Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedभारतीय संस्कृतीची जिवंत शिल्पे हरपली !

भारतीय संस्कृतीची जिवंत शिल्पे हरपली !

गेल्या दोन दिवसात भारतीय चित्रपटसृष्टीला दोन जबरदस्त हादरे बसले. परवा अभिनेते इरफान यांच्या मृत्यूच्या वार्तेने हादरलेल्या रसिकांना काळ ऋषी कपूर यांच्या मृत्यूने दुसरा हादरा बसला. कपूर घराणे भारतीय सिनेसृष्टीचे आधारस्तंभ मानले जाते. ऋषी कपूर हे कपूर घराण्याच्या तिसर्‍या पिढीतील आघाडीचे कलाकार होते. ’ मेरा नाम जोकर ’ मध्ये ते बाल कलाकार म्हणून चमकले व त्यांना सर्वश्रेष्ठ बाल कलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तो त्यांचा पहिला चित्रपट होता. पुढे त्यांच्या अनेक चित्रपटातील अनेक भूमिका गाजल्या.

तेव्हापासूनच त्यांनी भारतीय सिनेसृष्टीवर आपला ठसा उमटवला. कपूर घराण्याचे वारसदार म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल टाकले आणि आपल्या दमदार अभिनयाने तो वारसा समर्थपणे पुढे चालवला. सिनेरसिकांच्या 2-3 पिढ्यांवर त्यांच्या अभिनयाचे गारुड होते. त्या तीनही पिढ्याना ते आपलेच वाटले. कपुर घराण्याने भारतीय संस्कृतीच्या प्रसारात मोठे योगदान दिले. त्यांच्या चित्रपटात भारताच्या संस्कृतीतील सहिष्णुतेचा प्रभाव सतत जाणवतो. भारतीय संस्कृतीतील सहिष्णुतेचा उदो उदो करणारी भूमिका इरफान यांनी सुद्धा प्राणपणाने पुढे नेली. या दोघांच्याही स्वभावात माणुसकी ओतप्रोत भरलेली होती.

- Advertisement -

इरफान पठाण घराण्यातील ! त्यांच्या कुटुंबातील सदस्य वन्यपशूंची शिकार करायचे. पण शिकारी ज्या वन्य प्राण्याला मारतो त्याच्या कुटुंबाचे काय होत असेल असा प्रश्न इरफान यांना सतत अस्वस्थ करत असे. त्यामुळे इरफान यांनी मात्र शिकार करायचे कायमच नाकारले. पठाण असूनही ते पूर्ण शाकाहारी होते. सुरुवातीला चित्रपटसृष्टीत ते इरफान खान म्हणून ओळखले जात. पण गेल्या दशकात त्यांनी त्यांच्या प्रचलित नावातील खान शब्द वगळून टाकला. नावावरून धर्माचे शिक्के मारणे योग्य नाही असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी नावात बदल केला. आपल्याला फक्त मानवता धर्मासाठी ओळखले जावे अशी त्यांची प्रखर निष्ठा होती. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ’ सलाम बॉम्बे ’ या चित्रपटाने झाली. त्यांचेही अनेक चित्रपट गाजले. ’ हैदर ’ चित्रपटाचे शूटिंग श्रीनगर येथे सुरु होते. त्यावेळी अचानक त्या परिसरात गर्दी जमा झाली. जमाव घोषणाबाजी करू लागला. वातावरणात तणाव भासू लागला. इरफान यांच्या गाडीवर काही दगड पडले. त्यावेळी इरफान गाडीत नव्हते. पण दगडफेकीची घटना ऐकताच ते जमावाला सामोरे गेले. जमावाला नमस्कार केला. त्यांच्या नमस्काराने चमत्कार झाला. जमाव शांत झाला. त्या घटनेची चर्चा अजूनही फावल्या वेळी चित्रपट कलाकारात होत असते.

देश सध्या करोनामुळे लॉकडाऊन आहे. समाजात बरीच अस्वस्थता आहे. काही ठिकाणी आरोग्याचे सर्वेक्षण करणार्‍या आरोग्यरक्षकांवर आणि कायदा-सुव्यवस्था राखणार्‍या पोलिसांवर हल्ले होत आहेत. पोलीस, आरोग्यरक्षक जनतेचे जीवन सुरळीत चालावे म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालतात. त्यांना मारू नका. त्यांच्यावर हल्ला करू नका. त्यांचा सन्मान ठेवा असे आवाहन ऋषी कपूर यांनी रसिकांना नुकतेच केले होते.

दोघेही दिवंगत अभिनेते कमालीचे सज्जन व विनम्र होते. त्यांच्या वागण्यातून भारतीय संस्कृतीच्या उदात्ततेचे प्रत्यक्ष दर्शन होत असे. सध्याच्या भारतीय आयुर्मानाच्या तुलनेत दोघेही अल्पायू ठरले. केवळ 54 वर्षे वयात इरफानचा मृत्य ओढवला तर ऋषी कपूर 67 व्या वर्षी जीवनयात्रा संपवली. त्यांच्या वयाबाबतचा एक योगायोग आश्यर्यकारक म्हणावा लागेल. आजोबा पृथ्वीराज वयाच्या 65 व्या वर्षी, वडील राज कपूर 66 व्या वर्षी तर ऋषी 67 व्या वर्षी वारले. हा एक विचित्र योगायोग. दोघांना ’ देशदूत’ ची आदरांजली.

- Advertisment -

ताज्या बातम्या