Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

दुष्काळात नगरकर पिले 55 कोटींचे सरकारी पाणी

Share

जानेवारीपासून पाण्याचे टँकर सुरू : 875 चा उच्चांक

अहमदनगर (प्रतिनिधी)- जलयुक्त शिवार योजनेमुळे जिल्ह्यात भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याचा दावा राज्य सरकार करत असले तरी नगर जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट 2019 अखेर सरकारी पाण्याच्या टँकरवर 54 कोटी 68 लाख 25 हजार रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. या सरकारी पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या घशाची तहान भागविण्यात आली आहे. यात 54 कोटी 13 लाख रुपये प्रत्यक्षात सरकारी पाण्याच्या टँकरवर तर 55 लाख 11 हजार रुपये खासगी विहीर अधिग्रहणावर खर्च करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात गतवर्षी पावसाने हात दाखविल्याने खरिपासह, रब्बी हंगामातील पिकांची वाट लागली. जानेवारीनंतर जिल्ह्यात जनावरांच्या छावण्या आणि पाण्याच्या टँकरची मागणी वाढत गेली. फेबु्रवारी-मार्चपासून जनावरांना छावण्यात ठेवण्यात आले. अनेक ठिकाणी यंदा देखील समाधानकारक पाऊस नसल्याने 50 हजारहून अधिक जनावरांचा पोळा छावण्यात साजरा करण्याची वेळ आली. जिल्ह्यात दुष्काळाच्या काळात पाण्याच्या टँकरचा आकडा 875 पर्यंत पोहचला होता. यावरून दुष्काळीची दाहकता जाणवल्याशिवाय राहत नाही.

यंदा जिल्ह्यात काही भागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी काही भागात अद्याप पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात 359 ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत. परतीच्या पावसाने पुन्हा हात दाखविल्यास जिल्ह्यात उन्हाळ्यात पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागात सर्वाधिक पाण्याच्या टँकरवर खर्च झाला असून यात पारनेर, पाथर्डी आणि नगर तालुक्यांचा समावेश आहे. यासह शेवगाव, कर्जत, श्रीगोंंदा आणि उत्तर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात टँकरवर खर्च करण्यात आलेला आहे. ऐवढ्या मोठ्या निधी खर्च होवून देखील जिल्ह्यातील दुष्काळी भागात सरकारी पाण्याच्या टँकरसाठी अनेकांना त्रास सहन करावा लागाला. अनेक ठिकाणी पाण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली होती.

तीन तालुके लकी
जिल्ह्यात जानेवारीपासून अत्तापर्यंत सरकारी पाण्याच्या टँकवर दमडीही खर्च करण्याची वेळ जिल्ह्यातील तीन तालुक्यावर आली नाही. यात कोपरगाव, राहुरी आणि राहाता तालुक्यांचा समावेश आहे. तर श्रीरामपूर तालुक्यात अवघा 33 हजार रुपये खर्च सरकारी पाण्याच्या टँकरवर झालेला आहे.

यंदापासून जलआरक्षणाला महत्व
पुढील वर्षीच्या टंचाईकृती आरखड्याची तयारी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली आहे. कमी पाऊस असणार्‍या गावात उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्या पाणी टंचाई आणि त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा समावेश यात आहे. यंदापासून टंचाईकृती आरखड्यात जलआरक्षणचा मुद्द्याचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे टंचाईकृती आरखड्याची व्याप्ती आणि अचूका वाढणार आहे.

सध्या सुरू असणारे टँकर
संगमनेर 8, अकोले 18, राहुरी 1, नेवासा 2, राहाता 4, नगर 24, पारनेर 54, पाथर्डी 56, शेवगाव 36, कर्जत 59, जामखेड 57, श्रीगोंदा 25 आणि जामखेड नगरपालिका हद्दीत 31 असे 359 टँकर जिल्ह्यात सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. या टँकरव्दारे आजही जिल्ह्यातील 7 लाख 9 हजार जनतेला सरकारी पाणी पुरविण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!