दुष्काळ व महागाईचे पोळा सणावर सावट

0
पोळा सणानिमित पुणतांबा येथील स्टेशनरोडवर असलेली तुरळक गर्दी.

पुणतांबा (वार्ताहर)- अपुर्‍या पावसामुळे पुणतांबा परिसरात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्यातच वाढत्या महागाईचा परिणाम बळीराजाचा महत्वाचा सण समजल्या जाणार्‍या पोळा सणावर काल दिसून आला. परिसरात बैलजोड्यांची संख्या कमी होत असली तरी पोळ्याच्या दिवशी मात्र शेतकरी वर्गात मोठा उत्साह असतो. काल तसा उत्साह दिसून आला नाही. येथील स्टेशन रोडवर पोळा सणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी फारशी गर्दी नव्हती व फारशी उलाढाल झालेली नाही.

परंपरेप्रमाणे काल शेतकरी वर्गाने सकाळी गाय, बैल यांना स्वच्छ धुतले. गोदावरी नदीला पाणी असल्यामुळे नदी काठच्या शेतकर्‍यांनी नदीपात्रात सकाळीच आंघोळ घातली. दुपारी दोन नंतर रंग बेगडे लावून सजावट केली व सायंकाळच्या वेळेस मिरवणूक काढून देवळात जाऊन दर्शन घेतले. बैलांचे घरोघर पूजन केले. शेती महामंडळाचा चांगदेव नगर मळा चालू असताना तसेच पुणतांबा परिसराला गोदावरी उजव्या कालव्याचे मुबलक पाणी मिळत असताना परिसरात पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात होता. एकाच वेळी 50-50 बैलजोड्यांची मिरवणूक निघत होती. मात्र सध्या परिस्थिती बदललेली आहे. परिसरात आतापर्यंत अवघा आठ इंचापर्यंत पाऊस पडला आही. खरीप हंगाम वाया गेला असून दुष्काळसद्दश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच वाढत्या महागाईचा परिणाम पोळा सणावर दिसून आला आहे.

 

LEAVE A REPLY

*