Monday, April 29, 2024
Homeअग्रलेखआरामदायी जीवनशैली आरोग्याच्या मुळावर 

आरामदायी जीवनशैली आरोग्याच्या मुळावर 

देशात मधुमेहाचे (Diabetes) वाढते प्रमाण सामाजिक आरोग्याची चिंता वाढवणारे आहे. यासंदर्भात नुकतेच इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या संशोधनाचे निष्कर्ष माध्यमात जाहीर झाले आहेत. त्यानुसार देशातील ३१ कोटी लोक उच्च रक्तदाबाच्या (blood pressure) विकाराने ग्रस्त आहेत. मधुमेही (Diabetes) रुग्णांची संख्या १० कोटींच्या वर आणि मधुमेहपूर्व रूग्णांची संख्या १३ कोटींच्या वर गेली आहे.

मधुमेहपूर्व स्थितीतील लोकांना आगामी पाच वर्षात ती व्याधी गाठू शकते असे तज्ज्ञ म्हणतात. मधुमेहाला सायलेंट किलर मानले जाते. मधुमेह आटोक्यात ठेवता आला नाही तर तो व्याधींची गुंतागुंत वाढवतो. शरीरातील अनेक अवयव कायमचे क्षतिग्रस्त करू शकतो. लोकांनी ही धोक्याची घंटा मानायला हवी. बदलती जीवनशैली, कामाचे वाढते तास, बैठी कामे, ताणतणाव, भावनिक अस्थिरता, फास्ट फूडचे वाढते प्रमाण आणि खाण्याच्या सवयींमधील बदल ही तज्ज्ञांच्या मते वाढत्या मधुमेहाची (Diabetes) काही कारणे आहेत.

- Advertisement -

बदललेल्या जीवशैलीत आरोग्यदायी बदल करणे हे लोकांच्याच हातात आहे. आजारातुन बरे होण्यापेक्षा आजार होऊ नये याची काळजी घेण्यात शहाणपण असते असे म्हणतात. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते पण त्याला पाणी मात्र पाजता येत नाही अशा अर्थाची इंग्रजी भाषेत एक म्हण आहे. त्यातील मतितार्थ लोक लक्षात घेतील का? तज्ज्ञ सल्ले देतील, उपाय सुचवतील. अमलात मात्र लोकांनाच आणावे लागतील. मधुमेहाचा (Diabetes) विस्फोट होईल असा इशारा देतानाच मधुमेहाचा धोका टाळता येऊ शकतो याकडे तज्ज्ञ वारंवार लक्ष वेधून घेत आहेत. मधुमेह (Diabetes) टाळता येऊ शकेल असे उपाय तज्ज्ञ सुचवतात. ठरवले तर ते अमलात आणणे लोकांना सहज शक्य आहे.

रोज व्यायाम (Exercise daily), प्राणायाम, संतुलित आहार, त्यात हिरव्या पालेभाज्या, भाज्या, कडधान्ये आणि फळांचा समावेश, वेगाने चालणे, पायऱ्या चढणे आणि उतरणे अशा काही उपायांचा समावेश आहे. लिफ्टचा वापर टाळा, फोनवर खूपवेळा बोलणे होणार असेल तर आपापल्या परिसरात चालत चालत बोला असाही सल्ला दिला जातो. हे उपाय ठरवले तर अंमलात आणणे सहज शक्य होऊ शकेल. पण आरामदायी जीवनशैलीची लोकांना सवय झाली आहे. आळस वाढला आहे.

तंत्रज्ञानाने अनेक कामे जागेवर बसून होऊ शकतात. उपकरणे बटनांवर सुरु होतात. बंद करता येतात. त्यासाठी जागा सोडावी लागत नाही. माणसांऐवजी त्याच्या खुर्च्याच हलतात. त्याही सोडाव्या लागत नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला तेव्हा कामे सोपी झाल्याने माणसाचा खूप वेळ वाचेल अशी अपेक्षा केली गेली. ती पूर्णही झाली. तथापि किती माणसे त्या वेळेचा सदुपयोग करतात? तो वेळ आरोग्याची काळजी घेण्यासाठी वापरतात? त्या वेळेचा वापर मनोरंजनसाठीच जास्त होत असावा का? माणसे आळशी झाली असावीत का? विविध व्याधींच्या वाढत्या प्रमाणाचा अर्थ काय काढावा? केवळ रक्तदाब किंवा मधुमेहच (Diabetes) नव्हे तर अनेक त्याआधी दारात उभ्या आहेत.

या नकोशा पाहुण्यांना घरात घ्यायचे की बाहेरच ठेवायचे हे माणसांनाच ठरवावे लागेल. त्यासाठी आळस आणि सुखदायी दिनचर्येतून स्वतःला बाहेर काढावे लागेल. पण त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती आणि स्वयंप्रेरणेची आवश्यकता आहे. ती कुठेही विकत मिळत नाही किंवा तंत्रज्ञान ती तयार करू शकत नाही. आपले आरोग्य ही आपलीच जबाबदारी आहे याचे भान आतातरी यायला हवे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या