जनतेच्या नशिबी ‘टोल-धाड’च!

0
सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी राजकारण्यांचे ‘खायचे आणि दाखवायचे दात’ सारखेच असतात हे सरकारच्या नव्या निर्णयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विविध पायाभूत सुविधा प्रकल्प खासगीकरणाच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भविष्यात राज्यातील विविध मार्गांवरील टोल २०३५ पर्यंत कायम राहणार हे स्पष्ट झाले आहे.

आघाडी सरकारचे वाभाडे काढत, भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याचे आणि टोल बंद करण्याचे आश्‍वासन देणार्‍या भाजपने सत्ता हस्तगत केली. मात्र जनतेने त्या आश्‍वासनांवर ठेवलेला विश्‍वास अनाठायी होता, हे हळूहळू स्पष्ट होत आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, आपले वैयक्तिक व सामूहिक हितसंबंध जपणे हेच सत्ताधार्‍यांचे प्रधान कर्तव्य असलेच पाहिजे, या नियमाला कोणताही पक्ष अपवाद ठरू इच्छित नसावा.

अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सरकारी कृपेने विस्तारलेली ठेकेदारी संपुष्टात आणण्याचा आग्रह सातत्याने धरत आहेत; पण तसे झाले तर सत्ता मिळवून तरी काय उपयोग हे नव्या सत्ताधार्‍यांनासुद्धा उमगले असावे, अशीच ही वाटचाल नाही का? मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूककोंडीसाठीच जास्त चर्चेत आहे. या महामार्गावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी सरकारने महामार्ग क्षमतावाढीचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी खोपोली एक्झिट ते कुसगावदरम्यान पूल बांधणे, खालापूर ते खोपोलीदरम्यान सहापदरी मार्गाचे आठपदरी रुंदीकरण, घाटात दोन बोगदे व काही ठिकाणी पूल बांधणे असे अनेक निर्णय घेतले गेले आहेत. मात्र ही कामे खासगीकरणातूनच केली जाणार आहेत.

या उपायांमुळे सहा-सात वर्षांनंतर प्रवासात अर्ध्या तासाची बचत व वाहतूककोंडी कमी होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. तो वास्तवात उतरेल की नाही याविषयी जनतेच्या मनात शंका असली तरी या मार्गांवरील टोल मात्र सुरूच राहणार व कदाचित काही नवी टोलनाकीसुद्धा उभारली जाणार असतील.

जनतेने कितीही रोष व्यक्त केला आणि आंदोलने केली तरी टोलधाड बंद होण्याची शक्यता नाही याची सरकारने कबुलीच दिली आहे. महाराष्ट्रात टोलसंस्कृती रुजवण्यात सर्वच संबंधितांचे हितसंबंध गुंतलेले आहेत याबद्दल आता शंकेला वाव नाही. जनतेला पुढील अनेक वर्षे टोलधाडीची सरकारी वाटमारी निमूटपणे सहन करावी लागणार आहे. मिळून काय? ‘उडदामाजि काळे गोरे… काय निवडावे निवडणारे’ हा सनातन न्याय लोकशाहीतील जनतासुद्धा चुकवू शकणारच नाही. मग राज्यकर्ते कुणीही असोत!

LEAVE A REPLY

*