पर्यावरणपूरक ‘स्मार्ट’ काच

सध्या घरांमध्ये तसेच कार्यालयांमध्ये योग्य तापमान ठेवण्यासाठी एअर कंडिशनर किंवा पंख्यांचा वापर केला जातो. मात्र, त्यामुळे बरीचशी वीज खर्च होत असते व पर्यावरणाचीही हानी होते. अशा उपकरणांशिवायच जर योग्य तापमान राखले जाऊ शकले तर ?

संशोधकांनी आता याच दिशेने काम केले आहे. त्यांनी एक स्वस्त आणि अद्यावत अशी ‘स्मार्ट ग्लास’ तयार केली आहे. या काचेपासून बनवलेल्या खिडक्या ज्या खोल्यांना आहेत तिथे हवामानानुसार योग्य तापमान ठेवता येऊ शकते, असा त्याचा दावा आहे.

या ‘इको फ्रेंडली’ पद्धतीत खोलीला जितका हवा तितकाच प्रकाश आणि उष्णता मिळते. हिवाळ्यात या काचा जास्तीत जास्त उष्णता शोषून आत सोडतात तर उन्हाळ्यात अधिकाधिक उष्णता बाहेरच रोखली जाते. त्यामुळे एअर कंडिशनरसारख्या उपकरणांचा वापर न करताही आरामदायक तापमान खोलीत राहू शकते. या तंत्रामध्ये एका साध्या सिद्धांताचा खुबीने वापर केला आहे.

या काचेला प्लास्टिकच्या दोन वेगळ्या आणि पातळ स्तराच्या सहाय्याने बनवलेले असते. प्लास्टिकमध्ये छोट्या घन आकाराच्या संरचना असतात, ज्या एखाद्या पदार्थाला ‘रेट्रोरिफ्लेक्टिव्ह’ बनवतात. त्यामुळे उन्हाळ्यात प्रकाश त्याच्या स्रोताकडेच बाहेर फेकला जातो. त्यानंतर दोन्ही स्तरांमध्ये एक द्रवपदार्थ भरला जातो. त्याला मिथाईल सॅलिलसिलेट म्हटले जाते. हा एक स्वस्त द्रवपदार्थ आहे ज्याचा वेदनाशामक म्हणूनही उपयोग होतो.

ज्यावेळी या सर्वांना एकत्र केले जाते त्यावेळी काच पारदर्शक बनते आणि प्रकाश त्यामधून आरपार जातो. या प्रक्रियेला ‘रेफरॅक्टिव्ह इंडेक्स मॅचिंग’ असे म्हटले जाते. अशाप्रकारे काच दोन्ही पद्धतीने काम करू लागते आणि त्याचा उपयोग तापमानाचे संतुलन साधण्यासाठी होतो.