Type to search

maharashtra फिचर्स संपादकीय

रंग राजचा भगवा !

Share

पक्ष स्थापन केल्यापासून राज ठाकरे यांनी आपल्या राजकीय भूमिकेत चौथ्यांदा बदल केला आहे. या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव या दोन भावांमधील राजकीय दुश्मनीत तूर्तास तरी उद्धव यांनी राज यांच्यावर मात केली आहे.

हेमंत देसाई

अखेर राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या ध्वजाचा रंग पूर्ण भगवा केला आणि त्यावर शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा उल्लेख करून हिंदुत्वाची कास धरत भाजपशी युती करण्याचा एक मार्ग उघडला. पक्ष स्थापन केल्यापासून राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेत केलेला हा चौथा बदल.

2009 च्या विधानसभेत राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार निवडून आले. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे केवळ मनसेनेच्या उमेदवारांनी मते खाल्ली म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येऊ शकले, अशी जाहीर कबुली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली होती.

पक्ष स्थापन केल्यापासून अवघ्या तीन वर्षांच्या आत राज आणि त्यांचा पक्ष राज्यातील पाचवी शक्ती म्हणून उदयास आले होते. राज यांनी आपली सर्व राजकीय कारकीर्द काकांच्या म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकून चालवली आहे. सेनाप्रमुख प्रकाशझोतात आले ते त्यांच्या दाक्षिणात्यविरोधी आंदोलनामुळे! राज यांनीही 2004 साली उत्तर भारतीयविरोधी आंदोलन केले होते.

2009 ला जरी राज यांनी कुणाशीच युती न करता निवडणूक लढवली असली तरी गुप्तपणे उद्धव ठाकरेंवर नाराज असणारे अनेक भाजपचे नेते राजना मदत करत होते, असे आजही बोलले जाते. भाजप आणि मनसेनेच्या जवळीकीचा परिपाक म्हणूनच की काय राज आपल्या 13 आमदारांबरोबर 2011 ला चक्क गुजरात दौर्‍यावर गेले होते आणि मोदींनी केलेल्या विकासाची त्यांनी तोंडभरून स्तुती केली होती.

इतकेच नव्हे तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. त्यावर त्यावेळचे भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी त्यांची खिल्लीही उडवली होती. पण उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले सर्वच भाजप नेते आपला भविष्यातील साथीदार म्हणून राज यांच्याकडे पाहत होते.पण सुरुवातीला मिळालेले यश राज यांना राखता आले नाही. नाशिक महानगरपालिका त्यांच्या हातून गेली. मुंबईतील अनेक नगरसेवक, शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर यांच्यासारखे सहकारी सोडून गेले आणि विधासभेत लागोपाठ दोनवेळा मनसेनेचा केवळ एक आमदार निवडून आला. तरीही राज हे सतत चर्चेत राहिले. पण शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकारमध्ये सामील होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर एकाकी पडलेल्या भाजपनेही मनसेनेकडे संभाव्य साथीदार म्हणून पाहणे सुरू केले.

मनसेनेने उत्तर भारतीयविरोधी भूमिका सोडल्यास त्यांच्याबरोबर युती होऊ शकते, असे संकेत सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.सहा महिन्यांपूर्वी मोदी-शहांविरुद्ध गरळ ओकणारे राज बांगलादेशींच्या मुद्यावर भाजपला समर्थन देऊ लागले तेव्हाच सर्व पक्षांकडून नाकारले गेलेले राज आपल्या मूळ हिंदुत्वाच्या मुद्याकडे वळतील, असे वाटू लागले होते.राज यांचे इव्हेंट मॅनेजमेंट हाही त्यांच्या वाटचालीतला महत्त्वाचा दुवा. आपल्या मुलाला अमितला राजकारणात आणतानाही त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटचे कौशल्य दिसले. त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटची चुणूक मायकेल जॅक्सन आणि लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमात आली होती.

27 लाख बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी या दोन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आता त्यामुळे किती लाख तरुणांना काम मिळाले आहे, हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो तो भाग अलाहिदा.
शिवसेना जोपर्यंत भाजपबरोबर होती तोपर्यंत मनसेनेला भाजपचे दरवाजे बंद होते. भलेही भाजपच्या अनेक नेत्यांचा छुपा पाठिंबा होता. पण आज शिवसेना काँग्रेसच्या जवळ गेल्यानंतर मनसेनेला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपकडे जाण्याशिवाय पर्याय नाही.

उद्धव आणि राज या दोन चुलत भावातील ही राजकीय दुष्मनी सध्यातरी उद्धव यांनी जिंकली आहे. त्या तुलनेत राज यांनी सवता सुभा स्थापन केल्यानंतर 13 वर्षांनी स्वतःच्या आणि पक्षाच्या अस्तित्वाची लढाई खेळत आहेत.
प्रथम राज यांच्या पक्षाचा चौरंगी झेंडा होता. त्यात निळा, हिरवा, भगवा आणि पांढरा हे रंग होते. सर्वसामावेशकतेचा आव आणण्यासाठी त्यांनी चार रंग वापरले. पण शेवटी त्यांना भगव्या रंगाकडे परत यावे लागले. जणू सार्‍या रंगात रंगण्याचा प्रयत्न विफल ठरल्यानंतर त्यांना भागव्याकडे वापस यावे लागले आणि म्हणून श्रेष्ठ कवी स्व. सुरेश भट यांची क्षमा मागून त्यांच्या दोन ओळी वेगळ्या शब्दात लिहिण्याची हिंमत करत आहे.‘जाउनी रंगात सार्‍या,शेवटी..रंग राजचा भगवा’

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!