Type to search

फिचर्स संपादकीय

उष्णतावाढ काय सांगते ?

Share

 सुहास साळुंके

प र्यावरण संरक्षण हा आता केवळ चर्चा करण्याचा विषय राहिला नाही. प्रदूषण रोखण्यासाठी झपाट्याने गंभीर पावले उचलणे आवश्यक असल्याचा आणि तो संपूर्ण सजीवसृष्टीच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनल्याचे जगातील ठिकठिकाणच्या आपत्तींच्या भयावह तांडवातून स्पष्ट होत आहे.

नुकताच करण्यात आलेला हिमालयाच्या भागातल्या पाणीटंचाईचा आणि ऑस्ट्रेलियातल्या उन्हाळ्याच्या कालावधीत होत असलेल्या वाढीचा अभ्यास हेच दाखवतात. जंगलांना लागणार्‍या वणव्यांमध्ये होत असलेली वाढ, उष्णतेच्या लाटा, महापूर, भूकंपांचे धक्के आणि ज्वालामुखींचे उद्रेक, विविध चक्रीवादळांचे तडाखे, समुद्रात उसळणार्‍या अवाढव्य उंचीच्या लाटा आणि प्राणी-पक्षी यांच्या संख्येत होत चाललेली घट या सगळ्याला प्रदूषण कारणीभूत आहे, ही बाब आता मान्य करावी लागत आहे. याला आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनातून दुजोरा मिळाला आहे.

कदाचित म्हणूनच यंदा ऑस्ट्रेलियामध्ये पसरत असलेल्या उष्णतेच्या लाटेबद्दल जाणकारांमध्ये विशेष चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या विषयावर काम करणार्‍या इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंट (आयसीआयएमओडी) या मान्यवर संस्थेचे संचालक डेव्हीड मोल्डन यांनी गरीब आणि स्थलांतरितांवर पाण्याच्या कमतरतेचे विनाशक परिणाम होतील, असे म्हटले आहे. पर्वतीय प्रदेश अद्याप पाणीपुरवठ्याचा विचार करण्याच्या बाबतीत दुर्लक्षित राहिले असल्याकडे लक्ष वेधले आहे. आधुनिक उपाययोजना जशाच्या तशा न राबवता पर्वतीय प्रदेशांचा वेगळा विचार करून त्यांच्याशी अनुरूप उपाययोजना करण्यावर भर दिला गेला पाहिजे आणि पाण्यासाठी वणवण करताना महिलांच्या आरोग्यावर होणार्‍या विपरित परिणामांकडे लक्ष पुरवण्यावर त्यांनी भर दिला आहे. जगातल्या देशांना प्रदूषणाचा फटका कसा बसत चालला आहे हे दाखवून देणारे आणखी एक ठळक उदाहरणही नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आणखी एका संशोधन अहवालातूनही समोर आले आहे.

सिडनीतल्या ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूटच्या क्लायमेट अँड एनर्जी प्रोग्रॅममधील संशोधकांनी ऑस्ट्रेलियात भडकणार्‍या वणव्यांच्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास केला असून ऑस्ट्रेलियातल्या पूर्वापार हिवाळ्यांप्रमाणेच उन्हाळेही तितक्याच कालावधीचे बनल्याचा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. त्यामुळे तापमान वाढत चालले असून गेल्या शतकाच्या मध्यापासूनच तापमानवाढीला सुरुवात झाली आहे. गेल्या वीस वर्षांमधल्या माहितीचा विचार करता वेगवेगळ्या ऋतूंमधले तापमान बदलत चालल्याचे दिसत आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बहुतांश भागात उन्हाळ्याचा कालावधी पन्नास वर्षांच्या तुलनेत जवळजवळ महिनाभराने वाढला आहे.

त्याच वेळी हिवाळ्याचा मोसम सरासरी तीन आठवड्यांनी कमी झाला आहे. या विश्लेषणातून असेही दाखवून देण्यात आले आहे की, गेल्या पाच वर्षांमधला उन्हाळ्यांचा कालावधी आधीच्या तुलनेत सरासरी 50 टक्क्यांनी वाढला आहे. ऑस्ट्रेलिया इन्स्टिट्यूटचे कार्यक्रम संचालक रिची मर्झियान यांनी हा तापमानवाढीच्या धोक्याचा स्पष्ट इशारा असून आम्ही भविष्यात काही तरी आक्रित घडेल, असा इशारा देत नसून सध्याच जे घडून आले आहे ते समोर मांडत आहोत, त्यामुळे हा अंदाज नसून पुरावा आहे, असे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियातल्या पोर्ट मॅक्वॅरिन एनएसडब्ल्यू यासारख्या काही स्थानिक परिसरात मोसमांच्या कालावधीत अधिक नाट्यमय म्हणावेत असे बदल अनुभवास येत आहेत. त्या भागात पारंपरिक उन्हाळ्यातले तापमान एक महिनाच नव्हे, तर 1950 आणि 1960 च्या तुलनेत पावणेदोन महिने अधिक टिकून रहात आहे.

1950 मध्ये ऑस्ट्रेलियातला उन्हाळा तीन महिन्यांचा होता. आता तो नोव्हेंबरच्या मध्यापासून मार्चच्या मध्यापर्यंत असतो. वाढत्या उन्हाळ्याच्या झळांचा विपरित परिणाम पर्यटन, बांधकाम आणि खाणकाम विभागांवर होत असून तापमानवाढीचा विपरित परिणाम प्रामुख्याने प्रदूषण करणार्‍या उद्योग-व्यवसायांवरच कसा होऊ शकतो, याचे हे एक उदाहरण आहे. यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियाला प्रचंड वणव्यांना तोंड द्यावे लागले. झुडपांना लागलेल्या वणव्यांमध्ये सुमारे एक कोटी 20 लाख हेक्टरमधली म्हणजेच सुमारे तीन कोटी एकरांमधली झाडे-झुडपे जळून गेली आणि जवळजवळ एक अब्ज प्राणी भस्मसात झाले. प्रदूषणाला झटपट आणि तीव्रतेने आळा न घातल्यास याहूनही अधिक उष्ण उन्हाळ्यांना तोंड द्यावे लागेल आणि आणखी प्रचंड विनाशकारी वणवे सहन करावे लागतील, असे या अभ्यासकांनी म्हटले आहे. आपल्या देशातही अनेक ठिकाणे छोटेमोठे वणवे लागायला सुरुवात झालीच आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!