Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

माळढोकचे इको सेन्सेटिव्ह झोन घटविले

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला कर्जत, श्रीगोंदा तालुक्यातील 124 गावांतील शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाशी जोडला गेलेला माळढोक इको सेन्सेटिव्ह क्षेत्राचा विषय अखेर मार्गी लागला आहे. कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील माळढोक प्रकल्पाची प्रस्तावित इको सेन्सटीव्ह झोनची मर्यादा 10 किलोमीटर घटवून अखेर 400 मीटर करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाने मंजूरी दिली. कर्जत येथे औद्योगीक वसाहत स्थापन करण्यासही इको सेन्सव्ह झोनची बाधा होती. औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा मार्गही यामुळे रिकामा झाला आहे.

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांचा पाठपुरावा व संबंधित मंत्रालयाकडे भेटीगाठी सुरु केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी खा. डॉ. विखे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन माळढोक प्रश्न मांडला होता. खा. डॉ. विखे यांनी जावडेकर यांच्याकडे केलेल्या सादरीकरणात माळढोक प्रकल्पासाठी प्रस्तावित 548 वर्ग किलोमीटर संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यास स्थगिती द्यावी, तसेच प्रकल्पालगत संवेदनशील क्षेत्राचे घोषित 10 किलोमीटर अंतर घटवून 400 मीटर करावे अशी मागणी केली होती.

माळढोक प्रकल्प हा 1979 मध्ये श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील 7 हजार 818 वर्ग किलोमीटरमध्ये सुरु करण्यात आला होता. पुढे या संपूर्ण क्षेत्रासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना प्रसिध्द करुन अभयारण्याभोवतीचा 548 वर्ग किलोमीटरचा परिसर पर्यावरणासाठी संवेदनशील म्हणून घोषित करण्याचा इरादा व्यक्त केला होता. अभयारण्याभोवतीचा 10 किलोमीटर परीसर इको सेन्सटीव्ह झोन म्हणून घोषित करण्याचे ठरवले होते.

आधीच आरक्षणामुळे शेतकर्‍यांना शेती करताना अडचणी येत आहेत. विहीर खोदकाम करताना त्यांना ब्लास्टिंग करता येत नाही, खरेदी विक्रीमध्ये सुध्दा अनेक अडचणी होत्या. इको सेन्सटीव्ह झोनमुळे कोणताही प्रकल्प उभा करता येत नाही. त्यामुळे उद्योजक येण्यास धजावत नाहीत. अशा वेळी इको सेन्सटीव्ह झोनची व्याप्ती कमी केल्यामुळे बाधित शेतकर्‍यांची अनेक वर्षापासून मागणी पूर्ण होणार असल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान खा. डॉ. विखे पाटील यांनी केलेल्या मागणीनंतर केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी याबाबत सविस्तर बैठक बोलवून निर्णय घेतला. त्याबाबतची अधिसूचना संबधित मंत्रालयाने काढली आहे.
……………………
इको सेन्सेटीव्ह झोनची मर्यादा घटविल्यामुळे परिसरातील उद्योग व्यावसायांना चालना मिळेन.
– शांतीलाल कोपनर
…………………..
इको सेन्सेटीव्ह झोनची मर्यादा घटवल्यामुळे कर्जतच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
– नामदेव राऊत, माजी नगराध्यक्ष, कर्जत
…………………
इको सेन्सटीव्ह झोनमुळे विकासात येणारा अडथळ दूर झाला आहे. – अकुंश यादव

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!