Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedझुलवाकार तुपे गेले !

झुलवाकार तुपे गेले !

झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. मराठी इयत्ता 3री इतके अल्प शिक्षण घेतलेल्या तुपे यांची 52 पुस्तके प्रकाशित झाली असून महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात ती अभ्यासली जात आहेत. जळगाव येथे भरलेल्या कामगार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. एव्हढा प्रतिभा संपन्न लेखक असूनही दारिद्र्य आणि हलाकिने मरेपर्यंत त्यांची पाठ सोडली नाही.

गेल्या काही महिन्यापूर्वीच त्यांची पत्नी जिजा यांचे पक्षाघात झाल्याने निधन झाले आणि त्यानंतर उत्तम तुपे यांनाही त्याच आजाराने ग्रासले होते आज सकाळी खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मातंग समाजातील जन्म, पर्जन्यछाया प्रदेशातील खटाव तालुक्यातील एनकूळ या कायम दुष्काळी गावात पोटभरायचे साधन नसल्याने त्यानी गाव सोडले आणि पुण्यात एका बकाल झोपडपट्टीत राहून त्यांनी पडेल ती कामे केली.अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची प्रेरणा घेऊन त्यांनी मातंग समाजाच्या व्यथा, स्त्रियांवरील अत्याचार आणि वास्तवाचे चित्रण त्यानी मांडले.

- Advertisement -

आंदण ही त्यांची पहिली कादंबरी 1984 ला तर कोबारा 91 मध्ये आली. पण तुपे यांना खरी लोकप्रियता लाभली ती झुलवा मुळे. यल्लमा देवीला सोडलेल्या जोगतींन आणि देवदासीच दुःख आणि वेदना त्यांनी जगासमोर आणल्या त्यासाठी जोगतीनचा वेष प्रधान करून त्यांनी गावोगाव भटकंती केली.त्यांच्या अनेक कादंबर्‍याना पुरस्कार प्राप्त झाले होते.गेल्या वर्षी इले. माध्यमातून त्यांच्या हलकीच्या परिस्थितीचे सत्य जगासमोर आले तेव्हा मुख्यमंत्री निधीतून 5 लाख रुपये मदत देण्यात आली होती.

पुण्यातील वाकडेवाडी झोपडपट्टीत घर बांधून देण्यात आले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य करण्यात आले होते. महाराष्ट्रातील दलित साहित्यातील शंकरराव खरात, बंधुमधव, केशव मेश्राम या अग्रणी साहित्यिका सोबत उत्तम बंडू तुपे त्यांचेही नाव अग्रस्थानी होते. 1997 साली जळगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात झालेल्या कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद उत्तम बंडू तुपे यांनी भूषविले होते.

प्रेमिकांच्या काल्पनिक कथा त्यानी कधी मांडल्या नाहीत त्यामुळे अभिजात म्हणविणार्‍या अभिजनाच्या साहित्याने त्यांची म्हणावी तशी दखल घेतली नाही, दलितांचे, शोषितांचे आणि स्त्रियांचे दुःख उत्तम बंडू तुपे यांचा केंद्र बिंदू होता . अतिशय खडतर जीवन ते जगले. आज झुलवा लोकांना माहीत आहे. वामन केंद्रे, चेतन दातार माहीत असतील किंवा जगणं जोगतींनची भूमिका करणारा नट माहीत असेल पण झुलवा कादंबरीचा लेखक माहीत नसेल ही उपेक्षा घेऊनच तुपे सर्वाना सोडून गेले.

- Advertisment -

ताज्या बातम्या