Friday, April 26, 2024
HomeUncategorizedका घडले ‘जेएनयू’कांड ?

का घडले ‘जेएनयू’कांड ?

दिल्लीतील ‘जेएनयू’ विद्यापीठ हे गुणवंत आणि  विचारवंतांचे उगमस्थान! अलीकडच्या काळात मात्र जेएनयू शैक्षणिक उपक्रमांपेक्षा शिक्षणबाह्य उपक्रमांनी गाजत आहे. विद्यार्थी संघटनांतील गुंडाराज पुढे येत आहे. नुकतीच येथे विद्यार्थी आणि गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांत तुंबळ मारामारी झाली.  याला काय कारणे आहेत ? 

अजय तिवारी 

- Advertisement -

विद्यापीठे ही उच्चशिक्षणासाठी असतात. तिथे संशोधन होते, असा आपला समज होता, परंतु अलीकडच्या काळात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे वाद आणि हाणामार्‍यांसाठी कुप्रसिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांवर मते व्यक्त करण्याचा अधिकार जरूर आहे, परंतु विद्यार्थ्यांचे पहिले काम शिकायचे आहे, वाद घालायचे किंवा कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करायचे नाही, हे विद्यार्थी संघटनांनी लक्षात घ्यायवा हवे. विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न जरूर हाती घ्यावेत. प्रश्न वैधानिक मार्गांनी सोडवावेत, परंतु आता विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढण्याऐवजी विद्यापीठातल्या पदांनाच जास्त महत्त्व द्यायला लागल्या आहेत. विद्यार्थीहिताऐवजी विचारसरण्यांच्या वादातून या संघटना समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्यात संघर्ष होतो. विद्यार्थी संघटना आता मुद्यावरून गुद्यावर यायला लागल्या आहेत. त्यामुळे तर जेएनयू कायम वादांनी गाजत असते.

विरोध अफजल गुरूच्या फाशीला असो की नागरिकत्व कायद्याला, राजकीय वर्चस्व निर्माण करण्याच्या भावनेमुळे हल्ली काही विद्यापीठांमधली कायदा आणि सुव्यवस्था सतत बिघडत असते. जेएनयू विद्यापीठात गेल्या तीन महिन्यांपासून शैक्षणिक शुल्क आणि वसतिगृह शुल्कवाढीवरून डाव्या संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

अनेक बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. आताही जेएनयूमध्ये डाव्यांच्या संघटनेने परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचे हत्यार उपसले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मात्र परीक्षेवर बहिष्कार टाकायला विरोध केला. या संघटनेने परीक्षेचे फॉर्म भरण्याची तयारी केली होती, मात्र जेएनयू विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरू देत नव्हती. या पार्श्वभूमीवर हाणामारीची ताजी घटना घडली.

दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नातून लवकर मार्ग काढावा, असे विद्यापीठ प्रशासनालाही वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क, वसतिगृहाची फी आदींसाठी महिनोन् महिने आंदोलन करूनही प्रश्न प्रलंबित राहत असतील तर त्यात दोष विद्यार्थ्यांचा नसून विद्यापीठ प्रशासनाचा आहे. दुसर्‍या बाजूने पाहता एकदा एखाद्या विचारसरणीचे बीज डोक्यात रोवल्यानंतर विद्यार्थ्यांना थांबवण्याची ताकद राजकीय नेतृत्वात राहत नाही, असे दिसते.

डावे, उजवे असोत वा काँग्रेसची विद्यार्थी संघटना, त्यांना राजकीय लाभ हवेत. शिवाय किती नेत्यांची मुले विद्यार्थी असताना विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करतात आणि संघर्षाच्या काळात लाठ्याकाठ्या, दगड खातात याचे उत्तर शोधायला हवे. इतर मुलांना पुढे करून राजकारण करणारेच जास्त आहेत. त्याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. विद्यार्थी संघटनाही आता मुद्यावरून गुद्यावर यायला लागल्या आहेत. त्यामुळे तर जेएनयू कायम वादांनी गाजत आहे. विद्यापीठाशी संबंध नसलेले लोक आतमध्ये घुसून धुडगूस घालत असल्याचे प्रकार जेएनयूमध्ये वारंवार घडले आहेत. पोलिसांच्या हस्तक्षेपाला विरोध करणारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल काहीच पावले उचलत नाहीत. पोलीसही विद्यार्थ्यांवर हल्ला करतात, हे परिस्थिती हातात राहिली नसल्याचे लक्षण आहे. राजधानीतील सर्वात संवेदनशील समजल्या जाणार्‍या विद्यापीठात काठ्या, लोखंडी गजांनिशी गुंडांचा जमाव घुसतो आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकांवर अमानुष जीवघेणा हल्ला करतो, ही घटना प्रत्येक भारतीयाला असुरक्षित वाटायला लावणारी आहे.

दरम्यान, या हल्ल्यासंदर्भातल्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही तपासून पाहण्यजोग्या अहेत. दिल्ली विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर झालेले हल्ले आणि मुंबईच्या 26/11 वर झालेला दहशतवादी हल्ला याची तुलना करणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसे करणे योग्य नव्हते. देशातल्या असंतुष्टांनीच 26/11 चा हल्ला केला होता का? कसाब मुंबईचा रहिवासी होता का?

परिणामी विरोधाला विरोध म्हणून उद्धव ठाकरेही काहीही बोलताना दिसले. दुसर्‍या बाजूला ताज्या हल्ल्याप्रसंगी दिल्ली पोलीस आणि जेएनयू प्रशासनाने घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. या दोन्ही घटकांचा हल्लेखोरांशी संगनमत असल्याचा थेट संशय वाटण्याजोगी परिस्थिती आहे. गेल्या महिन्यात जामिया मिलिया विद्यापीठात घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, ग्रंथालयाची नासधूस केली. त्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनाचा वणवा देशभर पसरला. जेएनयूमधला ताजा हल्ला हा त्याचाच पुढचा भाग आहे. तरुण रक्तात व्यवस्थेविरोधात खदखद असते, तरुणांमध्ये जोश असतो. त्याला विधायक वळण दिले नाही तर त्यातून हिंसाच होते. जेएनयूमधली खदखद अशीच व्यक्त होत राहिली. व्यवस्थविरोधी मतप्रदर्शन करणार्‍या इथल्या विद्यार्थ्यांचे दमन करण्याचे पाऊल उचलले गेले. त्यातून काही विद्यार्थ्यांच्या मनातला असंतोष आणखी वाढत गेला.

- Advertisment -

ताज्या बातम्या