बनावट ठेकेदारांच्या नावे काढली बोगस बिले

0

फत्त्याबाद ग्रामपंचायतीचा ‘महाप्रताप’; ग्रामस्थांचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील फत्त्याबाद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांत कुठल्याही प्रकारच्या गटारी साफसफाई, शौचालय सफाई व पाईपलाईन दुरुस्ती लिकेजचे काम झालेले नाही. मात्र सधन शेतकरी व कर्मचार्‍यांनाच बनावट ठेकेदार बनवून त्यांच्या नावे बोगस बिले काढण्याचा ‘महाप्रताप’ सत्ताधार्‍यांनी केला आहे. त्यामुळे सर्व ग्रामनिधी व पाणीपुरवठा अंतर्गत खर्च झालेल्या निधीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा श्रीरामपूर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबत फत्त्याबाद ग्रामस्थांनी गटविकास अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सरपंच शंकर वरखड यांचा फत्त्याबाद ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. सहा महिन्यांपासून कुठलेच विकास काम झालेले नाही. उलट गावातील आपल्या मर्जीतील प्रतिष्ठीत व्यावसायिक, कर्मचारी व शेतकर्‍यांना बोगस ठेकेदार बनवून त्यांच्या सह्या घेऊन त्यांच्या नावे बिले काढली. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये सदस्यांनी ग्रामनिधी व पाणीपुरवठा खर्चाबाबत कॅशबुकची मागणी केली असता हा प्रताप उघडकीस आला.

सार्वजनिक आरोग्य, शौचालय, गटारी साफसफाई व पाईपलाईन लिकेजची बिले रामनाथ भिंगारे या कापड व्यवसायिक व पिठाची गिरणी चालक यांच्या नावावर काढली. पाणीपुरवठा दुरुस्ती, शौचालय परिसर साफसफाई, परिसर स्वच्छता, वृक्ष लागवडीची बिले राहाता बाजार समितीचे कर्मचारी रईस शेख यांच्या नावे, पाणीपुरवठा अंतर्गत पाईपलाईन लिकेजची बिले खंडोबा महाराज मंदिराचे पुजारी सर्जेराव ओहोळ, प्रवरा शिक्षण संस्थेचे कर्मचारी सुनील मोरे व पेंटर व्यावसायिक तुळशीराम धाकतोडे यांच्या नावे, गटारी साफसफाईची बिले, सधन शेतकरी चांगदेव लबडे व प्रवरा रुग्णालयाचे कर्मचारी दत्तात्रय बेलकर यांच्या नावे, मुरुमाची बिले, ज्येष्ठ नागरिक वामन बेलकर व प्रगतिशील शेतकरी संदीप शेडाळे यांच्या नावे, वृक्ष लागवड व पाणी पुरवठ्याची बिले ज्येष्ठ नागरिक भागवत ओहोळ यांच्या नावे, गाव अंतर्गत रस्त्याची मुरुमाची बिले सधन शेतकरी ताराचंद देठे यांच्या नावे तर सार्वजनिक आरोग्य, गाव अंतर्गत रस्त्याच्या मुरुमाची बिले सधन शेतकरी बाबासाहेब तांबे यांच्या नावे अशा सुमारे 12 बनावट ठेकेदारांच्या नावावर बोगस बिले काढण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अनेकांना याबाबत कोणतीही कल्पना नाही.

कोणत्याही प्रकारचे काम न करता सर्व ग्रामनिधी व पाणीपुरवठा अंतर्गत निधीचा अपहार झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.  निवेदनावर अमोल भास्कर डोरजकर, दीपक चांगदेव आठरे, सुनील संभाजी आठरे, भाग्योदय बाबासाहेब ओहोळ, उदयन बाबासाहेब आठरे, पांडुरंग शिवाजी आठरे आदींच्या सह्या आहेत.

न केलेल्या ठेकेदारीचा अनेकांना बसणार फटका?
गावातील कामाची ठेकेदारी करणारांना ग्रामपंचायतीची निवडणूक लढविता येत नाही, तसेच ग्रामपंचायतीच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे ठेकेदारी न करता ठेकेदारीत नाव आलेल्या कुटुंबातील व्यक्तींना भविष्यात याचा मोठा फटका बसणार आहे. अशाप्रकारे शासनाच्या निधीचा गैरवापर अनेक ठिकाणी होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पातळीवरील कामाच्या खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ही ठेकेदारी नव्हे तर रोजंदारीवर केलेली कामे
अशा प्रकारची कामे सर्वच ग्रामपंचायतीमध्ये ठेकेदारी नव्हे तर रोजंदारीवर केली जातात. त्याच पध्दतीने ही कामे केली आहेत. त्यामुळे त्यात गैर काही नाही. ज्यांनी ही कामे केली त्यांना कामाची गरज होती. पाहिजे तर गावात प्रत्यक्ष येऊन चौकशी करा. मी चुकीच्या पध्दतीने काम केल्याचे सिध्द झाले तर मी स्वतःहून सरपंचपदाचा राजीनामा देईल. विरोधकांच्या हातून सत्ता गेल्याने ते असे बिनबुडाचे आरोप करीत आहेत.
– शंकर वरखड सरपंच, फत्त्याबाद ग्रामपंचायत.

LEAVE A REPLY

*