निसाकाच्या 110 एकर जागेत होणार ड्रायपोर्ट

500 कोटींची गुंतवणूक ; शेतमाल निर्यातीसाठी वरदान

0
निफाड। शेती उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने निसाकाच्या पडीक असलेल्या 110 एकर जागेत केंद्र शासनाच्या मदतीने ड्रायपोर्ट ची उभारणी करण्यात येणार असून जागा वापर बदल्यात जिल्हा बँक कर्जाची हमी घेवून उर्वरीत रक्कम निसाका चालू करण्यासाठी वापरली जाणार आहे.

ड्रायपोर्ट उभारणीमुळे या परिसराचे रुपडे बदलणार आहे. तसेच कसबे-सुकेणे रेल्वे स्टेशनवरील बंद पडलेल्या मालधक्क्याची दुरुस्ती करुन तो पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याने यातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

ज्येष्ठ भाजप नेते सुरेशबाबा पाटील यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतुक मंत्री नितीन गडकरी व गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह दिल्ली दौर्‍यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यानंतर गडकरी यांनी पत्रकार परिषदेत निसाका येथे 500 कोटी रुपये खर्चुन ड्रायपोर्ट उभारणार असल्याची घोषणा केली.

नाशिक जिल्ह्यातून द्राक्षे, डाळींब, कांदा, भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. परिणामी, ही निर्यात सुलभ व्हावी यासाठी निसाकाच्या मालकीच्या 263 पैकी 110 एकर जमीन ड्रायपोर्टसाठी घेवून त्या पोटीची रक्कम ही जिल्हा बँकेचे थकीत कर्ज भरण्यासाठी व कारखाना सुरु करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

यासाठी निसाकाची हायस्कूल ते रेल्वे लाईन व पेट्रोलपंप ते रेल्वे लाईन परिसरातील मोकळी शेतजमीन वापरली जाणार आहे. ड्रायपोर्टसाठी 500 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याने मुंबईच्या पोर्ट बंदर येथे पाण्यात होणारी शेतमालावरची प्रक्रिया आता निसाका कार्यस्थळावर होवून महिंद्रा कंपनीच्या कंटेनरद्वारे हा शेतमाल मुंबई बंदरापर्यंत पोहचवला जाणार आहे.

बंद मालधक्का होणार सुरु : निसाका बंद पडल्यानंतर कसबे-सुकेणे रेल्वे स्टेशनवरील मालधक्का देखील बंद पडला होता. परिणामी, ड्रायपोर्टमुळे हा मालधक्का पुन्हा वापरण्यात येणार असून त्याची डागडुजी करण्यात येणार आहे. जालना येथे देखील 1500 एकर क्षेत्रावर ड्रायपोर्ट आकार घेणार असून तेथे 1 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

निफाड येथे 500 कोटींची गुंतवणूक करण्यात येवून ड्रायपोर्टची उभारणी करण्यात येणार आहे. शेती आणि शेतकरी यांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा असून याच प्रकल्पाच्या माध्यमातून निसाकाचे धुराडे पेटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भाजप नेते सुरेशबाबा पाटील यांनी ड्रायपोर्ट संदर्भात नितीन गडकरी यांची वेळोवेळी भेट घेतली होती.

अखेर त्यास यश येत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून प्रकल्प कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी, निसाकाला देखील ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे.

LEAVE A REPLY

*