Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedमाहितीच्या महापुरात किती बुडणार ?

माहितीच्या महापुरात किती बुडणार ?

कोरोनाचा प्रादुर्भाव अजून आटोक्यात आलेला नाही. लॉकडाऊनचा मुक्काम आणखी वाढला आहे. तो कधी संपेल हे कोणीच सांगू शकत नाही. करोनाचा संसर्ग वाढत आहे तसतसा करोना विषयीच्या माहितीचा महापूरही वाढत आहे. महापूरही ’ दिन दुगना रात चौगुना ’ या गतीने वाढत आहे. सगळ्यांनाच या विषयावर व्यक्त व्हायची उबळ स्वस्थ बसू देत नाही. 130 कोटी लोकसंख्येच्या या देशात करोनाशिवाय सध्या दुसरे काही घडतच नाही अशा आविर्भावात हे सारे सुरु आहे. करोनाचा विषाणूचे अस्तित्व जगाला नवीन आहे. त्याच्याविषयीचे शास्त्रीय सत्य सांगणारा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही असे संशोधकांनी सुरुवातीलाच जाहीर केले होते. तथापि समाजमाध्यमांवर मात्र अनेक स्वयंघोषित तज्ञ् रोज उदयाला येत आहेत. ज्याला जी माहिती मिळेल ती समाजमाध्यमांवर टाकली की आपले नाव अजरामर होईल असा त्यापैकी बहुतेकांचा कयास असावा.

करोनाची सगळी माहिती जणू काही आपल्यालाच माहिती आहे अशा थाटात हे सारे सांगितले जात आहे. माहितीच्या या कडेलोटात कोणीही मागे नाही. हिंदुत्वाच्या अभिमान्यांना मात्र करोनाचा शोध आता वेद वाग्मयात सुद्धा आढळला आहे. ते हजारो वर्षांच्या सनातनत्वाचा आणि पुरातनत्वाचा हवालाही देत आहेत. ग्रहगोलांच्या निराधार आधारे आता तर करोनाचे यापुढील कालातील भविष्य सांगणारे कुडमुडे ज्योतिषीसुद्धा ध्वनिचित्रफिती बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित करत आहेत. तोंडाला मास्क बांधा. घराबाहेर पडू नका. दक्षता बाळगा. असे सरकार सांगत असताना ज्योतिषी मात्र त्या सूचनांना आणखी फाटे फोडत आहेत. नव्या शेंड्या जोडत आहेत. अमुक करा म्हणजे तमुक होईल असे बजावत आहेत.

- Advertisement -

माहितीच्या या घोडदौडीत दूरचित्रवाहिन्याही मागे नाहीत. करोनाचे रुग्ण कसे वाढत आहेत? जगात काय सुरु आहे? साथ वाढत आहे की आटोक्यात येत आहे? साथ कोणत्या टप्पात किंवा वर्गात पोचली आहे? अशा अनावश्यक माहितीचा रतीब 24 तास लोकांच्या डोक्यावर आदळत आहे. जनतेला घाबरवून सोडण्याचा सर्व प्रसिद्धी माध्यमांनी कट केला असावा अशीच एकूण परिस्थिती आहे. जागतिक स्तरावरील नवख्या तज्ज्ञांचा हवाला देऊन नवनवी मते मांडली जात आहेत. करोना परत येणार आहे, परत कधीच येणार नाही, जग साथीच्या दुसर्‍या मुक्कामावर आहे, तिथून तिसर्‍यावर कधी जाणार आहे? यावर बद्दलचे नगारे वाजत आहेत. याविषयी तज्ञांमध्येही एकमत आढळत नाही. अर्थात तेही चूक कसे म्हणावे? दुसर्‍या तज्ज्ञांचे मत मान्य करणार्‍या तज्ज्ञाची तज्ज्ञता त्यामुळे संशयास्पद ठरते. कोणाही तज्ञाला आपली तज्ज्ञता धोक्यात आणून कसे चालेल ? लोकांना याविषयी सखोल माहिती व्हायलाच हवी का? याचा विचार सध्यातरी एखादयाही तज्ञाला करावासा वाटू नये हे जनतेचे सुदैव म्हणावे कि दुर्दैव? लॉकडाऊनमुळे समाजातील हालचाल पूर्ण थंडावली आहे. ती पुन्हा कधी सुरु होणार हे भविष्य कोणी ज्योतिषी किंवा तथाकथित तज्ञ का सांगू इच्छीत नाहीत. त्याबद्दल न बोलण्यामुळे त्यांचे सर्व अंदाज, तर्क आणि भविष्य या केवळ रिकामपणाच्या पोकळ गप्पा ठरतात हे लक्षात येऊ नये हीच या तज्ज्ञांच्या तज्ञतेची मर्यादा !

लॉकडाऊनची मुदत पुनःपुन्हा वाढवली जात आहे. अमुक दिवशी तो नक्की उठवणार हे सांगण्याची जबाबदारी सरकार सुद्धा स्वीकारत नाही. किंबहुना तो निर्णय केंद्राचा की राज्यांचा हे ही जनतेला ठरवता येऊ नये अशा पद्धतीने निर्णय जाहीर होत आहेत. कधी एकदाचा लॉकडाऊन सम्पतो हे समजावे यातच जनतेला रस आहे. हे कोणीतरी लक्षात घेणार का? नाहीतर दिवसेंदिवस अस्वस्थता वाढत जाईल, जनतेचा असंतोषही वाढत जाईल. याची दखल संबंधित सर्वानी घेणे ही आजची खास गरज आहे. अस्वस्थ जनतेला पंतप्रधान याविषयी आश्वस्त करतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या