Type to search

फिचर्स संपादकीय

स्मार्ट डिजिटल युग

Share

इलेक्ट्रॉनिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान या शाखांच्या सेंद्रिय सृष्टीशी झालेल्या संयोगामुळे जगभरात प्रत्येकाचे जीवन वेगाने बदलले आहे. बदलांचा हा वेग येत्या पाच-दहा वर्षांमध्ये सर्वव्यापी होईलच. त्याचा प्रत्यय अनेक क्षेत्रांमध्ये येईल हे महत्त्वाचे. 

डॉ दीपक शिकारपूर 

 

तंत्रज्ञान क्षेत्र सतत बदलत आहे. या बदलांचा आढावा घेण्याचे काम मोबाईल फोन म्हणजेच सेलफोनपासून सुरू करणेच योग्य ठरेल. यापुढे संगणक आणि इंटरनेट यांचा संयोग असलेल्या स्मार्टफोनमार्फत वापरकर्त्याला मिळू शकणार्‍या सुविधांची अक्षरशः गणतीच राहणार नाही! या सोयीसुविधा मिळवून देणार्‍या अ‍ॅप्सचा उद्योग अतिशय वेगाने वाढेल आणि त्यामुळे विपणन-वितरण, विक्री, विक्रीपश्चात सेवा, जाहिरात, देखभाल यासंदर्भातील सध्याची गणिते पूर्णपणे बदलतील.

संगणकीय प्रणालींमध्ये साठवल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या माहितीच्या साठ्यामध्ये विलक्षण वाढ होईल. ही माहिती व्यवस्थित साठवणे, हवी तेव्हा योग्य ती माहिती उपलब्ध करून देणे आणि तिचे सतत संपादन करणे हे अतिशय कौशल्याचे आणि कष्टाचे काम असणार आहे. या क्षेत्रातल्या कष्टांसाठी संगणकाच्या अफाट ‘प्रोसेसिंग कॅपेसिटी’चा भरपूर वापर होणार असला तरी शेवटी मानवी कौशल्यांची गरज भासणारच. त्यामुळे माहिती प्रक्रिया क्षेत्रामध्ये रोजगार वाढणार हे नक्की. इतकी माहिती साठवण्यासाठी प्रत्येकाकडे संगणक असण्याची गरज मात्र राहणार नाही. ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ हा शब्दप्रयोग काही वाचकांना माहीत असेल. या तंत्रानुसार, वैयक्तिक पातळीवर साधने विकत घेण्याऐवजी एका आभासी प्रणालीमध्ये सर्व माहिती साठवण्याची आणि ती वापरण्याची सोय केलेली असते. नजीकच्या काळातच औद्योगिक, वैयक्तिक तसेच इतर पातळ्यांवरचे विविध प्रकारचे क्लाऊड तयार होतील आणि त्यामुळे परस्पर संवादाचे आणि व्यवहारांचे चित्रच बदलेल. व्यवहारांची गती खूपच वाढेल. याचीच पुढची पायरी म्हणजे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि इतर संबंधित बाबी तात्पुरत्या करारावर भाड्याने मिळू लागल्यामुळे प्रत्येकाने वा कंपनीने विकत घेण्याची गरज राहणार नाही आणि तो पैसा इतरत्र वापरता येईल.

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ ही संकल्पना, सूक्ष्म संवेदक आणि बिनतारी नेटवर्क्सचा वापर करून उत्पादन आणि सेवा क्षेत्रातली बहुतेक सर्व यंत्रे परस्परांशी थेट संवाद साधतील. उत्पादनविषयक आज्ञावली देण्यापासून उत्पादित मालाचा दर्जा तपासणेे, इतकेच काय, किरकोळ दुरुस्त्यादेखील बहुतेक यंत्रे स्वतःच करतील आणि प्रत्येक ठिकाणी माणसाला हात काळे करून घेण्याची गरज राहणार नाही. ‘थ्रीडी प्रिंटर’बाबतही काहींना माहिती असेल. या तंत्रामुळे छोट्या-मोठ्या वस्तू वापरकर्त्याला घरीच बनवणे शक्य होणार आहे. मोठ्या कारखान्यांमधल्या उत्पादन

प्रक्रियांमध्येही बदल वेगाने होतील. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा वापर वाढेल, कारण जास्त क्षमतेच्या मायक्रोचिप्समुळे त्यांचा आकार घटून संवेदनक्षमता, निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता सुधारेल.

बदलत्या तांत्रिक संकल्पनांमुळे शिक्षण पद्धती आमूलाग्र बदलेल. हसत-खेळत शिक्षणाचे नवे मार्ग त्याची जागा घेतील. छापील पुस्तके, वृत्तपत्रे यांची संख्या कमी होऊ लागेल आणि त्याजागी इ-बुक्स वा इ-न्यूजपेपर्सचा वापर वाढेल. यामुळे इंटरनेटवरील साहित्याचे तसेच शैक्षणिक पुस्तकांचे स्वरूप अधिक मनोरंजक आणि देखणे बनेल आणि त्यामध्ये चटकन बदल घडवणेही शक्य होईल. सौर वा इतर ऊर्जास्रोतांवर आधारित संगणक तसेच स्मार्टफोन उपलब्ध झाल्याने हे शिक्षण तसेच वाचनाचे वेड दुर्गम भागापर्यंत पोहोचू शकेल.

नजिकच्या भविष्यात त्रिमिती आणि विविध अ‍ॅप्समुळे टीव्हीमध्ये फार मोठी क्रांती होईल. टीव्ही परस्परसंवादी बनेल आणि मुख्य म्हणजे त्यावरील कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीनुसार बनवता येतील ही तंत्रक्रांती आणखी एका महत्त्वाच्या क्षेत्रात हातपाय पसरेल. हे क्षेत्र म्हणजे बँकिंग आणि आर्थिक व्यवहार. स्मार्टफोन्समधल्या ‘निअर फिल्ड कम्युनिकेशन’ ऊर्फ एनएफसी या सुविधेचा समावेश वाढत जाईल आणि त्यामधून सध्या जरा क्लिष्ट आणि काही देशांपुरतेच मर्यादित असलेले इ-वॉलेट (इलेक्ट्रॉनिक पैसा-पाकीट) बहुतेकांच्या हातात येईल. खात्यात पैसे जमा करणे, दुसरीकडे हलवणे (फंडस् ट्रान्सफर) ही कामे आपण दोन-चार बटने दाबून बसल्या जागी करू शकाल. मुख्य म्हणजे बिले चुकती करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर जास्त प्रमाणात केला जाणार आहे. आर्थिक व्यवहार म्हटले की ओळख पडताळणी आणि सुरक्षितता हे मुद्दे आलेच. ओळख पटवण्यासाठी बोटांवरील रेषा आणि डोळ्यांमधले पटल यांसारख्या मानवी शारीरिक वैशिष्ट्यांचा (बायोमेट्रिक्स) वापर सध्या सुरू झालाच आहे, तो वाढत जाईल. असे दिसते की या सर्व सुविधांमुळे माणसाचे आयुष्य सुखकर होईल, त्याचे कष्ट वाचतील आणि वेळही.. परंतु या वाचलेल्या वेळाचा वापर मानवाद्वारे कशा प्रकारे केला जाईल? विधायक मार्गाने जाण्यासाठी की…? हादेखील विचार करणे आवश्यक वाटते.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!