Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedपरिस्थिती बघून शहाणे होणे बरे !

परिस्थिती बघून शहाणे होणे बरे !

कोरोना विषाणुच्या उद्रेकानंतर नागरिकांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. ते निर्बंध मोडणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल असे सरकार सुरुवातीपासून बजावत होते. तरीही निर्बंध धाब्यावर बसवणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून आता सरकारने नाईलाजाने कारवाई सुरु केली आहे. निर्बंध धुडकावून लावणार्‍या 27 हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर आत्तापर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत. शहरी भागातील लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. त्यामुळे शहरी भागातच जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. 27 हजारांपैकी पुणे शहरातच जास्त संख्येने गुन्हे दाखल झाले आहेत.

रस्त्यावर फिरणारी 12 हजारांपेक्षा जास्त वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. शहरी भागात जास्त शिक्षित लोक राहातात. त्यांना इतरांपेक्षा जास्त कळते असा सर्वसाधारण समज आहे. माणसे शिकली म्हणजे शहाणी होतील. सुसंस्कृत होतील. समजदार होतील. असे कधीकाळी समाजसुधारकांना वाटायचे! तथापि हे सारे भ्रम आहेत हे सिद्ध करण्याचा विडा शहरी शिक्षितांनी उचललेला असावा. बेशिस्त वर्तनाने ते सिद्ध करून दाखवण्याचे त्यांनी ठरवले असावे का? ग्रामीण भागातील अनेक गावे, वाड्या व पाडे यांनी उत्स्फूर्तपणे आपापल्या गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. गावकर्‍यांनी कोणत्याही सबबीखाली सीमा ओलांडू नये म्हणून पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. पण त्यांच्या तुलनेत स्वतःला शिक्षित समजणार्‍या शहरी भागात मात्र निर्बंध मोडण्याची जणू चढाओढ सुरु आहे. जीवाची जोखीम पत्करावी लागली तरी चालेल, वाहन जप्त झाले तरी चालेल एकदा तरी घराबाहेर पडून निर्बंध मोडूच असा निर्धार शहरी लोकांनी का केला असावा? ’ पुणे तेथे काय उणे ’ हा वाकप्रचार मराठी मुलखात रूढ आहे.

- Advertisement -

पण पुणेकरांनीच त्याला हरताळ फासण्याचे का ठरवले असावे? आपल्या बौद्धिक कुवतीवर पुणेकरांचा जरा जास्तच भरोसा असावा. म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती कशी मानवणार? पुण्यातील भरघोस शहाणपणाच्या जोरावर पेशवाई तरली आणि पुणेकरांनी ठरवले तेव्हा मुळामुठेच्या संगमात विसर्जित सुद्धा झाली. पुणेकर मात्र तो पुणेरी वारसा विसरू इच्छित नसावेत. म्हणूनच कदाचित शहाणे पुणेकर कोणाचे का ऐकतील? त्यामुळे पुण्यात तर निर्बंध मोडले जातातच पण त्या पुणेरी बाण्याचे अनुकरण राज्यात अन्यत्र सुद्धा होऊ लागले आहे. पण सध्याची संकटाची चाहूल गांभीर्याने लक्षात घेऊन मराठी मुलखातील जनतेने आपल्या शौर्याचा वारसा आवश्यक निर्बंध पाळून प्रदर्शित करावा हेच बरे!

- Advertisment -

ताज्या बातम्या