Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रपरिवर्तनाची प्रेरणा !

परिवर्तनाची प्रेरणा !

प्रसिद्ध आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच. गेली 30 वर्षें याच पदावर आहेत. गाव सोडून वर सरकण्याचा मोह त्यांनी टाळला. त्यामुळेच ते गावाला पूर्णपणे बदलू शकले. गावात पाऊस पडतो- इनमीन 300 मिलिमीटर. पण म्हणजे किती? वाळवंटी राजस्थानइतका किंवा इस्रायलमध्ये पडतो इतकाच. काही वर्षी तर त्याच्यापेक्षाही कमी! तरीसुद्धा हिवरे बाजार सुखी समृद्धी आहे, पाण्याच्या बाबतीत समृद्ध आहे. सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणं आणि पुढ जाणं.. ही पोपटरावांची पवारांची खासियत !

पोपटराव पवार चौथीमध्ये गाव सोडून नगरला गेले. त्यांनी तेथे एम.कॉम.पर्यंत शिक्षण घेतलं. राज्य सरकारनं 1989 साली पंचायत निवडणुका जाहीर केल्या होत्या. हिवरेबाजारमध्ये त्यामुळे चैतन्य निर्माण झालं. गावातील तरुणांनी पोपटराव पवारांना ग्रामसभेसाठी बोलावलं. त्यावेळी पोपटराव पवारांनी त्यांच्या गावाच्या विकासासंबंधीच्या त्यांच्या कल्पना, त्यांची स्वप्नं लोकांपुढे मांडली. तेव्हा लोकांनी त्यांना एकमतानं सरपंच म्हणून निवडलं.

- Advertisement -

पवारांनी पहिली ग्रामसभा 26 जानेवारी 1990 ला भरवली. सर्व लोकांना सहकार्यासाठी आवाहन केलं. त्यावेळी लोकांसमोर काही मुद्यांविषयी चर्चा केली. ते गावाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचे होते. पिण्याचं पाणी, जनावरांना चारा, शेतीसाठी पाणी, शैक्षणिक सुविधा, आरोग्याच्या सुविधा, रस्ते, वीज, नोकरी-धंदा, सोशल, कल्चरल ऑक्टिव्हिटीज. त्यांनी या मुद्यांआधारे 1990 ते 1995 या पाच वर्षांसाठी योजना तयार केली. त्यात प्राधान्य शिक्षणाला दिलं. शिक्षणासंदर्भात ज्या सरकारी योजना होत्या. त्यांची मदत घेण्याचं ठरवलं. कारण पवारांचा दृढ विश्वास असा की-एक शिक्षित माणूस घर बदलू शकतो.एक शिक्षित घर गाव बदलू शकतं.आणि एक शिक्षित गाव प्रत्येक गोष्ट बदलू शकतं. आणि त्याचाच प्रत्यय आदर्श गाव हिवरेबाजार गावात पाहायला मिळतो. गावातील अठरा लोकांनी आपली जमीन शाळेसाठी व शाळेच्या मैदानासाठी स्वेच्छेनं दान दिलेली आहे. पोपटराव पवार यांना ग्रामीण भागाविषयी आवड होतीच. ते जरी शिक्षणासाठी नगरला होते तरी त्यांचे गावात जाणेयेणे असे.

पोपटराव पवारांच्या घऱची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळेही असेल कदाचित त्यांनी मनानं असं ठरवलं होतं की गावात सुधारणा करायची, गाव सोडून (मोठेपणी) कुठे जायचं नाही. हिवरेबाजारची लोकसंख्या कमी, आजुबाजूला डोंगर व एखाद्या दरीत वसलं गेलेलं गाव, त्यामुळे आजुबाजूचा निसर्ग हाही सुंदरच. एक टुमदार सुटसुटीत गाव असावं तसं. पोपटराव पवारांना त्यांच्या शिक्षणानं हात दिला-लोकांशी बोलणं, एखादी गोष्ट त्यांना पटवून देणं, कामाची व्यवस्थित मांडणी करणं हे त्यांच्यातील कौशल्य त्यांनी पणाला लावलं. त्यांनी प्रथम पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम राबवून गावातील पाण्याचा प्रश्न हाताळला. लोकांना त्याचे फायदे जाणवू लागले. मग ते पोपटरावांना सहकार्य करू लागले. गावातील घरांना एकच रंग दिला ! अशा दिसायला साध्या गोष्टी युक्तीनं लोकांना पटवून देण्यात पोपटराव पवार यशस्वी झाले. त्यांनी एकीकडे गावकर्‍यांना आपल्या बाजूनं करून घेण्यात यश मिळवलं तर दुसरीकडे त्यांनी शासनाकडून योजना मंजूर करून घेणं, विकासासाठी निधी मिळवणं याही आघाडीवर यश मिळवलं.

हिवरेबाजारमध्ये माईकवरून सूचना आली, की आज रात्री 9 ला ग्रामसभा आहे की सर्व लोक, पुरुष, स्त्रिया-आवर्जून येतात एवढी जागरुकता तिथं निर्माण झाली आहे. पवारांनी आदर्श ग्राम योजनेचा प्रकल्प राबवण्यासाठी पंचसूत्री तयार केली; श्रमदान, चराईबंदी, कुर्‍हाडबंदी, नशाबंदी, कुटुंबनियोजन. श्रमदानाचं महत्त्व लोकांना पटल्यामुळे लोकांमधील कामसू वृत्ती वाढीस लागली, पण त्याशिवाय त्यांच्या व्यक्तिगत मालमत्तेतही वाढ झाली. एखाद्याच्या शेतात जे काम करायचं असेल, उदाहरणार्थ खुरपणी, पेरणी, कापणी इत्यादी, ते काम गावातील सर्वजण मिळून करतात. त्यामुळे एकतर ते काम लवकर होतं, त्याशिवाय मजुरीचे पैसेही वाचतात. चराईबंदीमुळे गावातील गवताचं उत्पादन वार्षिक दोनशे टनांवरून पाच ते सहा हजार टनांपर्यंत वाढलं – पाच वर्षांच्या कालावधीत गावात कुर्‍हाडबंदी अमलात आल्यामुळे झाडांची संख्या वाढली. तिथं नऊ लाख झाडं आहेत. नशाबंदी केल्यामुळे लोकांची काम करण्याची क्षमता वाढली. दारूमुळे होणारे दुष्परिणाम टळले. कुटुंबनियोजनचा अवलंब केल्यामुळे, जन्मदर दर हजारी अकराइतका कमी झाला. लोक लहान कुटुंबांचे फायदे अनुभवू लागले. ही पंचसूत्री हेच गावाच्या यशाचं, विकासाचं गुपित आहे असं पोपटराव सांगतात.

एकशेबावीस देशांच्या प्रतिनिधींनी हिवरेबाजारला भेट दिली आहे. जलसंधारण, वनीकरण, शैक्षणिक प्रकल्प, आरोग्यविषयक शेती, दुग्ध- व्यवसाय तसंच सामाजिक-सांस्कृतिक अशा सर्वच बाबतींत योजना यशस्वीपणे राबवून गावकर्‍यांच्या सहकार्यानं गावाचा कायापालट केला आहे. गावाला देशपातळीवर नेणारा कार्यकर्ता. नगर तालुका पंचायत समितीचे सदस्य, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जलसंधारण परिषदेचे कार्यकारी समिती सदस्य, संत तुकाराम वनग्राम समिती सदस्य, आंध्रप्रदेश ग्रामविकास समितीचे तज्ज्ञ मार्गदर्शक, कपार्टचे सदस्य (भारत सरकार) अशी विविध पदे त्यांनी सहज सांभाळली. राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार, प्रथम राष्ट्रीयजल पुरस्कार, कृषीरत्न पुरस्कार, वनश्री पुरस्कार, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार असे अनेक देशपातळीवरील पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. केंद्र सरकारने 25 जानेवारी रोजी भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मश्री घोषित करून परिवर्तनाची प्रेरणा ठरलेल्या पोपटराव पवारांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या