चक्रीवादळं वाढण्याचे संकेत

jalgaon-digital
9 Min Read

तापमानवाढीमुळे अनेक ठिकाणी पर्यावरणीय बदल घडत आहेत. अरबी समुद्रात अपवादानेच वादळ निर्माण व्हायचं. पण 1995 नंतर चक्रीवादळांच्या संख्येत पाचपट वाढ झाली असून त्यांची तीव्रतासुद्धा वाढली आहे. अशीच वाढ बंगालच्या खाडीतही दिसून आली आहे. येत्या काही वर्षांमध्ये इथला हिवाळा आणि पाऊस कमी होणार आहे. येत्या काही वर्षांमध्ये चक्रीवादळांचं प्रमाण वाढण्याचे संकेत जाणकारांना मिळत आहेत.

 प्रवीण गवळी, ज्येष्ठ संशोधक

(लेखक केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधीन भारतीय भूचुंबकत्व संस्थेत, वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.)

पूर्वेकडील बंगालचा उपसागर आणि पश्चिमेकडील अरबी समुद्र हे भारतीय महासागराचे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. पण, या दोन्ही सागरांमध्ये काही मूलभूत फरक आहेत. त्यामुळे या महासागरात घडणार्या नैसर्गिक घडामोडी एकमेकांपेक्षा फारच भिन्न असतात. गेल्या वर्षी ‘फोनी’ चक्रीवादळाने ओडिशात उच्छाद मांडला होता. त्यावेळी उत्सुकतेपोटी असा प्रश्न उपस्थित झाला होता की, अरबी समुद्रात अशा प्रकारची वादळं निर्माण होत नाहीत किंवा फारच कमी प्रमाणात निर्माण होतात. हे असं का घडतं? चक्रीवादळ कसं निर्माण होतं? जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर चक्रीवादळ निर्माण होतं.

बंगालच्या उपसागरात तापमान विसंगती जास्त असल्या कारणाने तिथे चक्रीवादळनिर्मितीचे प्रमाण अरबी समुद्राच्या तुलनेत जास्त आहे. चक्रीवादळात हवा एका कमी दाब असणार्या बिंदूच्या अवतीभोवती फार मोठ्या गतीने चक्राकार फिरत राहते. अशा वादळांचा वेग प्रति तास 30 ते 50 किलोमीटर इतका असू शकतो. हे चक्रीवादळ हवेतल्या कमी दाबाच्या दिशेने नेहमी सरकत राहतं. पण, हे वादळ जमिनीला टेकतं, तेव्हा पाण्याची ऊर्जा न मिळाल्याने शांत होऊन जातं. पण, तत्पूर्वी आपल्यासोबत आणलेल्या पाणी आणि पाण्याच्या वाफेला पावसाच्या रुपाने जमिनीवर सांडून जातं.

बंगालच्या उपसागरात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत एकापाठोपाठ एक चक्रीवादळं निर्माण होत असतात. चक्रीवादळनिर्मितीची प्रक्रिया जटिल असते. चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी काही मूलभूत गोष्टी असाव्या लागतात. एक तर समुद्रात योग्य हवा, त्याची दिशा आणि तापमान असणं आवश्यक असतं. समुद्राच्या पृष्ठ पाण्याचं तापमान तसंच वातावरणातल्या ‘ट्रोपोस्फेर’चं (सात ते बारा किलोमीटरचा पट्टा) तापमान चक्रीवादळाच्या निर्मितीत खूप मोठं योगदान देत असतात. पण, हवेची गती जास्त असेल आणि तिच्यातली ऊर्जा कमी किंवा अधिक झाली तरीही वादळ निर्माण होण्याची शक्यता कमी होत जाते.

समजा, एखादं चक्रीवादळ निर्माण होण्याच्या तयारीत असेल पण हवेची गती जास्त असेल तर हे वादळ पूर्णत्वाला येण्याआधीच हवा दुसरीकडे उडवून नेते. याच कारणामुळे मान्सूनच्या मोसमात चक्रीवादळं निर्माण होत नाहीत. पावसाळी हंगामात संक्षेपण जास्त आणि बाष्पीभवन कमी होत असतं. त्याचबरोबर हवेची गतीही जास्त असते. अशा वातावरणात चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण नसतं.
बंगालच्या खाडीतल्या पृष्ठ पाण्याचं तापमान सामान्यत: 28 डिग्री सेल्सिअस इतकं असतं आणि हे तापमान चक्रीवादळनिर्मितीसाठी अगदी योग्य असतं. या तापमानामुळे पाण्याच्या पृष्ठ आणि ‘ट्रोपोस्फेर’दरम्यान ऊर्जा अभिसरण सहज घडून येतं.

जमीन आणि समुद्रातल्या तापमान विसंगतीमुळे काही ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. अशा पट्ट्यातल्या परिसरात आजूबाजूची हवा धाव घेते आणि योग्य तापमान असेल, जेणेकरून या हवेत मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ सामावत असेल, तर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता कैक पटींनी वाढते. चक्राकार फिरणारे वारे जमिनीच्या दिशेने जातात तेव्हा कमी होत जाणार्‍या ऊर्जेने बाष्पीभवन होऊन ती वाफ पावसाच्या रुपात जमिनीवर कोसळते. चक्रीवादळ जमिनीला स्पर्श करतं तेव्हा समुद्रापासून गरम झालेल्या पाण्याची ऊर्जा त्याला मिळत नाही. परिणामी, हे वादळ आपोआप शांत होतं. दक्षिण-पश्चिम वाहणार्‍या वार्याला फिंडलातर जेट किंवा सोमाली जेट असं म्हटलं जातं. या वार्यांचाही वादळनिर्मितीत मोठा सहभाग असतो. हे वारे पार दुरून पश्चिम भारतीय महासागरातल्या विषुववृत्तापासून वाहतात आणि अरबी समुद्रावरुन संचार करत सह्याद्री पार करतात. त्यानंतर ते उपखंडाच्या जमिनीवरुन उडत जातात. या सार्या प्रवासात हे वारे समुद्रातली आर्द्रता आपल्याबरोबर घेऊन येतात. ही आर्द्रता भारतावर पावसाच्या स्वरुपात शिंपडली जाते. बंगालच्या खाडीतलं वादळ या हवेची दिशा बदलू शकतं आणि मान्सूनला रोखू शकतं. म्हणून ‘फोनी’ आणि ‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनचं आगमन लांबलं होतं.

अरबी समुद्रात चक्रीवादळाचा मौसम कधी सुरू होतो?

सामान्यपणे मे-जून आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळं निर्माण होतात. या समुद्राचं तापमान बंगालच्या खाडीतल्या पृष्ठीय तापमानापेक्षा एक-दोन डिग्रीने कमी असतं. या समुद्रात हिमालयातल्या नद्यांचं पाणी मोठ्या प्रमाणावर मिसळत राहतं. बंगालच्या खाडीतही हिमालयाच्या नद्या पाणी ओतत असतात. पण, अरबी समुद्रात पृष्ठीय गरम पाणी आणि खालच्या थरातलं थंड पाणी अभिसरणाद्वारे एकसंघ होण्याच्या प्रयत्नात असतं. त्यामुळे अरबी समुद्राचं पृष्ठीय तापमान बंगाल खाडीच्या तुलनेत एक-दोन डिग्रीने कमी असतं.
बंगालच्या खाडीत पाणी अभिसरणाची क्रिया तितक्या प्रभावीपणे होत नसते. 28 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्याने अरबी समुद्रावरील वातावरणातल्या ट्रोपोस्फिअरबरोबर अभिसरण प्रवाह निर्माण होत नाही. चक्रीवादळनिर्मितीचा हा एक महत्त्वाचा दुवा आहे.
बंगालच्या खाडीतल्या चक्रीवादळाच्या तीव्रतेची तुलना अटलांटिक आणि प्रशांत महासागराशी केली तर बंगालच्या खाडीतली चक्रीवादळं फारच सौम्य असतात. बंगालच्या खाडीचा विस्तार या दोन महासागरांइतका विशाल नसल्याने इथे तीव्र वादळं निर्माण होत नाहीत. चक्रीवादळ निर्माण झाल्यानंतरचा प्रवास अतिशय अनपेक्षित असतो. या वादळाला जिथून ऊर्जा मिळेल, त्या बाजूला ते सरकतं. त्यामुळेच ‘वायू’ चक्रीवादळ आपला मार्ग बदलून गुजरातकडे न जाता ओमानकडे कसं गेलं, ते आपण मागे पाहिलं आहे. पण, कधी कधी प्रशांत महासागरात निर्माण झालेली वादळं बंगालच्या खाडीतल्या वादळांना जन्म देतात. नकाशात प्रशांत महासागर आणि बंगालची खाडी एकमेकांना जोडल्यासारखी दिसतात. या दोघांमध्ये जमिनीची एक लहानशी पट्टीच दुभाजक असल्यासारखी आपल्याला दिसते. त्यामुळे तिथली वादळं इथे कधी कधी येतात. खरं तर, बंगालच्या खाडीतली वादळंही केव्हा तरी अरबी समुद्रात उडी मारतात.

गेल्या वर्षीचं ‘वायू’ चक्रीवादळ अरबी समुद्रात का निर्माण झालं?

जागतिक तापमानात वाढ झाल्याकारणाने पूर्ण ग्रहावर अनेकानेक बदल घडत आहेत. त्याला अरबी समुद्र कसा अपवाद राहणार? या समुद्रावर वाहणारे वारे बंगालच्या खाडीपेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यामुळेच अरबी समुद्रात वादळं निर्माण होत नाहीत. पण, गेल्या काही दशकांमध्ये वाढलेल्या प्रदूषणामुळे इथे अनेक प्रकारचे रासायनिक धुळकण वातावरणात मिसळले गेले आहेत. या क्षेत्रात अनेक प्रकारचे एरोसोल निर्माण झाले आहेत. हे धुळकण काळ्या, तपकिरी रंगांच्या ढगांच्या रुपात आपल्याला अरबी समुद्रात विहरताना दिसतात. त्याचबरोबर प्रदूषणामुळे साचलेल्या धुळकणांचा प्रतिकूल परिणाम इथल्या हवेच्या वेगावर होतो. वार्‍याचा वेग कमी झाल्याने अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता वाढली आहे. काही हवामान संशोधकांच्या मते या ढगांमुळे इथलं हवामानही बदलत चाललं आहे. कसं? या धुळकणांमुळे सूर्याचा प्रकाश परावर्तित होत असतो. त्यामुळे समुद्रपृष्ठाचं तापमान कमी राहतं.

समुद्रावर चक्रीवादळाचा प्रभाव कशा प्रकारे पडतो?

चक्रीवादळात हवा आणि पाण्याचं मंथन होत असतं. त्यामुळे वातावरणात आणि समुद्राच्या पृष्ठीय भागात अनेक गतिशील बदल होतात. 2009 मध्ये अरबी समुद्रात ‘फयान’ नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं होतं. त्यावेळी काही संशोधन करण्यात आलं होतं. त्यानुसार, चक्रीवादळानंतर दोन-चार दिवसांनंतर समुद्राच्या पृष्ठावर क्लोरोफीलचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं. चक्रीवादळाने समुद्र ताकाच्या रवीसारखा घुसळून काढला होता. त्यामुळे पृष्ठाखालचं पाणी वर आलं आणि आपल्याबरोबर पोषक तत्त्वसुद्धा घेऊन आलं. या अभिसरण क्रियेमुळे थंड आणि गरम पाण्याचं मिसळणं घडून येतं. पण, कधी कधी ही पोषक तत्त्वं समुद्री जीवांसाठी हानिकारक ठरू शकतात. ढगाळलेलं वातावरण निघून जातं तेव्हा सूर्यप्रकाश स्पष्टपणे समुद्राच्या पृष्ठावर पोहोचतो. पाण्याची पोषकता वाढल्याने अशा ठिकाणी जैविक क्रिया फार मोठ्या प्रमाणात वाढते. तिथे ‘फायटोप्लँक्टन’ची वाढ सुरू होते. ही शेवाळासारखी वनस्पती अतिशय सूक्ष्म आकाराची असते. यांची भरमसाठ वाढ झाली तर ते अख्खा समुद्र व्यापून टाकतात. त्यामुळे पाण्यातल्या सजीवांना ऑक्सिजनची कमतरता भासते. आधीच अरबी समुद्रात काही ठिकाणी पाण्यात ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यात अशा प्रकारची वाढ झाली तर अधिक मोठी हानी होऊ शकते.

पुढे काय?

तापमानवाढीमुळे अनेक ठिकाणी पर्यावरणीय बदल घडत आहेत. काही दशकांपूर्वी अरबी समुद्रात अपवादानेच वादळ निर्माण व्हायचं. पण, एका संशोधनानुसार, 1995 नंतर चक्रीवादळांच्या संख्येत पाचपट वाढ झाली आहे. त्यांची तीव्रतासुद्धा वाढली आहे. अशीच वाढ बंगालच्या खाडीतही दिसून आली आहे. या खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या वाढत्या पृष्ठीय तापमानामुळे भारतीय उपखंडातही अनेक प्रतिकूल बदल घडत आहेत. येत्या काही वर्षांमध्ये इथला हिवाळा कमी थंड होत जाणार व पाऊससुद्धा कमी होणार आहे. आधीच हिवाळ्यातली थंडी कमी होत असल्याकारणाने गव्हाचं उत्पादन कमी होत असल्याचा काहींचा कयास आहे. येत्या काही वर्षांमध्ये अरबी आणि बंगालच्या खाडीत चक्रीवादळांचं प्रमाण वाढण्याचे संकेत जाणकारांना मिळत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *