आवडेल ते पुस्तक वाचतात. कविता, विविध प्रोत्साहनपर, प्रेरणादायी कथा आणि भाषेचीही काही पुस्तके त्या संग्रहात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड रुजावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे उपक्रमाच्या समन्वयकांनी माध्यमांना सांगितले. गेल्या वर्षी पुण्यातील काही सार्वजनिक गणेशमंडळांनी असा उपक्रम राबवला होता. साधारणत: पाच हजार पुस्तके मुलांना वाचनासाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. सरकारतर्फेही नुकतेच ‘100 दिवसांकरता वाचन अभियान’ राबवण्यात आले. नाशिकमधील विनायक रानडे यांनी कुसुमाम्रज प्रतिष्ठानच्या विद्यमाने सुरु केलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाने देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. अनेक देशांमध्ये या उपक्रमातील ग्रंथांचे संग्रह पोहोचले आहेत. त्या त्या देशातील मराठी मंडळींनी त्या संग्रहातील पुस्तके वाचावीत हा त्यामागचा उद्देश आहे. वाचनसंस्कृती संपुष्टात आली आहे.

मुले आणि युवापिढी फारसे वाचत नाही. सध्याची मुले पाठ्यपुस्तकेही वाचत नाहीत. त्यामुळे अवांतर वाचनाचा प्रश्नच उद्भवत नाही. असे मत सरसकट नोंदवले जाते. कदाचित काही अंशी ते खरेही असू शकेल. मुले वाचत का नाहीत याची हजार कारणे वादविवादात सांगितली जातात. तथापि मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात अवांतर वाचन अत्यावश्यक असते. मुलांना सहज समजेल अशा मजकुराची पुस्तके त्यांना उपलब्ध करुन दिली जायला हवीत. सचित्र पुस्तकेही मुलांना आकर्षित करतात.

कोणतेही मुल एकदम वाचन सुरु करत नाही. त्यांचे आधी पुस्तकाशी मैत्र जमवण्याचा दृष्टीकोन हवा. मनसोक्त पुस्तके हाताळण्याची संधी त्यांना मिळायला हवी. औरंगाबाद, लातूर आणि पुण्यातील उपक्रमांमुळे ती संधी मुलांना मिळू शकेल. गणेशोत्सवाच्या उत्सवी दिवसांमध्ये असे उपक्रम वाचकांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांचा उत्साह वाढवावा याच उद्देशाने ‘देशदूत’ ने या उपक्रमांची दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांनी देशाचे सुजाण नागरिक व्हावे असे सर्वच पालकांना वाटते. सुजाण नागरिकत्वाचा मार्ग वाचन प्रशस्त करते. त्यासाठी अशा उपक्रमांना शुभेच्छा!

- Advertisment -

ताज्या बातम्या