Type to search

Featured अग्रलेख फिचर्स

वैश्विक समस्येचे मूळ कशात ?

Share

संपूर्ण विश्वाला त्रासून सोडणार्‍या कोरोना महामारीचे मूळ कशात आहे? हा संसर्गजन्य आजार इतक्या मोठ्या प्रमाणात कसा काय पसरतो आहे, याची कारणे शोधली जात असतील. एव्हाना काही संशोधकांनी तर शोधकार्य सुरुदेखील केले असेल. अमेरिकेत सीडीसी म्हणजे म्हणजे सेंटर फॉर डिसिज कंट्रोल या संस्थेच्या लोकांना ट्रम्प तात्यांनी कामाला जुंपले असेलही. पण आज अमेरिकेत कोरोना ज्या तीव्रतेने पसरला आहे आणि ज्या प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे, त्यामुळे ट्रम्प तात्या हतबल आहेत. भारताने निर्यातबंदी उठवून औषध पुरवठा करावा अन्यथा बदला घेऊ, असे विधान केले आहे. वास्तविक पाहता संसर्गजन्य आजार ही वैश्विक समस्या असून ती सोडवितांना सर्वच देशांच्या शासन व्यवस्थेपुढे मोठे प्रश्न निर्माण केले आहे.

या समस्येला पर्यावरणाला धोका निर्माण करणारा माणसाचा हव्यास कारणीभूत आहे. अनिर्बंध प्रगतीच्या हव्यासापोटी मानवाने या समस्या स्वतःवर ओढवून घेतल्या आहेत का? याची कारणमीमांसा संशोधक करतीलच. साथीचे आजार आणि त्यातून होणारी जीवितहानी ही भारतासह जगाला नवीन नाही. गेल्या पंचवीस-तीस वर्षात साथीच्या आजारांनी धुमाकूळ घातला आहे. प्राणी, पक्षी, कृमी, कीटक यापासून काही साथीचे आजार आले आणि माणसाच्या मानगुटीवर बसले आहेत. डेंग्यू, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, चिकणगुन्या, झिका व्हायरस, इबोला आणि आताचा कोरोना व्हायरस व इतर आजार बळावले आहेत. फार पूर्वी प्लेग, कॉलरा, देवी, पोलिओ अशा आजारांनी माणसे त्रस्त झाली होती. पण देवी कॉलरा, पोलिओ आणि प्लेगवर नियंत्रण मिळवले.पण वटवाघळे, डुकरे, माकडे, उंदीर, घुशी, खार असे मानवी वस्तीत राहणार्‍या या प्राणी पक्ष्यांनी साथीचे आजार पसरवल्याचे समोर आले आहे.

पर्यावरणावर माणसाचे आक्रमण, बेसुमार वृक्षतोड, यामुळे जंगलातील प्राणी पक्षी कृमी-कीटक यांचा अधिवास नष्ट झाला आहे. त्यांचा मानवी वस्त्यात रहिवास वाढल्याने अलीकडच्या 50/ 60 वर्षात साथीचे आजार पसरल्याचे निदर्शनास आले आहे. मीच माझा रक्षक असे म्हणणार्‍या माणसाच्या चुका तर याला कारणीभूत नाहीत ना, याचे सिंहावलोकन करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन आज आहे उद्या नसेल; पण सर्वांच्या भल्यासाठी शासन व्यवस्थेने सांगितलेल्या सोशल डिस्टन्सिंग, हात धुण्याचा आणि सध्यातरी घरी राहण्यात देशाचे आणि राज्याचे हित सामावले आहे नाही का?

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!