Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedआता तरी वाव मिळेल का ?

आता तरी वाव मिळेल का ?

ज्योतिरादित्य भाजपत गेले आहेत. पण पक्षात अजूनही सचिन पायलट, मिलिंद देवरा, जितीन प्रसाद अशी अनेक दुखावलेली तरुण मने आहेत. त्यांना आता तरी वाव मिळेल का?
सुरेखा टाकसाळ

‘तम सो मा ज्योतिर्गमय..’ ज्योती गया, तुम सोती रही…’ हा पप्पू जोक जरी राहुल गांधी यांच्या नावाने खपवला गेला असला तरी तथ्य/वास्तव हेच आहे की ज्योतिरादित्य सिंदिया काँग्रेसला गर्तेत सोडून गेले आहेत. तब्बल दीड तपानंतर राहुल गांधींच्या या अत्यंत निकटवर्तीयाने पक्ष सोडल्यामुळे जेवढा धक्का गांधी कुटुंबियांना व मध्य प्रदेश काँग्रेसला बसला त्याहून थोडे अधिक हादरे काँग्रेस पक्षाला राजस्थान, महाराष्ट्र अशा मोठ्या राज्यांमध्ये व सोबतच हरयाणात नाजूक स्थितीत असलेल्या भाजपलाही बसले आहेत.जे तंत्र भाजपने कर्नाटकमध्ये काँग्रेस राजवटीविरुद्ध वापरले तेच बंडखोरीचे अस्त्र ज्योतिरादित्यांनी मध्य प्रदेशात वापरले आणि कमलनाथ सरकारला कोमेजून टाकले. आता ‘ते’ कमल केव्हा गळून पडेल व ‘ऑपरेशन लोटस्’ केव्हा यशस्वी होते हे बघायला हवे.

- Advertisement -

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणतात, ज्योतिरादित्य संधिसाधू आहेत. उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणतात, ज्योतिरादित्यांचा प्रश्न पक्षांतर्गत सोडवता आला असता. संजय निरूपम यापुढे जाऊन म्हणतात की, पक्षातील सत्तरी पार केलेल्या नेत्यांना बाजूला सारून पार्टी युवकांच्या हाती द्यायला हवी. जेणेकरून पक्षाची पुनर्रचना व पक्ष नवीन जोमाने पुन्हा उभा करता येईल. काँग्रेसचेच आंध्र प्रदेशातील नेते गौड म्हणतात, पक्षाला नवीन दिशा, नवीन जोम देण्यात पक्षाचे नेतृत्व अपयशी ठरले आहे, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, कमलनाथ, अशोक गेहलोत यांच्या म्हणण्यानुसार, ज्योतिरादित्य सिंदिया काँग्रेस सोडून जाण्यामुळे पक्षाचे काहीही नुकसान झालेले नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ तर असाही दावा करतात की, ‘माझ्या सरकारला काही धोका नाही. ते स्थिर आहे. ज्योतिरादित्यला पक्षाने सर्व काही दिले पण आपमतलबीपणे तो पक्ष सोडून गेला.’ असे जरी असले तरी झाल्या घटनेमुळे काँग्रेसमधील तरुण पिढी जिला अद्यापही फारसा वाव, जबाबदारी मिळालेली नाही त्यांना आता चेव येईल, स्फुरण चढेल. उदाहरणार्थ सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद हवे होते. अशोक गेहलोत व पायलट यांचे कधीच पटले नाही.

राजस्थानमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशामध्ये सचिन पायलट यांचा मोठा वाटा आहे. जे दुर्दैवाने ज्योतिरादित्यांबद्दल म्हटले जाऊ शकत नाही. ज्योतिरादित्यांना मध्य प्रदेशात विशेष कर्तृत्व गाजवता आलेे नाही किंवा पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांना दिली असता तेथेही ते पक्षाचा जोम बसवू शकले नाहीत. इतकेच नव्हे तर लोकसभेच्या (2019) निवडणुकीत गुणा मतदारसंघात ग्वालियरच्या या राजाला स्वत:च्याच एकेकाळच्या सेक्रेटरीकडून हार पत्करावी लागली !

काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर अत्यंत कडवट शब्दात ज्योतिरादित्य सिंदिया यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर व कमलनाथ सरकारवर सडकून टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या वचनपत्रात शेतकर्‍यांना कर्जमाफीचा दिलासा देण्याची व तरुणांना नोकरी-धंद्याबद्दल दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी अद्यापही राज्यात काहीही पावले उचलली गेलेली नाहीत. पक्षात केंद्रीय पातळीवर पक्षश्रेष्ठींनी तरुणाईला जबाबदारी, महत्त्त्त्वाची पदे देण्याकरिता पावले उचललेली नाहीत. देशातील नवीन वास्तवाकडे पक्षनेतृत्वाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे व बदलती परिस्थिती मान्य करण्याचीही तयारी दाखवलेली नाही, असे ज्योतिरादित्य बरसले.

ज्योतिरादित्यांचा भाजपमध्ये प्रवेश ‘घरवापसी’ असल्याचे त्यांची आत्या यशोधरा राजे म्हणाल्या. तर त्यांनी उचललेले पाऊल योग्य व शहाणपणाचेच आहे. अखेर सर्व (सिंदिया) कुटुंब एकाच गटात आले आहे, असे थोरल्या आत्या वसुंधराराजे म्हणाल्या. या दोघीजणी मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्या आहेत. सिंदिया कुटुंबाचे भाजपबरोबर व त्याचा पूर्वविस्तार जनसंघाबरोबर घनिष्ठ संबंध राहिले आहेत. ज्योतिरादित्यांच्या आजी विजयाराजे या नेहरूंच्या काळापासून या पक्षाच्या प्रमुख खंद्या नेता होत्या. भाजपच्या संस्थापक नेत्यांपैकी त्या एक नेता व उपाध्यक्ष होत्या. ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव सिंदिया हेदेखील सुरुवातीला जनसंघाचे नेते होते. आणीबाणीच्या काळानंतर ते काँग्रेस पक्षात गेले.

माधवरावांच्या निधनानंतर 2002 मध्ये ज्योतिरादित्य काँग्रेसमध्ये आलेे. तेव्हापासून काँग्रेसनेही त्यांना भरपूर दिले. 2004 मध्ये ते लोकसभेवर निवडून आले. डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये 2008 मध्ये ते संचार व माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री, 15 व्या लोकसभेत वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री आणि 2012 पासून ऊर्जामंत्री (स्वतंत्र पदभार) पदावर होते. 2019 ची लोकसभा निवडणूक ते हरले. त्यानंतर मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपद किंवा प्रदेशाध्यक्षपद आपल्याला मिळावे, अशी ज्योतिरादित्यांची मागणी होती. पण पक्षनेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केले, चालढकल केली.

काँग्रेस पक्षापासून दूर होत असल्याचे काही संकेतही ज्योतिरादित्य यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये दिले होते. राज्यघटनेतील 370 वे कलम हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबाच दिला असे नव्हे तर त्याचे समर्थनही केले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे हे कलम हटवण्यास काँग्रेस पक्षाने कडाडून विरोध केला होता. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येण्यास 18 महिने पूर्ण झाल्यानंतरही वचनपत्राची अंमलबजावणी झालेली नाही. त्यातील आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

अखेर आपली खदखद व्यक्त करण्यासाठी त्यांनी होळीचा मुहूर्त साधला. भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या चेहर्‍यावरील रंग उडवले. भाजपमध्ये येताच त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचे गुणगान केले. त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली व पंतप्रधान मोदी यांच्या हाती देश पूर्णत: सुरक्षित असल्याची ग्वाहीदेखील दिली! हेच ज्योतिरादित्य 2014 ते 2019 या मोदी सरकारच्या काळात लोकसभेत विरोधी पक्षांच्या बाकांवरून पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारला धारेवर धरण्यात अग्रणी होते.

स्वत:च्याच काँग्रेस पक्षावर नाराज महाराज ज्योतिरादित्यांसाठी भाजपचे महाद्वार उघडून मोदी-शहा यांनी मोठी राजकीय खेळी खेळली आहे.ज्योतिरादित्य सिंदिया यांचा काँग्रेसचा राजीनामा राजकीय भूकंप ठरला. त्याचे तरंग इतर राज्यांमध्येही उठत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपले समर्थक आमदार जयपूरमध्ये नेऊन ठेवले. ज्योतिरादित्यांचे पाठीराखे बंगळुरूमध्ये तर भाजपने आपले आमदार गुरुग्राममध्ये हलवले. राजस्थान काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. यानंतर बिहारचाही नंबर लागू शकतो. अशा परिस्थितीत काँग्रेसचे भवितव्य काय?

यापूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाला झटका बसला जेव्हा आसाम त्यांच्या हातून निसटला. आसामच्या एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करताना आपली सल बोलून दाखवली. ‘मी तीन दिवस दिल्लीत बसून राहिलो. पण पक्षनेतृत्वाने भेटीसाठी वेळ
दिला नाही.’

यापूर्वी सत्तरच्या दशकात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावून भेटीसाठी ताटकळत ठेवल्याची व आपल्या सेक्रेटरीमार्फत त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिल्याची काही उदाहरणे आहेत. पण त्या अत्यंत ताकदवान नेता होत्या. पक्षावर त्यांची पकड होती, दबदबा होता. आज ती स्थिती काँग्रेसमध्ये नाही.

सोनिया गांधी व राहुल गांधी यांची पक्षावरील पकड ढिली झाली आहे, हे मान्य करावेच लागेल. पक्षनिष्ठा म्हणजे गांधी घराणे निष्ठा, असा दुराग्रह, हट्ट धरण्याचे कारण नाही. ज्योतिरादित्यंनी तर पक्ष सोडला. पक्षामध्ये मिलिंद देवरा, जितीन प्रसाद, सचिन पायलट आदी तरुण नेतेही दुखावलेली, दुरावलेली मने आहेत खरी. पण ते सक्षम आहेत. शिकले, सवरलेले आहेत. त्यांच्याकडे नवीन कल्पना आहेत. त्यांची क्षमता, अनुभव व ऊर्जेचा फायदा काँग्रेसने करून घ्यायला हवा. तरुण नेत्यांना संधी, वाव व जबाबदारी दिली तरच काँग्रेसला यापुढील काळात काही भवितव्य आहे, असे म्हणता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या