Type to search

ब्लॉग

Blog: डबींगची मालामाल दुनिया!

Share

बच्चेकंपनीने सुटीत डिज्नेचा ‘अलादीन’ एन्जॉय केला. करामती दिवा, भव्य सेट्स, स्पेशल इफेक्ट्स आणि जोडीला चटपटीत संवाद. यामुळे भट्टी जमली आणि मस्त करमणुक झाली. समजा यातील चटपटीत संवाद इंग्रजीतच असते, तर भारतीयांना या चित्रपटाचा आनंद घेता आला असता? काहींसाठी उत्तर होय असू शकते. पण बहुतांश प्रेक्षकांचे नाही, हेच उत्तर असेल. त्याआधी आलेला ‘ऍव्हेंजर्स एन्डगेम’साठी हाच फार्म्युला लागू होतो. एव्हेंजेर्सने तर भारतात बख्खळ कमाई केली. तर मुद्दा काय, अलिकडच्या वर्षांत डबींगच्या विश्‍वाने भारतीयाच्या मनोरंजनाची परिभाषाच बदलून टाकली आहे. हॉलिवूड काय किंवा टॉलिवूड काय, सिनेमा आपला वाटणे, ही करामत डबींगमुळे शक्य झाली. राज्य किंवा देशाच्या सीमा ओलांडणार्‍या पात्रांच्या तोंडात ‘आपली’ वाटणारी भाषा एवढ्या चपखलपणे मिसळली जाते की प्रेक्षक त्यात गुंततो. तेव्हा डबींग इंडस्ट्रीने केलेली प्रगती आणि त्यानिमित्ताने कलावंतांना रोजगाराची खुली झालेली कवाडे हे देखिल एक रंजक जग ठरले आहे.

नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभाला भारतात डिस्कव्हरीचे वृत्तपट अवतरले. धीरगंभीर आवाजातील सुत्रधार, ही त्या माहितीपटांची वैशिष्ट्ये. तर हिंदीतील भाषांतर ही खासबात! तत्पूर्वीच्या काळात डिज्नीचे कार्टून हिंदी भाषेत अवतरले होते. मिकी-माऊस, टॉप अ‍ॅण्ड जेरी भारतीयांना हसवत होते. या दोन्ही प्रयोगांना मिळणारा प्रतिसाद एवढा भन्नाट होता, की लवकरच या दोन्ही प्रकारांसाठी आधी खास प्रसारण वेळ आणि मग स्वतंत्र वाहिन्या अवतरल्या. तेव्हा साधारणपणे हिंदी या एकाच भाषेत डबींग होत असे. याच काळात, 1993-94च्या दरम्यान स्टीवन स्पीलबर्गचा ज्युरासीक पार्क भारतात अवतरला. हिंदी भाषेत डब झालेल्या या चित्रपटाने धमाकाच केला. त्यानंतर हिंदी भाषेत डब होणार्‍या हॉलिवूड चित्रपटांची लाटच आली. याच काळात मणीरत्नम दिग्दर्शित ‘रोजा’ हिंदी भाषेसह प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, याची नोंद घ्यावी. हॉलिवूड चित्रपट किंवा मालिका हिंदी, तेलगू, तमीळ भाषेत डब होत. गेल्यावर्षी डाय हार्ड मालिकेतील ए गुड डे टू डाय हार्डपासून अन्य पंजाबीसह अन्य भाषेत डबींगचे प्रयोग सुरू झाली. स्ट्रीमींग पोर्टलमुळे तर वेबसिरीज आपल्या प्रादेशिक भाषेतून ऐकण्याची सोय झाली आहे.

आज भारतात डबींग इंडस्ट्रीचा आकार दीडशे कोटी रूपयांच्या पार पोहचला आहे. 1983च्या सुमारास पीए कृष्णन यांनी दक्षिण भारतीय डबींग आर्टीस्ट संघटनेची स्थापना केली. हे डबींग क्षेत्रातील पहिले संघटन होते. आज संघटनेचे 2 हजारापेक्षा अधिक सदस्य आणि 30हून अधिक व्हॉईस कोऑर्डीनेटर आहेत. यावरून भारतातील डबींग दुनियेचा वाढत जाणार्‍या आकाराचा अंदाज घेता येतो. विदेशी भाषेतील चित्रपट-मालिका भारतीय भाषेत डब करण्यासह भारतीय भाषेतील चित्रपट अन्य प्रादेशिक भाषेत डब करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हे क्षेत्र विस्तारत आहे. सध्या चित्रपटाची वाहिनी सुरू केली की एखादा दक्षिण भारतीय मसाला चित्रपट हिंदीतील संवादासह सुरू असतो.

अ‍ॅमेझॉन प्राईम, नेटफ्लीक्स अशा ऑनलाईन स्ट्रीमींग सर्व्हीसेसमुळे तर मनोरंजन क्षेत्रातील एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली आहे. अनेक विदेशी भाषेतील बेवसिरीज किंवा चित्रपट प्रादेशिक भाषेत देण्यासाठी या ऑनलाईन स्ट्रिमिंग कंपन्या विशेष प्रयत्न करत आहेत. त्यात केवळ इंग्रजीच नाही तर इराणी, फ्रेंच, पोर्तुगीज, हिब्रु अशा भाषांचाही समावेश आहे. त्यानिमित्ताने भारतीय भाषेतील वेबसिरीज विदेशी भाषेत डब होण्यासही सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे झी समूहाने भारतीय चित्रपटांची वाहिनी स्पॅनिश भाषेत सुरू केली. भारतीय चित्रपट व मालिका डब करून स्पॅनिश भाषेत दाखविल्या जातात. झी मुन्डो म्हणून हे चॅनल स्पेनच्या प्रेक्षकांनीही स्वीकारलेले दिसते.

आधी काही कंपन्यांनी या क्षेत्रात मक्तेदारी निर्माण केली होती. मात्र डबींग क्षेत्राचा विस्तार आणि वाढलेले काम यामुळे आता नव्या डबींग स्टुडीओंनाही संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे एकेकाळी मालिकेचा एक एपिसोड डब करण्याठी 80 हजारांवर लागणारा खर्च 15 हजारांपर्यंत खाली आला आहे. टिव्हीसाठी चित्रपट डब करण्यासाठी तीन लाख तर चित्रपटगृहासाठी डब करण्यासाठी 15 लाखांवर खर्च होतो. अनुक्रमे 15 आणि 30 दिवस असा डबींगसाठी लागणारा वेळ असतो.
चित्रपट डब करताना दृश्याचा आत्मा, पात्रांच्या तोंडी चपखल असतील असे शब्द, त्यातही भाषिक लहेजा असा सर्व बाबींचा विचार करून संवाद योजावे लागतात. हे काम करणार्‍या संवाद भाषांतरकाराला प्रादेशिक भाषेतील अंतरभाषांतरासाठी 1 रूपया प्रतीशब्द तर विदेशी भाषेतून भारतीय भाषेत भाषांतरासाठी 10 रूपये प्रतिशब्द मानधन मिळते. तर आवाज देणार्‍या डबींग आर्टीस्टला 100 ते 150 रूपये प्रतिमिनीट मानधन मिळते. सोबत तांत्रिक टीम असतेच. त्यांनाही चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.

डबींगमुळे चित्रपट आपल्या भाषेतून समजून घेता येतो. संदेश आणि संवाद योग्यप्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहचतो. बाहुबलीला आवाज देणारा शरद केळकर नेटकर्‍यांसाठी स्टार ठरतो. अमिरचा दंगल चिनी भाषेत डब होऊन गाजतो. आघाडीचा गायक अरमान मलिकला अलादीनसाठी आवाज देण्याचा मोह होतो. अशी विस्तारणारी डबींगची दुनिया! चित्रपट आणि मालिका पहाण्याचा आनंद वाढविणारी!

– प्रतिनिधी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!