उच्चभ्रू सावेडी परिसर गुन्ह्यांमध्ये नंबर वन
ई-पेपर

उच्चभ्रू सावेडी परिसर गुन्ह्यांमध्ये नंबर वन

Dhananjay Shinde

सचिन दसपुते

अहमदनगर – शहराचा उच्चभ्रू समजला जाणारा सावेडी भाग गुन्हेगारीबाबत नगर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. गेल्या वर्षभरात या भागात खुनाचे चार, अपहरणाचे 38, दंग्याचे 38, खंडणीचे चार, बलात्काराचे 13 असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. चोरी आणि घरफोड्यांच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या संख्येवरून सावेडी भाग असुरक्षित वाटू लागला आहे. त्यामुळे या भागात आणखी एका पोलीस ठाण्याच्या निर्मितीची मागणी होत आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी देखील नाशिक विशेष महानिरीक्षकांमार्फत राज्य सरकारकडे या संदर्भात प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र त्याचा पाठपुरावा होताना दिसत नाही.

सावेडी आणि ा परिसर तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. जिल्ह्यात 33 पोलीस ठाणे आहेत. या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दींचा विचार केल्यास तोफखाना पोलीस ठाण्याची हद्द उच्चभ्रू लोकांची ओळखली जाते. या पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विस्तार पाहिल्यास शहराचा मध्यवर्ती भागापासून ते एमआयडीसीपर्यंत विस्तारलेला आहे. त्यातच या भागात नागरिकरणाचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. नवनवीन वसाहती निर्माण होत आहेत. हॉटेल, हॉस्पिटल, लॉज, मॉल्सची निर्मिती होताना दिसत आहे. त्यामुळे तोफखाना पोलिसांवर आणखीचा ताण वाढणार आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या 2019 या वार्षिक गुन्ह्यांचा आकडा हा 757 एवढा आहे. तो 2018 मध्ये 734 एवढा होता.

तोफखाना पोलीस ठाण्याचे मनुष्यबळ पाहिल्यास वाढत्या गुन्ह्यांच्या आकड्याच्या तुलनेत ते कमीच आहे. एक पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक व 90 पोलीस कर्मचारी असे मनुष्यबळ उपलब्ध आहे. एका पोलीस कर्मचार्‍याच्या मागे गुन्ह्यांच्या तपासणीचा आकडा हा आठ ते दहा पटीत एवढा मोठा आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवायला पोलिसांना ग्राउंड वर्क करायला वेळच मिळत नाही. परिणामी गुन्हेगारीत वाढच होत आहे. त्यातच गुन्हेगारीचे स्वरुप बदलेले आहे. इतर जिल्ह्यातील गुन्हेगार दुसर्‍या जिल्ह्यात जावून चोर्‍या, घरफोड्या, खून, दरोडे घालतात. त्यांचा माग काढयचा म्हटल्यास त्याला वेळ द्यावा लागतो. तेच आताच्या पोलिसांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासांचे प्रमाण हे अत्यल्प असल्याचे दिसते आहे. तोफखाना पोलीस ठाण्यातील अनेक गुन्हे हे तपासावाचून तसेच पडून आहेत. ही कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.

खबर्‍यांचे जाळे गरजेचे
पोलिसांचा तपास सध्या मोबाईलच्या लोकेशनवर सुरू आहे. एखादा गुन्हा घडल्यास पोलीस पहिल्यांदा गुन्हेगारांचे मोबाईल लोकेशन शोधतात. गुन्हे उकलची ही पद्धत गुन्हेगारांना माहीत झाली आहे. त्यामुळे गुन्हेगार गुन्हा करताना मोबाईलचा वापर करत नाहीत. परिमाणी याच मुद्द्यावर अनेक गुन्हे तपासावाचून पडलेले दिसत आहे. ही परिस्थिती तोफखाना पोलीस ठाण्याची नाही, तर जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यांची आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या तपासासाठी पारंपरिक पद्धतीच्या खबर्‍यांची पुन्हा एकदा गरज व्यक्त केली जात आहे. नव्याने दाखल झालेले पोलीस यासाठी तयार होताना दिसत नाहीत. त्यातच या नवीन पोलिसांचे समाज माध्यमांवरच इतर गोष्टींसाठी बराच वेळ जातो आहे. जनसंपर्कासाठी वेळ न दिल्याने पोलिसांचे खबर्‍यांचे जाळे पक्के दिसत नाहीत.

गुन्ह्यांचे स्वरूप सन- 2018 सन- 2019
खून             01   04
सोनसाखळी 10   16
जबरी चोरी  10   13
रात्रीची घरफोडी 35  58
दिवसा घरफोडी 28  21
दुचाकी चोरी 66 158
इतर चोर्‍या 78 101
अपहरण 36 38
विनयभंग 53 68
सरकारी कामात 13 04
दंगा 22 38
दुखापत 56 76
बलात्कार 14 13
खंडणी 02 04

Deshdoot
www.deshdoot.com