पारदर्शकतेवर शिक्कामोर्तब

0
मतदान यंत्रात (ईव्हीएम) फेरफार करता येतो, असा आरोप करणार्‍या राजकीय पक्षांना मतदान यंत्र ‘हॅक’ करून दाखवण्याचे खुले आव्हान निवडणूक आयोगाने दिले होते. त्यासाठी परवा ‘हॅकेथॉन’चे आयोजन करण्यात आले. हे आव्हान केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि माकपने स्वीकारलेे.
मात्र आव्हान पेलणारे हे पहिलवान पक्षसुद्धा प्रात्यक्षिकात सहभागी झालेच नाहीत. त्यांचे आव्हान ‘फुसका बार’ ठरला. निवडणूक आयोगाच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह लावण्याचे राजकीय पक्षांचे राजकीय हेतूने प्रभावित आरोप खोटे ठरले. निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारण्याची हिंमत दाखवणारे पक्षसुद्धा ऐनवेळी निष्क्रिय का राहिले?

हेच राजकीय पक्षांना चोख उत्तर ठरावे आणि सणसणीत चपराकसुद्धा! यानिमित्त निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पारदर्शीपणा अस्सल सोन्यासारखा तावून-सुलाखून निघाला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे ही राजकीय पक्षांची खोड जाता जात नाही.

निवडणूक आयोग हा सरकारी यंत्रणेचा एक स्वायत्त भाग! असा आयोग नाहक पक्षोपपक्षांच्या राजकारणात ओढला गेला होता. सरकारी व्यवस्थेवर व यंत्रणेवर अशा तर्‍हेचे शिंतोडे उडवणे योग्य नाही. सरकारी नोकरशाहीवर वेगवेगळे आरोप नेहमीच होत असतात. जनतेलाही त्याचा अनुभव येतो.

परंतु सर्वच यंत्रणा भ्रष्ट नसतात. देशाच्या लोकशाहीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्‍या निवडणूक आयोगावरच विरोधी पक्षांनी ठपका ठेवला होता. तो आक्षेप खोडून काढणे आयोगाला क्रमप्राप्त होते. मतदान यंत्रात बदल करून व इतर पक्षांची मते भाजपकडे वळवून भाजपला विजयी केल्याच्या आरोपात तथ्य नाही, हे देशातील जनतेला पटवून देणे आवश्यक होते.

या आरोपामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि पारदर्शकतेबद्दल संशय निर्माण करण्याचा खेळ केला गेला होता. अखेर विरोधी पक्षांचे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे सिद्ध करण्यात आयोग यशस्वी ठरला आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो.

एखादे राज्य वा देशाची सूत्रे कोणाकडे सोपवायची हे तोच ठरवतो. मतदारराजाने आता भाजपवर विश्‍वास दाखवला आहे. त्याबद्दल आयोगाला दोष देऊन काय उपयोग? पंजाबात कॉंग्रेसला बहुमत मिळाले. गोवा व मणिपूरमध्ये कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ‘न भुतो….’ असे बहुमत मिळाले. बिहारमध्ये जदयू-राजद आघाडी सत्तेत आली. मतदारांनी दिलेला हा कौलसुद्धा मतदान यंत्रांत फेरफार झाल्याचाच परिणाम जनतेने समजावा का? निवडणूक आयोगाने आपली पारदर्शकता व नि:पक्षपातीपणाची कसोटी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्याबद्दल आयोगाचे अभिनंदन!

LEAVE A REPLY

*