Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedआशेचे किरण !

आशेचे किरण !

महाराष्ट्र राज्यात करोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे. यातील दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबई शहरात आहेत. तीन हजारांच्या पुढे रुग्णसंख्या गेलेले महाराष्ट्र हे अजून एकमेव राज्य आहे. राज्यातील 194 रुग्ण करोनामुळे दगावले आहेत. कालपर्यंत 20 लाखांपेक्षा जास्त लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. राज्यात 71 हजार पेक्षा जास्त लोकांना घरात सक्तीची स्थानबद्धता बहाल करण्यात आली आहे.

डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या साडेपाच हजारांपेक्षा जास्त चमू (टीम) सर्वेक्षण करत आहेत. केंद्र सरकारने राज्यातील 11 जिल्ह्यांचा समावेश करोनाच्या हॉटस्पॉट यादीत केला आहे. त्यात नाशिकसह मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. करोनाचा असा हैदोस सुरु आहे तरी परिस्थिती वाटते तितकी निराशाजनक नाही. बरे होऊन घरी परतणार्‍या रुग्णांची संख्या सुद्धा बरीच आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद साधला. त्यात ही दिलासादायक बाब त्यांनी जनतेला सांगितली होती. कालपर्यंत 52 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठ्वले गेले होते. त्यापैकी 60 ते 70 % नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. करोनाच्या रुग्णवाढीचा वेग मंदावला असावा असे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. राज्यातील 290 पेक्षा जास्त रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. करोनाला घाबरू नका. उपचार करणार्‍या डॉक्टरांवर विश्वास ठेवा. वैयक्तिक स्वच्छतेचे भान ठेवा अशा भावना करोनामुक्त झालेल्या रुग्णांनी व्यक्त केल्या आहेत. करोनाशी युद्ध करण्यासाठी उपयुक्त यंत्रसामग्री तयार करण्याचा प्रयत्न संशोधक आणि तंत्रज्ञ करत आहेत. ती कमी खर्चात उपलब्ध व्हावी यावरही लक्ष केंद्रित केले आहे.

पोर्टेबल व्हेंटिलेटर बनवण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. धीरजकुमार महाजन हे आयआयटीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी करोनाविषाणूपासून बचाव करू शकेल असा तंबू बनवला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची ओळख पटवू शकेल असे ’ संपर्क ओ मीटर ’ हे ऍप बनवले आहे. अशा संशोधनाचा व्यावहारिक पातळीवर उपयोग सुरु होण्यासाठी पुरेसे प्रयत्न व्हायला हवेत. करोनाची साथ आटोक्यात यावी यासाठी सरकार शक्य ती दक्षता घेते आहे.

सरकारच्या उपाययोजना आणि रुग्णांचे सहकार्य यामुळे करोनाची साथ लवकर आटोक्यात येऊ शकेल अशी आशा पल्लवित झाली आहे. एकत्रित प्रयत्नांनी रुग्ण बरे होऊन घरी परत जात आहेत. करोनाला अटकाव करण्याचे प्रयत्न असेच सुरु राहावेत आणि त्याला उत्तरोत्तर वाढते यश येत राहो अशीच जनतेची अपेक्षा असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या