Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Ground Report : दुष्काळाने बदलले महिला अन् तरुणाईचे जीवन

Share

मालेगाव/बागलाण । जितेंद्र सपकाळे

पाणी म्हणजे जीवन. जगण्यासाठी पाणी तर हवेच मात्र हंडाभर पाण्यासाठी महिला आणि तरुणाई मती होते गुंग. अख्खा दिवस पाणी आणि पाण्याचीच चिंता…. हाता-तोंडाची गाठ पाडायची तर पाणी लागणारच.. विहिरी कोरड्याठाक, हातपंप कोरडे… टँकर येते मात्र तेही 15 ते 20 दिवसांनी…विकत घ्यावे म्हटले तर तुटपुंज्या कमाईत पाण्यावर खर्च करताना दुहेरी होरपळ.. पाणी आणि पाणी आणि फक्त पाणी. मात्र हे दुर्भिक्ष्य क्षमवतांना महिलांचा आरोग्याचा प्रश्न तर तरण्याबांड तरुणाईची ऊर्जा केवळ पाणीप्रश्न सोडवण्यात जात असल्याचे विदारक चित्र मालेगाव तालुक्यातील गाव-पाडयावर दिसत आहे. दुष्काळामुळे महिलावर्ग अन् तरुणाईचे जीवन होरपळून निघाल्याचे चित्र आहे.

मालेगावपासून 8 किमी अंतरावर वसलेले मेहुणे, ज्वार्डी बु. आणि सटाणा तालुक्यातील चौगावात दुष्काळाच्या झळांनी गावकर्‍यांचे जीवन झोकाळून टाकले आहे. विहिरी आटल्या, जलस्तर 300 फूट खोल गेलेला. गावातील लोकांना सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय कुठलाच मोठा प्रश्न दिसत नाही.

महिला आणि तरुणाईचा संपूर्ण दिवस दूरवरुन पाणी आणण्यात खर्ची पडत आहे. नाही म्हणायला सरकारी टॅकर येता मात्र तोही 15 दिवसांनी. मात्र त्यातील पाणी किती लोकांना पुरणार. गावकर्‍यांच्या नशिबी विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्यांय नाही. पाण्याचे जारसाठी 40 रुपये मोजावे लागतात.

त्याचा साठा करुन ठेवला तर त्यात चार-पाच दिवसात अळ्या पडतात. असे अळ्यायुक्त पाणी प्यायल्याने लहान मुलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते, अशी माहिती एका महिलेने दिली.

दुष्काळामुळे तुम्हाला काय सहन करावे लागत आहे असे विचारताच पुनाबाई देवरे या 55 वर्षीय महिलेने डोळ्यात पाणी आणत सांगितले, आमच्या 56 खेडी योजनेतून 15 दिवसांतून एकदाच टँकर मिळतो. 50 रुपयांना छोटा पाण्याचा ड्रम विकत घ्यावा लागतो. हे परवड नसल्याने खांद्यावर पाणी वाहून आणतो.

त्यामुळे मला खांदे, पाठदुखीचा आजार लागला आहे. देवरे कुटुंबियांसह येथील अनेक परिवारातील सर्व सदस्यांना पाणी वाहून आणण्यासाठी अख्खा दिवस झिजवावा लागतो.

युवावर्गांची कहाणी करुण आहे. दुष्काळाने त्याचे करियर बरबाद होत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ही गावे भीषण दुष्काळाला सामोरे जात आहेत. त्यामुळे येथील तरुणाईची ऊर्जा केवळ पाणी वाहून आणण्यासाठी खर्ची होते. परिणामी त्याचें अभ्यासातील लक्ष पूर्ण उडाले आहे. त्यामुळे शिक्षणावर मोठा परिणाम होत असल्याचे येथील युवक सांगतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!