Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedद्राक्ष, केळी आणि पवार !

द्राक्ष, केळी आणि पवार !

राज्यातील शेतकर्‍यांनी आता कळ सोसायला हवी, कोरोनामुळे आर्थिक नुकसान होणार आहे हे बळीराजाने समजून घ्यावे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदराव पवार यांनी फेसबुकवरून राज्यातील शेतकर्‍यांशी संवाद साधताना केले आहे.

पवार हे राजकीय नेते असले तरी ते आधी उत्तम शेतकरी आहेत. कोरोना आणि अवकाळीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीने ते स्वतः हतबल आणि चिंताक्रांत आहेत. कालच्या त्यांच्या संवादातून खान्देशातील द्राक्ष आणि केळी पिकांबाबत उल्लेख झाला. त्यांची स्वतःची केळी तयार आहे पण कापली जात नाहीये. द्राक्ष बागांमधील हजारो टन माल झाडावर तयार आहे पण निर्यात होऊ शकत नाही. हीच परिस्थिती राज्यातील सर्वच फळपिकांची झाली आहे.

- Advertisement -

म्हणजेच कोरोनाचा सर्वाधिक फटका कृषिक्षेत्राला बसला आहे. संकटाच्या काळात थोडे नुकसान सोसण्याची तयारी ठेवावी लागेल, हे त्यांचं अनुभवाचं मत आहे की, राजकारणातील श्रेष्ठींचं मत आहे, हा प्रश्न अलहिदा असेल. कृषिमंत्री असताना खान्देशातील केळीवरील करपा निर्मूलनासाठी 60 कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचे त्यांनी संवादात सांगितले. 2012 साली खान्देशात केळी करपा रोगाने खराब झाली होती.

तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांनी हा प्रश्न संसदेत लावून धरला होता आणि पवारांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर शरद पवारांनी फैजपूर येथे शेतकरी मेळाव्यात राज्यातील फळपिकांसाठी 110 कोटींचे पॅकेज दिले होते. करपासारख्या रोगासाठी पवारांनी त्यावेळी जसे प्रयत्न केले तसेच ते कोरोनाग्रस्त शेतकर्‍यांसाठी करतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. कोरोना हा जसा शेती व्यवसायावर परिणाम करणार आहे; तसाच त्याचे अर्थव्यवस्थेवर गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होतील, यामुळे सर्वांचेच आर्थिक गणित बिघडणार आहे.कोरोनासंदर्भात केंद्राने दिलेल्या पॅकेजमध्ये शेतीमाल खरेदी आणि निर्यातीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

शेतकर्‍यांना पीककर्ज फेडणे शक्य होणार नसल्याने राज्यातील शेतकर्‍यांना पीककर्जफेडीसाठी चार ते पाच वर्षाचे हप्ते पाडून देण्याचा सरकारने विचार करायला हवा. 15 एप्रिलच्या लोकडाऊननंतर सरकार कोणते निर्णय घेते, यावर सर्व अवलंबून आहे. जागतिक स्तरावर कोरोनाचे संकट तीव्र होत असताना देशातील आणि विशेषत: राज्यातील कृषिक्षेत्रात मोठा फटका बसला आहे.

या महामारीने देशाच्याच नव्हे तर जगाच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन विपरित परिणाम होणार आहे. हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही. कोरोनामुळे कृषिक्षेत्राची, कृषिमालाची वाट लागली आहे. देशांतर्गत दळणवळण ठप्प झाल्याने शेतीमालाची बाजारपेठेत ने-आण बंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या