बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त; हिसाळे येथे सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

0
नाशिक । राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून शिरपूर तालुक्याच्या हिसाळे शिवारातील बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत 1 लाख 2 हजार 548 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र येथील कामगार फरार होण्यात यशस्वी झाले.

राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळालेल्या माहितीवरून विभागीय पथकाच्या कर्मचार्‍यांनी मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई केली. हिसाळे-महादेव रोडवरील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात बनावट मद्यनिर्मिती होत असल्याच्या माहितीवरून पथकाने छापा टाकला असता तेथेे 200 लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिक बॅरेलमध्ये देशी दारू करण्यासाठी वापरण्यात येणारे तयार ब्लेंड (रसायन) मिळून आले.

तसेच या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या घरात बॉबी संत्रा नामक देशी मद्याने भरलेल्या बाटल्यांचे 13 बॉक्स मिळून आले. याच ठिकाणी बूच पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे मशीन तसेच लेबल, रिकाम्या काचेच्या बाटल्या, बनावट मद्याच्या भरलेल्या बाटल्या, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे बॉक्स असा सुमारे 1 लाख 2 हजार 548 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

दरम्यान, या कारवाईची कुणकूण लागताच संशयित पसार झाले असून पथकातील कर्मचारी त्यांचा शोध घेत आहेत. ही कारवाई विभागीय पथकाचे निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक योगेश सावखेडकर, एल. व्ही. पाटील, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके आदींच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक सावखेडकर करीत आहेत.

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या कारखान्यात देशी दारूचे बनावट उत्पादन केले जात होते. या कारवाईत दारू बनवायचे रसायन, रिकाम्या व भरलेल्या बाटल्या, पॅकिंग मशीन तसेच विविध आकाराची बाटलीची बुचे, खोके असा सुमारे 1 लाख 2 हजार 548 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*