सहिष्णुतेचे हिंस्त्र प्रदर्शन

0
महाराष्ट्रातील शेतकरी संप विधायक पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी हालचाली सुरू असताना मध्य प्रदेशात मात्र शेतकरी संपाचा वणवा राज्यभर पसरला आहे. या आंदोलनाची धग राजस्थानपर्यंत पोहोचली आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर येथे सुरक्षा दलांच्या गोळीबारात ६ आंदोलक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकार्‍यांना धक्काबुक्की केली.

अनेक वाहने पेटवून दिली. मंदसौर शहर आणि पिपलिया मंडीत संचारबंदी असूनही शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. भारतीय संस्कृती विविधतेतून एकतेसाठी व सहिष्णुतेसाठी जगभर ओळखली जाते, असा तमाम भारतीयांचा समज आहे. मध्य प्रदेश तसा ‘शांत मुलूख’ म्हणून ओळखला जातो. या प्रदेशात निसर्गाची अनुकूलता आहे. उत्कृष्ट शेती उत्पादक राज्य म्हणून हा प्रदेश प्रसिद्ध आहे.

राणी अहिल्याबाई होळकर, महाराणी कमलापती, राणी दुर्गावती या महिला शासकांनी घालून दिलेला उत्कृष्ट शासनाचा मानदंड आजही आदर्श मानला जातो. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कृषी क्षेत्र हा कणा आहे. तरीही या राज्यातील फक्त शेतकरीच या सहिष्णुतेपासून वंचित कसे? न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ त्यांच्यावर का आली? कोणी आणली? या राज्यातील ‘व्यापमं’ घोटाळाही देशभर गाजला.

या घोटाळ्यात आजवर २४ आरोपींसह घोटाळ्याशी संबंधित ५० हून अधिक जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. मोठमोठ्या गणंगांसह दोन हजारावर लोकांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे राजभवन, मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. सध्याचे आंदोलन कदाचित फक्त शेतकर्‍यांपर्यंत मर्यादित नसेलही.

जनतेच्या मनात राज्यकर्त्यांबद्दलचा असंतोष आणि राज्यकर्त्यांची संवेदनशून्यता वाढली तर ती खदखद कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यक्त होतेच. सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला जनमानसातील असंतोषाचीही साथ असावी अशी चर्चा आहे. ‘व्यापमं’चा उरलेला धूर शेतकरी संपाच्या माध्यमातून निघत असेल का? की सध्याचे आंदोलन ही सरकारमान्य अराजकता मानावी? पक्षोपपक्षांचे कुरघोडीचे राजकारण जनतेला जाचक ठरू लागले की अराजकतेचा धोका वाढतो.

जनतेचा रोष सत्तापालट करू शकतो. मध्य प्रदेशच्या निमित्ताने हा धडा देशातील सर्व राज्यांनी घेण्याची गरज आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हे सूत्र सर्वांनीच सतत लक्षात ठेवण्यावर या देशाच्या भवितव्याची उज्ज्वलता अवलंबून आहे. सध्याचे वातावरण जनतेच्या मनात तो विश्‍वास निर्माण करण्यास पुरेसे आहे का? याचा राज्यकर्ते गांभीर्याने विचार करतील का?

LEAVE A REPLY

*