Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

बोटा परिसरात भूकंपाचा धक्का

Share

लोक घराबाहेर पळाले, 2.8 रिस्टर स्केलची नोंद

घारगाव ( वार्ताहर)–  संगमनेर तालुक्यातील बोटा गावासह परिसरातील गावांमध्ये सोमवारी (9 सप्टेंबर) सकाळी 8 वाजून 36 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. 2.8 रिस्टर स्केल तीव्रतेचा हा धक्का असल्याचे भू-वैज्ञानिकांनी सांगितले. या धक्क्यांमुळे बहुतेक भागातील नागरिक आपल्या घरातून थेट बाहेर पळाले. काही घरांतील भांडी जमिनीवर पडली तर अनेक घरांवरील पत्रेही थरथरू लागल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी तात्काळ माहिती घेत नागरिकांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

बोटा व परिसरात गेल्या काही वर्षांपासून जामिनीतून गूढ आवाज येत होते आणि धक्केही जाणवत होते. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. मात्र, काही काळानंतर धक्के बंद झाले. मात्र, त्याची पुनरावृत्ती सोमवारी झाल्याने नागरिकांमध्ये भयाचे वातावरण आहे. मागील वर्षीही सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर मध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर काल पुन्हा बोट्यासह, घारगाव, अकलापूर, आंबी खालसा, कुरकुंडी, केळेवाडी, माळवाडी, शेळकेवाडी, तळपेवाडी, कुरकुंडी, येलखोप या भागात भूगर्भीय हालचाली झाल्याने जवळपास एकशे दहा सेकंद धरणीकंपाचा अनुभव ग्रामस्थांना आला. या परिसरात भूकंपाने अनेकांच्या घरातील भांडी जमिनीवर पडली, घरांवरील पत्रेही थरथरू लागल्याने नागरिकांमध्ये एकच कल्लोळ माजला. जो-तो आपल्या मुलाबाळांसह घराच्या बाहेर पळत असल्याचे दृष्य यावेळी पठारावर सर्वत्र दिसत होते. या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रात झाली असून, त्याची तीव्रता 2.8 रिस्टर स्केल असल्याची माहिती वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी दिली. त्यामुळे पठारावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बाहेर रिमझिम आणि घरात भूकंपाची भीती अशी अवस्था निर्माण झाली आहे.

सोमवारी सकाळी जाणवलेल्या धक्क्याची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पठारावर यापूर्वीही गूढ आवाज येण्याच्या घटना घडल्या आहेत. येथील जमिनीत वारंवार भूगर्भीय हालचाली होऊन असे प्रकार घडत असल्याने भूगर्भ शास्त्रज्ञांनी येथे येऊन या हालचालींचा शोध घेण्याची गरज आहे. वारंवारच्या या घटनांनी नागरिक घाबरलेले आहेत.
-विकास शेळके, सरपंच, बोटा

पठारावरील काही भागांत सोमवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यानुसार नाशिकच्या ‘मेरी’ संस्थेशी संपर्क साधून माहिती घेतली असता साधारणपणे 110 सेकंदांपर्यंत जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.8 मोजली गेली आहे. मोडकळीस आलेल्या घरामध्ये नागरिकांनी राहणे टाळावे. घरातील जड वस्तू घरामध्ये अथवा उंच ठिकाणी ठेवू नये. हे भूकंपाचे धक्के खूप सौम्य असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
– अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!