Type to search

Featured सार्वमत

पाण्यासाठी नवजात नातवाला पाहुण्यांच्या दारी ठेवण्याची वेळ!

Share

ज्ञानेश दुधाडे

दुष्काळ : दक्षिणेतील अनेक गावांमध्ये विदारक दृश्य

अहमदनगर- पाण्यासाठी दाही दिशा अशी अवस्था दक्षिण भागातील अनेक गावांत निर्माण झाली आहे. पाथर्डी, पारनेर, नगर, कर्जत, जामखेड या तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असून जनता सरकारी पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहे. हातावर पोट असणार्‍या कुटुंबाना दोन वेळच्या अन्नासोबतच घोटभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नगर तालुक्यातील एका गावात तर पाणी नसल्याने एका आजोबाला आपल्या नवजात नातवाला पाहुण्याच्या दारी ठेवण्याची वेळ आली असून यापेक्षा त्या आजोबाचे दुर्दैव काय असेच म्हणावे लागत आहे.

नगर शहरापासून अवघ्या 20 किलो मीटरवर असणार्‍या अकोळनेर गावातील एका शेतकर्‍यांची ही कहाणी आहे. यंदा दुष्काळ तीव्र असल्याने अकोळनेर गावात त्याचा प्रभाव पाहण्यास मिळत आहे. साधारणपणे पाच ते साडेपाच लोकसंख्या असणार्‍या गावात 300 ते 400 विहिरी आणि एक हजारांच्या जवळपास बोअरवेलची संख्या आहे. दुष्काळामुळे या विहिरी आटल्या असून जनतेला आता सरकारी अथवा खासगी पाण्यावर अलंबून रहावे लागत आहे. अकोलनेरकरांनी गावात बोअरवेली बंदी आणली असली तरी या परिसरातील भूजल पातळीवर त्याचा परिणाम झालेला नाही.

गावात 15 दिवसांपूर्वी मोठ्या प्रयत्नांनंतर जनावरांची छावणी सरकारने मंजूर केली. मात्र, त्या छावणीत गावातील सर्व जनावरे पोहचलेली नाहीत. गावातील अनेक कुटुंबातील तरुण कर्ती मुले नोकरीनिमित्त शहाराकडे गेलेली असल्याने घरातील वृध्दांना जनावरे संभाळण्याची वेळ आली आहे. यामुळे हे वृध्द जनावरे घेऊन छावणीत जाऊ शकत नाहीत.

अशा परिस्थितीत दररोज पदरमोड करून या शेतकर्‍यांना आपले जनावरे जगणविण्याची वेळ आली आहे.
याच गावात एका शेतकर्‍यांचे कुटूंब राहत असून कुटूंबात सात ते आठ व्यक्त राहत आहेत. सरकार माणसी 20 लिटरप्रमाणे पाणी देत आहे आणि ते ही जुन्याच लोकसंख्येच्या आधारे. यामुळे मिळणारे पाणी पिण्यासाठी वापराचे की अंघोळी वापराचे असा प्रश्‍न ग्रामीण भागातील जनतेला आहे. यासह धुणी, भांडी, जनावरांचे करायचे काय? याची चिंता शेतकर्‍यांना आहे. अशा विदारक परिस्थितीत त्या शेतकर्‍यांच्या मुलीची प्रसृती झाली.

आपल्याला नातू झाला याचा आनंद त्या शेतकर्‍याला झाला असताना आता या नवजात नातवाला दररोज अंघोळीसाठी पाणी आणायचे कोठून असा प्रश्‍न त्याच्या समोर उभा राहिला. गावात दररोज सरकारी पाण्याच्या टँकरच्या खेपा येतात पण त्या गावात आणि जास्त लोकसंख्या असणार्‍या वस्त्यांपर्यंत पोहतात. विरळ लोकसंख्या असणार्‍या वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न असल्याने अखेर त्या शेतकर्‍यांने पाऊस पडेपर्यंत प्रसृती झालेली मुलगी आणि नवजात नातवाला पाण्याच्या दारात ठेवण्याचा कठोर निर्णय घेतला. अन्य पर्याय नसल्याने आणि दररोज पाणी विकत घेण्याची परिस्थिती नसल्याने हा आजोबा असणारा शेतकरी हतबल झाला. हे उदाहरण नगर दक्षिणेतील एका गावातील आहे. दक्षिणेत अनेक गावात यापेक्षाही भयंकर परिस्थिती आहे.

प्रशासन, अधिकारी आणि पुढारी बैठका घेवून आदेश देण्यात धन्यता मानत आहेत. पण प्रत्यक्षात फिल्डवर जावून पाण्याच्या टँकर मंजूरीनूसार खेपा होतात की नाही. मिळणार्‍या पाण्यात प्रत्यक्षात त्या कुटूंबाचे भागते की नाही, जनावरांच्या पाण्याचे काय? अशी अनेक प्रश्‍न कायम असून ते कोण सोडविणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या आजोबा शेतकर्‍याच्या कहाणीला नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी पालकमंत्री यांच्या बैठकीत वाचा फोडली. पण पुढे काहीच झाले नाही. सभापती भोर यांनी प्रमाणिकपणे त्यांचे काम केले. पण प्रशासनाला त्यावर गंभीरतेने उपाय योजन करावेत, असे वाटले सुध्द नाही, हेच दुर्दैव म्हणावे लागेल.

अकोळनेर परिसारात सध्या 2 हजार लिटरच्या एका पाण्याच्या टँकरसाठी 1 हजार रुपये मोजावे लागत आहे. अकोळनेर हे गावात पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलच्या डेपोसाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणी भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑलचे मोठे डेपो आहेत. या डेपोमुळे आधी अकोळनेर, खडकी, खंडाळा, जाधववाडी, सोनेवाडी, भोरवाडी या भागातील पाणी प्रभावीत झालेली आहे. यामुळे या गावासाठी भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑल यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून कायम स्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

नगर तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे आणि सभापती रामदास भोर हे राजकारणा पलीकडे जावून दुष्काळात जनतेच्या पाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तालुक्यात सध्या 66 टँकर सुरू असून बुर्‍हाणनग आणि 39 गावे आणि घोसपुरी आणि 17 या पाणी योजनांमुळे तालुक्यातील दुष्काळाची दाहकता कमी झाली आहे. या दोन प्रादेशीक पाणी योजनामुळे काही प्रमाणात नगर तालुका वाचला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!