आधी केले, मग सांगितले..!

0
महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा आहे. ‘आधी केले, मग सांगितले’ असे बहुतेक संतांनी बजावले आहे. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ या अभंगातून उक्ती आणि कृतीच्या समन्वयाचे महत्त्व विशद केले आहे. शासन-प्रशासनाला मात्र या उक्तीचा नेहमी विसर का पडत असावा? काय केले यापेक्षा काय करणार आहोत हेच सांगण्याची अहमहमिका शासन-प्रशासनातील उच्चपदस्थांमध्ये लागलेली आढळते.

कोणतेही खाते वा मंत्रालय याला अपवाद का नसावे? रोज नव्या घोषणा केल्या जात आहेत. योजना जाहीर होत आहेत; पण योजनांच्या अंमलबजावणीचा ताळमेळ जाहीर करण्याची तयारी का दाखवली जात नाही? वनमहोत्सवांतर्गत वनमंत्रालयाने चार कोटी रोपांच्या लागवडीचा संकल्प सोडला आहे. नाशिक जिल्ह्यात २२ लाख रोपांची लागवड करणार असल्याचे संबंधित सूत्रांनी जाहीर केले आहे.

शेतकर्‍यांच्या कर्जाबाबत नवी घोषणा होतच आहे. पीकविम्याची रक्कम तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेशही दिले जातात. शासनातर्फे केल्या गेलेल्या घोषणांची यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणेच लांबत जाणारी आहे. अंमलबजावणीचे घोडे नेमके अडते कोठे याची शहानिशा करायला मात्र कोणाकडेच वेळ नाही.

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा बोजवारा उडाला आहे. ‘जलयुक्त शिवार’ योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. निश्‍चलनीकरणाचे कवित्व अजूनही सुरूच आहे. बँका व एटीएममध्ये अधून-मधून अद्याप पैशांचा खडखडाटच आहे. हक्काचे पैसे अडकून पडल्याने सामान्य जनतेचे दैनंदिन जीवन मात्र अवघड होत आहे.

नव्या घोषणा करण्याआधी आतापर्यंत केलेल्या घोषणांचे नेमके काय झाले? अंमलबजावणी झाली का? झाली नसल्यास का झाली नाही? त्या अकार्यक्षमतेबद्दल संबंधितांवर कारवाई का होत नाही? अशा अनेक बाबतीत कुणी माहिती मागितल्यास हमखास नकारघंटा वाजवली जाते. माहितीच्या अधिकाराचा वापर केल्यास स्वार्थी हेतूने माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग होत असल्याची हाकाटी पिटली जाते.

सरकार जनतेचे असले तरी जनतेला सरकारी कारभाराच्या माहितीपासून वंचित ठेवण्याची महान कामगिरी सरकार नावाच्या यंत्रणेतील प्रत्येक घटक इमानेइतबारे पार पाडत असतो. तरीही या कारभाराला ‘जनतेने, जनतेसाठी व जनतेकडून चालवले जाणारे राज्य’ असे का म्हटले जाते हा गहन प्रश्‍न भारतीय मनाला दिवसेंदिवस अधिकच अस्वस्थ करत असेल तर नवल नाही.

नवनव्या आकर्षक घोषणा करण्यात जनहित दक्षता दाखवणार्‍या राज्यकर्त्यांना जनतेची ही कुचंबणा कधी लक्षात येणार? ‘यंव करू, त्यंव करू’ यापेक्षा जे केले तेवढेच सांगितले तर चालणार नाही का?

LEAVE A REPLY

*