Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआज केंद्रीय अर्थसंकल्प; देशवासियांना उत्सुकता

आज केंद्रीय अर्थसंकल्प; देशवासियांना उत्सुकता

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

करोना काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी पीछेहाट झाल्यानंतर आज (दि.1) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण 2021-22 सालाचा केंद्रीय अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता लोकसभेत सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला आणि घटकांना दिलासादायी तरतुदी असतील, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील याबद्दल देशातील जनतेला उत्सुकता आहे.

- Advertisement -

अर्थमंत्री म्हणून सीतारामण तिसर्‍यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्या शेतीविषयक कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकर्‍यांचे आंदोलन सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना खूष करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा सरकारकडून केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशाची आर्थिक स्थिती आणि आगामी काळातील सरकारच्या संभाव्य योजनांची माहिती अर्थसंकल्पातून मिळते. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागणार आहेत. आज सादर होणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण सकाळी 11 वाजेपासून लोकसभा टीव्हीवर होणार आहे. याशिवाय विभिन्न यूट्यूब लिंक्स, समाज माध्यमे तसेच विविध खासगी वृत्तवाहिन्यांवरही पाहता येऊ शकेल.

अर्थमंत्र्यांना विशेष सुरक्षा

नव्या शेतीविषयक कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी आंदोलक शेतकरी अर्थमंत्री सीतारमण यांना घेराव घालण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन अर्थसंकल्पाच्या दिवशी सीतारमण यांना खास सुरक्षा व्यवस्थेत संसद भवनात आणण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यांच्या घरापासून संसद भवनपर्यंत ही सुरक्षा व्यवस्था असेल. याकामी दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा संस्था काम करीत आहेत.

कागदविरहीत अर्थसंकल्प

करोना संकटकाळात यंदाचा केंद्र अर्थसंकल्प सादर होणार आहे. हा अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे.देशातील हा पहिलाच कागदविरहीत अर्थसंकल्प (पेपरलेस बजेट) असेल. अर्थसंकल्पाची छपाई करण्यात आलेली नाही. तो केवळ डिजिटल स्वरुपात उपलब्ध असेल. अर्थसंकल्पाची प्रत (सॉफ्ट कॉपी) खासदार आणि इतर संबंधितांना दिली जाणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचा दावा सरकारने केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या