Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशदिल्लीत रात्री उशिरा भूकंपाचे धक्के

दिल्लीत रात्री उशिरा भूकंपाचे धक्के

दिल्ली । Delhi

राजस्थानमधील अलवार जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा भूकंप झाला असून दिल्ली-एनसीआरपर्यंत त्याचे हादरे जाणवले आहेत. रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी झालेल्या हा मध्यम स्वरुपाचा हा भूकंप ४.२ रिश्टर स्केल इतका होता. अलवार हे भूकंपाचे मुख्य केंद्र होते अशी माहिती राष्ट्रीय भूकंप केंद्राकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केल ४.२ तीव्रतेच्या या भूकंपाचं केंद्र हरियाणाच्या गुरुग्रामपासून ४८ किमी दूर होते. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेकांनी ट्विट केलं होतं. दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि गाजियाबाद या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचं ट्विटर युजर्सनी म्हटलं आहे. दरम्यान दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यानंतर लोकं आपल्या घरातून बाहेर पडले होते.

भारतीय भूखंडावर अनेकदा भूकंपाचे जबर हादरे बसले आहेत. २००१ मध्ये गुजरातच्या कच्छ येथे झालेल्या एका विनाशकारी भूकंपात हजारोच्या संख्येनं नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारत प्रति वर्ष जवळपास ४७ मिलीमीटरच्या गतीनं आशियावर आदळत आहे. टेक्टॉनिक प्लेट आदळत असल्यामुळंच भारतात सातत्यानं भूकंपाचे हादरे बसत असतात. असं असलं तरीही भूजल पातळीमुळं टेक्टॉनिक प्लेटमधील गतीचा वेग मंदावला आहे. चार क्षेत्रांमध्ये भारतातील भूकंपप्रवण क्षेत्रांची विभागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये झोन ५, झोन ४, झोन ३ आणि झोन २ समावेश आहे.

झोन ५ मध्ये संपूर्ण पूर्वोत्तर भारत, जम्मू-कश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमधील कच्छचे रण, उत्तर बिहार मधील काही भाग आणि अंदमान निकोबार बेट समूहांचा समावेश आहे. इथं सातत्यानं भूकंपाचे हादरे जाणवतात. तर, झोन ४ मध्ये दिल्ली, सिक्किम, उत्तर प्रदेश मधील उत्तर भाग, बिहार आणि पश्चिम बंगालसह महाराष्ट्राचा काही भाग तसंच राजस्थानचा समावेश आहे. झोन ३ मध्ये केरळ, गोवा, लक्षद्वीप द्वीपसमूह, उत्तर प्रदेश मधील उर्वरित भाग, गुजरात आणि पश्चिम बंगाल, पंजाबचा काही भाग मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ़, महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकचा समावेश होतो. तर, झोन २ मध्ये भूकंपाच्या दृष्टीनं सर्वात कमी सक्रिय भागाची नोंद करण्यात येते.

यापूर्वी २ डिसेंबरला दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू गाझियाबादमध्ये होता. पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी हा भूकंप झाला होता. यावर्षी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बर्‍याच वेळा जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये एप्रिलनंतर १५ पेक्षा जास्त वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी भूकंपाचे केंद्रबिंदू दिल्लीच्या जवळपासच्या भागात होते.

दिल्ली आणि आसपासच्या भागात कोणत्याही वेळी मोठा भूकंप येऊ शकतो, अशी शंका देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. भूकंपावर देखरेख ठेवणारी नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजी ही देशातील सर्वोच्च संस्था आहे. गेल्या काही महिन्यांत दिल्लीमध्ये अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, असं या संस्थेने म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या