लोकजागृती हाच उपाय!

0

सामाजिक सुधारणा, अनिष्ट रुढी आणि परंपरांचा अंत लोकसहभागाशिवाय होणे अशक्य आहे. समाजाच्या सकारात्मक परिवर्तनासाठीसुद्धा लोकसहभाग आवश्यक आहे. सामूहिक गैरवर्तनामुळे अनेक चांगल्या उपक्रमांचा बट्ट्याबोळ होतो हे अप्रिय सत्य कसे नाकारणार? चार-पाच वर्षांपासून नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील अकोला तालुक्यातील भंडारदरा परिसर ‘काजवा महोत्सवा’मुळे गाजत आहे.

काजवा हा प्राणीसृष्टीच्या साखळीतील एक अत्यंत चिमुकला जीव! झाडांची पाने खाऊन जगणारा! जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी अंगातून प्रकाश किरण चमकण्याची दैवी देणगी काजव्यांना लाभली आहे. खरे तर त्यामुळे काजव्याचे चमकणे हा त्या कीटकाचा वैयक्तिक सोहळा मानला जावा; पण शासनाचा पर्यटन विभाग, समाज माध्यमे आदी सर्वांनीच या महोत्सवाचे मार्केटिंग सुरू केले.

परिणामी जंगलातील काजव्यांचा लखलखाट पाहण्यासाठी माणसे जंगलाकडे धावू लागली. गर्दीबरोबरच अनेक गैरप्रकारही सुरू झाले. पर्यटकांचा धिंगाणा आवाक्याबाहेर जात असल्याची तक्रार आता परिसरातील ग्रामस्थ करू लागले आहेत. गेल्यावर्षी पर्यटकांच्या धिंगाण्यामुळे नैसर्गिक जैवविविधता धोक्यात आली होती.

या भागातील निशाचर पक्षी व प्राण्यांना महिना-दीड महिना भक्ष्याच्या शोधासाठी जंगलात बाहेर पडणे मुश्किल झाले होते असे पर्यावरणप्रेमींचे निरीक्षण आहे. मध्यरात्रीची शांतता भंग करणारा वाहनांच्या भोंग्यांचा कर्णकर्कश आवाज, दिव्यांचा लख्ख प्रकाश, प्लॅस्टिकचा कचरा, दारूच्या बाटल्या व भरीला गोंगाट यामुळे निसर्गाची अपरिमित हानी होत आहे. साहजिकच हा महोत्सव बंद करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

असे फक्त काजवा महोत्सवासंदर्भातच घडले आहे असे नाही. अतिउत्साही, टारगट आणि कोणताही विधिनिषेध नसलेल्या मंडळींनी अनेक रम्य स्थळांची कचराकुंडी करून टाकली आहे. निसर्गातील शांततेचा आनंद अनुभवण्याऐवजी मनमानी धिंगाणा करून जंगली जिवांना जगणे अशक्य केले जाते.

दुगारवाडी धबधबा, पहिनेबारी अशी अनेक स्थळे पर्यटकांच्या धिंगाण्यामुळे धोक्यात येऊ पाहत आहेत. नव्या-नव्या निसर्गरम्य स्थळांची माहिती समाजाला का करून द्यावी, असा प्रश्‍न त्या परिसरातील वाटाडे आणि रहिवाशांना पडू लागला आहे. पर्यटकांच्या अतिउत्साहापुढे कायदेसुद्धा निष्प्रभ बनतात. धोकादायक स्थळी लावलेले फलक वाचण्याची तसदीसुद्धा सुसंस्कृत शहरी लोक घेत नाहीत. निसर्ग व पर्यावरणाची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी असल्याची जाणीव समाजामध्ये कधी निर्माण होणार? त्यासाठी सातत्यपूर्ण लोकशिक्षणाची गरज आहे.

LEAVE A REPLY

*