Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदारुत बुडाली ‘वर्दी’

दारुत बुडाली ‘वर्दी’

दारू व्यवसायात भागिदारी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यावरून पोलीस निरीक्षकांसह तीन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी बडतर्फीचे तसे आदेश जारी केले आहेत. दारू ही वाईट असतेच पण ती तर खाकी वर्दीचाच घात करून गेली. एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या निरीक्षकाची पार्टनरशिप उघड झाली आहे. कदाचित त्यांनी ‘मयखाना मेरे नाम कर दे’ असे स्वप्न पाहिले असेल पण ‘एकच प्याला’ बडतर्फीची झिंग आणेल, याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल.

पण त्यांचे दुर्दैव दुसरे काय? जळगावच्या आर. के. वाइन्सची लॉकडाऊन काळातील अवैध दारू वाहतूक, परवानाधारक आणि त्यांच्या भागिदारास चांगलीच महागात पडली. परवाना कायमस्वरूपी रद्द झाला आणि भागिदारांच्या नोकर्‍याही गेल्या. कायद्याचे आणि जनतेचे रक्षण करणारे आज गुन्हेगाराच्या रांगेत येऊन बसले आहेत. त्या चौघांच्या गैरकृत्याने खाकी वर्दीला काळिमा फासला गेला असून पोलिसांवर असलेल्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे.

- Advertisement -

चारच महिन्यांपूर्वी नाशिक पोलीस अकादमीच्या दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या कष्टाने कमावलेल्या वर्दीला डाग, कलंक लागू देऊ नका, असे आवाहन केले होते. त्याच नाशिक परिक्षेत्रातील जळगावात एका अधिकार्‍यांसह तीन पोलिसांनी वर्दीला डाग लावण्याची ‘गुस्ताखी’ केली आहे. खाकी वर्दीला डाग लागण्याची ही काही पहिलीच घटना नाही, यापूर्वीही राज्यात अशा अनेक घटना पोलीस आणि त्याचे खाते बदनामीला कारणीभूत ठरले आहे.

या एका घटनेमुळे सर्वच वाईट आहेत, असे नाही. अनेकांनी उत्कृष्ट कामगिरीने वर्दीचा मानसन्मान वाढविला नाही तर प्रसंगी प्राणांची बाजी लावणारे अधिकारी कर्मचारी कमी नाही. पण अशी एखादी घटना त्याचं मातेरं करून जाते, हे खेदाने नमूद करावे लागते. नुसत्या बडतर्फीने प्रश्न संपणार नाही, असा मस्तवालपणा वर्दीतल्या माणसात येणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल अशी अपेक्षा बाळगूया. लॉकडाऊन सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने आर.के. वाइन्सचा गोरखधंदा उजेडात आणला आणि आपल्याच खात्याच्या अधिकार्‍याच्या पडद्याआड सुरू असलेल्या गैरकृत्याची माहिती उघड झाली. यातून काही सुधाकर आणि काही तळीराम बोध घेतात काय, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या