Type to search

maharashtra फिचर्स संपादकीय

लोकशाहीचा उत्सव सुरू ठेवण्यासाठी…

Share

सुरेखा टाकसाळ

26 जानेवारी, भारताचा 70 वा प्रजासत्ताकदिन! आपल्याच देशात आपल्या स्वत:ला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त करणे, तेदेखील सत्याग्रह, अहिंसेच्या मार्गाने हे शंभर वर्षांपूर्वी जगात सर्वांनाच अशक्यप्राय, स्वप्नवत वाटले तरी भारतीय लोकांनी ते करून दाखवले!

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांना हा देश सोडावा लागला. भारताने प्रजासत्ताक पद्धतीची लोकशाही स्वीकारली. 26 जानेवारी 1950 रोजी ती देशात लागू झाली.

ब्रिटीश साम्राज्यशाहीविरुद्ध भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्याने वसाहतवादाच्या जोखडाखाली असलेल्या अनेक लहान-मोठ्या देशांना जशी स्वातंत्र्यासाठी प्रेरणा दिली, मार्ग दाखवला तशीच भारतासारखी प्रजासत्ताक पद्धतीही यापैकी अनेक देशांनी स्वीकारली आहे.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही दिवसांचे महत्त्व व त्यातील फरक सर्वांनाच माहिती असतो का? देशातील 30 ते 40 टक्के शालेय व महाविद्यालयीन (सुद्धा) विद्यार्थी, नोकरी, व्यवसाय करणारे व न करणार्‍या लोकांना या दोन दिवसांच्या नेमक्या तारखा व त्यातील फरक माहीत नाही. हे धक्कादायक सत्य आहे. वेळोवेळी प्रसिद्धी माध्यमे, परीक्षा, समाज माध्यमांवरही याची प्रचिती तुम्हाला आली असेल. याला कोण जबाबदार? स्वत: ही मंडळी आणि त्याचबरोबर शिक्षक आणि आई-वडीलसुद्धा !

प्राथमिक शाळेपासूनच 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताकदिन, असे शिकवले जाते. पण त्याचे महत्त्व, त्याचा अर्थ हे त्यांच्या मनावर  बिंबवले जात नाही, ही खेदाची बाब आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून देश करीत आलेल्या प्रगतीचे, विकासाचे अनोखे दर्शन प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात घडवण्याची प्रथा सुरू झाली ती देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कारकीर्दीपासून. तेव्हापासून दरवर्षी मोठ्या दिमाखात हे संचलन तेथील राजपथावर पार पडत आले आहे.

देशाची संरक्षणसिद्धता, तिन्ही सेनादलांची प्रगती, वेगवेगळ्या रेजिमेंटच्या आकर्षक गणवेशातील सैनिकांच्या तुकड्या, निमलष्करी दल, सीमा सुरक्षा दल, पोलीस दल, राज्यांचे चित्ररथ, सार्वजनिक उपक्रम व मंत्रालयाचे उपक्रम आणि कल्याणकारी योजना, वैज्ञानिक प्रगती, एन.सी.सी. कॅडेटस्चे संचलन, निवडक शाळा व राज्यांचे सांस्कृतिक व नृत्य नाट्य कार्यक्रम, जाँबाज सैनिकांच्या मोटारसायकलवरील चित्तथरारक कसरती आणि या परेडचा परमोच्च बिंदू म्हणजे भारतीय हवाई दलाच्या विमानांची राजपथावर आकाशातून राष्ट्रपती व पाहुण्यांना दिली जाणारी रोमांचक हवाई सलामी. राष्ट्रपती भवनच्या मागून राजपथावर येऊन इंडिया गेटवरून उंच आकाशात झेपावणारी ही विमाने… सारेच काही अभिमानास्पद!

भारत संघराज्य आहे. वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ हे प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये नेहमीच एक आकर्षण राहिले आहे. लहान-मोठी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उपक्रम, मंत्रालये, आपापले चित्रपट या परेडसाठी निवडले जावेत याकरिता भरपूर मेहनत करतात. सर्वसाधारणपणे देश व राज्याची संस्कृती, इतिहास, ऐतिहासिक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक वारसा, घडामोडी, घटना, प्रगती-विकास, निसर्गसंपदा अशा मध्यवर्ती कल्पनांवर आधारित या चित्ररथांपैकी उत्कृष्ट चित्ररथांना बक्षिसे दिली जातात.

महाराष्ट्र, गोवा, उत्तर पूर्वेतील काही राज्यांचे चित्ररथ नेेहमी लक्षवेधक असतात. महाराष्ट्रातील गणेशोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, तसेच कोकणातील हापूस आंब्यांच्या बागेपासून मोठमोठ्या बाजारात व परदेशात निर्यातीपर्यंतचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारा प्रवास अशा महाराष्ट्राच्या चित्ररथांनी आजवर प्रेक्षकांवर छाप पाडली आणि उपस्थितांची वाहवा मिळवली आहे. यावेळी मात्र महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार इत्यादी काही राज्यांचे चित्ररथ नाकारले गेले आणि त्याला राजकीय रंग चिकटला. जाणूनबुजून बिगर भाजप राज्यांचे चित्ररथ नाकारण्यात आल्याची टीका झाली. परंतु ती अनावश्यक आहे, अनाठायी आहे. कारण दीड तासाच्या परेडमध्ये सर्वच राज्यांच्या चित्ररथांचा समावेश होणे शक्य नसते.

मुख्य म्हणजे 26 जानेवारीची परेड (संचलन) व संचलनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन, व्यवस्थापन, संरक्षण मंत्रालय करत असते. चित्ररथांची निवड करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया असते.

आपापल्या चित्ररथाचा विषय, मध्यवर्ती कल्पना, तिचे बारीकसारीक तपशील, अवधी, आरेखन हे सर्व संरक्षण मंत्रालयाच्या निवड समितीकडे प्रथम सादर करावे लागते. गृह व संरक्षण मंत्रालय आणि अर्बन आर्ट कमिशनच्या अधिकार्‍यांची निवड समिती विषयाचे महत्त्व-प्रासंगिकता, तपशील, सजावट व सादरीकरण इ. निकषांवर चित्ररथांची परेडसाठी निवड करते.

उद्याच्या प्रजासत्ताकदिन परेडची अनेक वैशिष्ट्ये आहेत. परेड सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण दलांचे प्रमुख जनरल रावत, तिन्ही सेनाप्रमुख इंडिया गेट परिसरातील राष्ट्रीय युद्ध स्मारकमध्ये शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहतील. अवकाशात उंचावर शत्रूच्या सॅटलाईटचा भेद घेणारे ‘अ‍ॅन्टी सॅटलाईट मिसाईल’ ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार झालेली ‘धनुष’ ही तोफ, अमेरिकन अपाची अ‍ॅटॅक हेलिकॉप्टर व चिनूक हे हेवीलिफ्ट हेलिकॉप्टर या परेडमध्ये प्रथमच दिसतील. त्याचसोबत बहुचर्चित राफेल लढाऊ विमानांची प्रतिकृतीही पाहायला मिळेल.

अपाची व चिनूक हेलिकॉप्टर्स फ्लायपास्टमध्ये सहभागी असतील. मोटारसायकलवरील कसरतीमध्ये यावेळी प्रथमच डेअरडेव्हिल महिलांची तुकडीही कौशल्य दाखवणार आहे. तिन्ही सेना दलांच्या तुकड्यांमध्ये महिला सैनिकांचे दर्शन आता आश्चर्यकारक वाटायला नको.

एक काळ असा होता की, राजपथावर होणारी ही परेड पाहायला जाणे फार जिकिरीचे नसायाचे. मात्र गेल्या काही वर्षांपासून देशात दहशतवाद्यांच्या कारवाया व धोक्यामुळे सुरक्षा व्यवस्था व लोकांची कसून तपासणी करणे अपरिहार्य ठरले आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, प्रजासत्ताकदिन संचलनाचे प्रमुख पाहुणे, सर्व मंत्री व नेते, वेगवेगळ्या देशांचे उच्चायुक्त व राजदूत, वरिष्ठ अधिकारी आणि परेड पाहायला येणार्‍या हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परेडदरम्यान अनुचित घटना घडू नये, ती सुखरूप पार पडावी यासाठी संचलनाचा मार्ग राजपथ, इंडिया गेटचा परिसर येथे सुरक्षिततेमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे.

आतादेखील संचलनाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत येणार्‍या प्रमुख रस्त्यांवर सुरक्षा पहारे वाढले आहेत. संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले जात आहे. त्यांची कसून तपासणी होत आहे. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे सर्वांवर बारीक नजर ठेवून आहेत. इंडिया गेट परिसर, कॅनॉट प्लेस भागातील उंच इमारतींवर हत्यारबंद सैनिक खडा पहारा देत आहेत.

खबरदारीचे उपाय म्हणून या परिसरातील सर्व कार्यालये आज दुपारपासून बंद राहतील. इमारतींमध्ये प्रवेश बंद! इंडिया गेट परिसरातील मेट्रो स्टेशन्सदेखील उद्या सकाळी 6 पासून दुपारी 12 पर्यंत बंद राहतील. एवढेच नव्हे तर उद्या सकाळी 8 पासून दुपारी 12 पर्यंत दिल्लीमध्ये विमाने उतरणार नाहीत व दिल्लीतून उड्डाणही करणार नाहीत.

दिल्लीला एखाद्या अभेद्य किल्ल्याचे स्वरूप आले आहे. संपूर्ण सुरक्षिततेत यावर्षीही प्रजासत्ताकदिनाची परेड दिमाखात पार पडेल यात शंका नाही. परेड पाहणार्‍या भारतीयांची मान अभिमानाने ताठ होईल यात दुमत नाही. एकीकडे प्रजासत्ताकदिनाचा उत्सव साजरा होत असताना लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या या लोकांच्या देशात राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एनआरसी) नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) यांच्याविरोधात व समर्थनासाठी देशात अनेक शहरांमध्ये सध्या सुरू असलेली नागरिकांची निदर्शने बघितली तर जनमानसात अस्वस्थता, साशंकता आहे, असे दिसते.

विशेषत: यात तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांच्या मनातील शंका-कुशंका, संशय-भय यांचे निराकरण व्हायला हवे. त्यांच्याबरोबर किमान संवाद व्हायला हवा. म्हणजे परिस्थिती चिघळणार नाही, हाताबाहेर जाणार नाही. लोकशाहीचा उत्सव सतत चालू राहण्यासाठी सर्वांनीच दक्ष राहण्याची गरज आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!