Type to search

maharashtra जळगाव फिचर्स मुख्य बातम्या

शिस्तप्रिय भाजपाला राडासंस्कृतीचे ‘ग्रहण’

Share

जळगाव – 

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या सभेत काल जो गोंधळ झाला तो बराच होता, असे म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही. संघ संस्काराची आणि नैतिकतेच्या गप्पा मारणार्‍या भाजपासाठी ही ‘राडा संस्कृती’ कुठे घेऊन जाणार आहे? इतर पक्षांवर टीकेची झोड उठविणार्‍या भाजपाने आता आपल्या घरात काय चाललंय? हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे. शिस्तप्रिय भाजपाला राडा संस्कृतीचे ‘ग्रहण’ लागले आहे. संघदक्ष असलेले नूतन जिल्हाध्यक्षांना आता भाजपातील राडा संस्कृती मोडून काढावी लागणार आहे, एवढे मात्र नक्की!

भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवड करण्यासाठी बाबा हरदासराम मंगल कार्यालयात आयोजित सभेत पक्षाचे सरचिटणीस असलेल्या प्रा. सुनील नेवे यांना मारहाण करून त्यांच्या अंगावर शाई फेकून काळिमा फासण्याचा लांच्छनास्पद प्रकार घडला. यावेळी कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर चढून गोंधळ घातला आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. कुणी म्हणेल, हे अनपेक्षित असले तरी पूर्वनियोजित होते, असे म्हणायला येथे वाव आहे. कारण भुसावळमधून आलेले कार्यकर्ते सभेत गोंधळ घालायचा आणि वेळ पडली तर हाणामारीचा आणि तोंडाला काळे फासण्याचा बेत आखूनच आले होते. सभा सुरू झाल्यानंतर त्यांनी गोंधळ घालून केलेले दृष्कृत्य हा बनाव पूर्वनियोजित होता, असे म्हणायला वाव आहे.

विशेष म्हणजे भाजपा नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पुण्यात असल्याने त्यांच्या पश्चात त्यांचे पट्ट शिष्य असलेल्या प्रा.सुनील नेवे यांना विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

भाजपातील या बेशिस्तीला वेसण घालेल असं कणखर नेतृत्व आज भाजपात नाही आणि खडसेंच म्हणाल तर त्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी आहे आणि गिरीशभाऊ पक्षात संघशिस्त आणतील अशी परिस्थिती आजतरी दिसत नाही त्यामुळे येणार्‍या काळात आणखी काय काय बघायला मिळते हे काळच सांगू शकेल.

प्रा. सुनील नेवे हे भाजपात मनमानी करतात, असा आरोप होत असून त्यांनी भुसावळ शहर अध्यक्ष निवडीत निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करून त्यांना आज मारहाण करून काळे फासले गेले. प्रा. नेवे हे खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांना खडसे गटाचा शिक्का असल्याने दुसर्‍या गटाने त्यांना हा ‘धडा’ शिकवला असल्याचे कवित्व आता होऊ लागले असून राडा करणारे कोण असतील? हे सुज्ञास अधिक सांगण्याची गरज नाही. भाजपात उभी फूट पडली असून दोन गट असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. चार महिन्यांपूर्वी अमळनेरच्या मेळाव्यात झालेला गोंधळ आणि माजी आमदारास झालेली मारहाणीची घटना ताजी असतानाच जाहीर सभेत झालेल्या गोंधळाने संघशिस्त असलेला भाजपा पक्ष कार्यकर्त्यांनी कुठे नेऊन ठेवला आहे? याचा शोध नेत्यांना घ्यावा लागेल.

अमळनेरच्या गोंधळावेळी कार्यकर्त्यांना आवरणारे आ. गिरीश महाजन आजही पुढेच होते. माजी मंत्री असलेल्या संकटमोचकांना भाजपाचे श्रेष्ठी असल्याचे श्रेय घेत असताना गोंधळ घालणार्‍यांचा सरदार कोण आहे? याचा शोध घेणे अवघड ठरणार नाही. नुसत्या निलंबनाने पक्षाची झालेली बदनामी भरून निघणार नाही. कारण ‘जो बुंद से गयी वो, हौदसे नही आती’ ही वस्तुस्थिती गिरीशभाऊसुद्धा नाकारणार नाहीत. केंद्रीय मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या समोरच कलंकाचे नाट्य घडले. या व्यासपीठावर थांबणे योग्य नाही, असे म्हणत दानवे यांनी सभागृहातून केलेले बहिर्गमन खूप काही सांगून गेले. अटल, आडवाणींचा भाजपा आता तो पूर्वीचा भाजपा राहिला नसल्याची खात्री दानवेंनाही पटली असावी.

प्रा. सुनील नेवे यांच्या अंगावर टाकलेल्या शाईचे शिंतोडे दानवेंसह गिरीश महाजन आणि राजूमामांच्या अंगावरही उडाले आहेत. जळगावच्या गोंधळाचा कलंक घेऊन दानवे दिल्लीत जाणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना ते त्यांनी ‘याची देहा याची डोळा’ अनुभवलेला अभूतपूर्व गोंधळ कथन करतीलच. पण माध्यमांनी लाईव्ह प्रक्षेपण करून भाजपात नव्याने रुजू पाहणार्‍या ‘राडा संस्कृतीचे’ आणि बेशिस्तीचे वाभाडे चव्हाट्यावर आणले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!