Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : आम्ही जंगलात राहणारे…शहरात कसं जगू! नार-पार धरणाला विरोध : आदिवासींच्या डोळ्यांत पाणी

Share

पेठ । कुंदन राजपूत

उत्तर महाराष्ट्रासाठी भगीरथी प्रकल्प ठरू पाहणार्‍या नार-पार नदीवर धरण बांधण्याचा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापत असताना या नदीकाठी राहणार्‍या आदिवासींनी होऊ घातलेल्या धरणाला ठाम विरोध केला आहे. पैसा दिला तरी जगणे होणार नाही शिटीत. आम्ही जंगलात राहणारे… शहरात कसं जगू.. दिवस कसं निघतील, असा प्रश्न येथील आदिवासींनी उपस्थित केला आहे. दुष्काळापेक्षाही होऊ घातलेल्या धरणाने आदिवासींच्या डोळ्यांत अश्रू आणले आहेत.

पार नदीपासून हाकेच्या अंतरावर वसलेले झरी हे पिटूकलेसे गाव. जेमतेम 75 कुटुंब व दीडशे-दोनशे लोकसंख्येची वस्ती. नेहमीप्रमाणे येथे शासकीय योजना कागदावर पोहोचलेल्या. इतरत्र दुष्काळी परिस्थिती असली तरी गावातील एका विहिरीला पाणी, तर तेथून दोन-तीन फर्लांग अंतरावर असलेली दुसरी विहीर मात्र कोरडीठाक असा टोकाचा विरोधाभास. पावसाळ्यात भात लागवड करायची.

रोजगारासाठी वर्षातील इतर दिवस दुसर्‍या तालुक्यात जाऊन इतरांच्या शेतावर राबायचे. गावातील तरणीबांड पोरं काही महिने कंपन्यांमध्ये कामाला जातात, असा हा एकूणच गावगाडा चालतो.

शहरी सुखसुविधांपासून कोसो दूर असलेले येथील आदिवासी आता मात्र काहीसे चिंतातूर आहेत ते येथे नार-पार धरण होणार अशी कुजबूज कानी पडल्याने. धरण म्हटले की जमिनी जाणार. बरोबरच गावावरही नांगर फिरणार हे त्यांना वेगळे सांगायची गरज नाही.

झरी गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर नार आणि पार या दोन्ही नद्यांचा संगम होतो. पुढे ही नदी नार-पार म्हणून गुजरातकडे जाते. या नदीवर धरण बांधून पाणी अडवायचे यावर जोरदार काम सुरू आहे. हे पाणी बागलाण, मालेगावसह उत्तर महाराष्ट्रात लिफ्ट करून हा भाग सुजलाम् सुफलाम् करायचा, अशी शासनाची योजना आहे. साहेब लोक येऊन पाहणी करून गेले आहेत.

या घडामोडींमुळे मात्र झरी गावकर्‍यांच्या उरात धडकी भरली आहे. धरणामुळे अख्खे गावच पाण्याखाली जाणार. पहिली जलसमाधी झरी गावाला मिळणार. जिथे माणसे उरणार नाही तेथे संस्कृतीचे काय घेऊन बसलात, अशी प्रतिक्रिया देताना आदिवासी संतप्त होतात.

जमिनी आम्ही देयच्या कशासाठी तर शहरातील लोकांना पाणी देण्यासाठी. आमचं नुकसान… फायदा त्यांचा हे यापुढे चालणार नाही.. असा संताप व्यक्त करताना हळूहळू त्यांचा आवाज कातरतो… आज दुष्काळ ही त्यांच्यासाठी समस्या नाही. धरणासाठी जमीन जाणार हा त्यांच्यासाठी मोठा आघात ठरतोय. शासनाने ठरवले तर जमीन घेणारच ही धास्ती त्यांना सतावत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!