नाट्य परीक्षण : आयुष्याचीच शोकांतिका – अखेरची रात्र

0

कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला… हा वाद मराठी साहित्यात निर्माण होऊन बरीच वर्षे झाली. मात्र, त्यावर ठोस असा उतारा कोणाही विचारवंताला काढता आलेला नाही. बहुतांश वेळा कला जीवनाला महत्त्वाची गणली जाणारी व्यक्ती खासगी जीवनात अपयशी होते. कलेशी तादात्म्य साधल्याने, तिच्यात विरघळून गेल्याने तसे होत असावे. नाही तर या व्यवहारी जगाचे कायदेकानून त्यांना नसावेत. नाही, नसतातच. नियमांच्या चौकटीत बांधून घेणं त्यांना हरगीज पसंत नसतं. म्हणून मग त्यांच्या आयुष्याचीच शोकांतिका होऊन बसते. अनेक मनस्वी कलाकारांच्या वाट्याला हे असे भोग आलेत…. अखेरची रात्र या नाटकाने ते पुन्हा अधोरेखित केलं.

नगरच्या सप्तरंग थिएटर्सने राज्य नाट्य स्पर्धेत दुसर्‍या दिवशी नगर केंद्रावर हिंदी चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या जीवनावर अखेरची रात्र हे नाटक ताकदीने सादर केलं. अफलातून अभिनय, नेटके नेपथ्य आणि प्रकाशयोजना, तेवढ्याच तोलामोलाची संहिता, संवादात असलेल्या ताकदीच्या जोरावर गुरुदत्तची शोकात्मिका सप्तरंगच्या कलाकारांनी रसिकांसमोर अलवारपणे मांडली.
कलाजीवनात यशस्वी ठरलेला गरुदत्त वैवाहिक जीवनात अपयशी ठरला. पत्नी गीता दत्त आणि प्रेयसी वहिदा रहेमान या दोघांच्या हव्यासात त्याची पूर्ण वाताहत झाली. प्रेयसीवर अतोनात प्रेम आहे पण पत्नीच्या प्रेमाचा बंध दुसरे लग्न करू देत नाही. अशा कचाट्यात सापडलेल्या गुरुदत्तची ही कहाणी असली तरी प्रतीकात्मक. ती सत्तरीच्या दशकातील कथा असली तरी बहुतांशी घरांमध्ये आज मियाँ बिबी और वो असे चित्र आहे. पूर्वी प्रेयसीला रखेल हा शब्द होता.
आता तो फ्रेंड, लीव्ह अँड रिलेशनशीप अशा नव्या नात्यात आलाय. समाजाची थोडी बहुत स्थिती बदलली असली तरी नैतिकतेच्या प्रश्‍नाचा अजून निकाल लागलेला नाही. जोपर्यंत हा प्रश्‍न धसास लागणार नाही तोपर्यंत गुरुदत्तसारखे खून होतच राहतील. खरे तर गुरुदत्त या नाटकात आत्महत्या करतो. परंतु ती आत्महत्या नसून कुटुंब व्यवस्था नावाच्या सिस्टिमने केलेला तो खूनच आहे. कुटुंब व्यवस्था हाच आपल्या भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ असला तरी नव्या संरचनेची आवश्यकता असल्याचा संदेश या नाट्यकृतीला द्यायचा आहे. सप्तरंग ही नावाजलेली संस्था.
गेल्या तीस वर्षांत राज्य पातळीवरही या संस्थेच्या नाट्यकृतीने बक्षीस पटकावून नगरचे नाव उंचावलेय. लक्ष्मीकांत देशमुख लिखित अखेरची रात्र या नाटकाची संहिता तशी जोखमीची आहे. ती नीटनेटकी सादर झाली तर ठीक, नाही तर फज्जा उडाल्याशिवाय राहत नाही. परंतु कल्पक दिग्दर्शक श्याम शिंदे यांनी तसे कुठेही तसे घडू दिले नाही. प्रा. रवींद्र काळे यांनी साकारलेला गुरुदत्त अप्रतीम. जणू ते ही भूमिकाच जगताहेत असे वाटले. हिंदी, मराठी संवादही त्यांच्यासह सर्वच कलाकारांनी सुंदररीत्या सादर केले. काही ठिकाणी हिंदी संवादाला नगरी मराठीची ढब होती इतकेच. परंतु ते तीट लागण्यासारखं. मुख्य नायक पात्र काळे यांचे असल्याने सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. ती त्यांनी समर्थपणे पेलली. एक दुःखात बुडालेला नट, एक अस्वस्थ पण लाघवी माणूस, प्रियकर, पती साकार करण्यात ते कुठेही कमी पडले नाहीत.
गुरुदत्तच्या जीवनात प्रेरणा ही गायिका असलेली पत्नी आहे. ती त्याची प्रेरणा आहे. दोघांचे लव्ह मॅरेज पण त्यांच्या आयुष्यात प्रतिभा येते. तेव्हापासून त्यांच्या सहजीवनात वादळ येते आणि गुरुदत्तचा जीव घेऊनच ते शमते. दोन प्रतिभावंत स्त्रिया मिळवताना त्याची झालेली ससेहोलपट खरोखर मनाला चुरका लावून जाते. काळे यांनी ती तडफेने भूमिका वठवली. गुरूची बायको प्रेरणा अनघा पंडित यांनी साकारली. खरोखर एक प्रतिभावंत नटाची बायको कशी असावी, अगदी तशीच भूमिका अनघा यांनी केली. त्यांच्या वाट्याला आलेले संवादही त्यांनी ताकदीने म्हटले.
अभिनयात त्या कुठेही कमी पडल्या नाहीत. त्यांच्या जोडीला होती आकांक्षा शिंदे. तीही तशीच मुरब्बी. जणू दोघींमध्ये जुगलबंदीच रंगली. त्यात अर्थात अनघा उजवी वाटली असली तरी आकांक्षाच्या वाट्याला ही भूमिका ऐनवेळी आली होती. आणि तिच्या वयापेक्षा कितीतरी मोठ्या स्त्री पात्राची तिने भूमिका केली. परंतु ती कुठेही न्यून वाटली नाही. तिचा मंचावरील वावरही निर्भीड होता. एका कसलेल्या कलाकाराचे हे लक्षण.
सुनील तरटेही अनेक वर्षांपासून रंगमंचावर वावरतात. त्यांची भूमिकाही समर्पक अशीच झाली. खरे तर या नाट्यकृतीतील समन्वयक पात्र. ती जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या पेलली. मात्र, एक-दोन प्रसंगांत त्यांच्याकडून गफलती झाल्या. प्रेरणाला प्रतिभा म्हणणे वगैरे. परंतु त्यांनी ते आपण चुकल्याचे जाणवू दिले नाही. चाणाक्ष प्रेक्षकांच्या नजरेतून ते सुटले नाही.
एकंदर चौघांनी अभिनय कौशल्याच्या जोरावर ही कलाकृती अप्रतीम रंगवत नेली. खरे तर दिग्दर्शक प्रा. श्याम शिंदे यांच्या दिग्दर्शनाची ही कमाल. प्रसंगानुरूप वापरलेली लाईट, तेवढेच काळाशी साजेसे नेपथ्य, वेशभूषा. या सर्व गोष्टींमुळे ही कलाकृती छान जमली. नाटकातील सर्व साहित्य, वस्तू सत्तरीच्या काळाशी सुसंगत होत्या. मात्र, मध्यांतरानंतर शुटिंगवेळी आलेली खुर्ची मात्र 21व्या शतकातील होती. तिचे मॉडर्नपण खटकले. पहिल्याच प्रसंगात अब्बास, प्रेरणा आणि प्रतिभाचे संवाद फारच हळू आवाजात होते. ते शेवटच्या खुर्चीपर्यंत जाऊ द्या, मध्यभागी बसलेल्या रसिकांच्याही कानापर्यंत जात नव्हते. मात्र, या त्रुटी दूर करता येण्यासारख्या. नाटक रंगात आलेले असताना दोनदा लाईट गेल्याने आणि रसिकांच्या मोबाईलच्या आवाजाने रंगभंग केला. समन्वयक सागर मेहेत्रे यांनी वारंवार सूचना देऊनही ते सुरूच होते. हा नगरकरांचा अरसिकपणा दुसरे काय?
नेपथ्य -हेमंत कुलकर्णी, शंभूराजे घोलप, प्रकाश योजना-बिपीन काजळे, पार्श्‍वसंगीत-रवींद्र वाणी, शुभांगी ओहोळ, शिवम तुपचे, रंगभूषा-अंजना पंडित, सोनल काळे, रंगमंच व्यवस्था-सुधीर देशपांडे, मयूर खोत, दीपक ओहळ, हेमंत लोखंडे, कुंदा शिंदे, दत्ता पवार, निखिल बनसोडे यांनी आपापल्या जबाबदार्‍या नेटकेपणाने केल्याने नाटक रंगले. ही नाट्यकृती चाळीस-पन्नास वर्षे जुनी आहे. संदर्भ जुने असले तरी ते कालातीत आहेत. म्हणूनच मग ती कलाकृती आजच्या काळाशी नाते सांगते. सप्तरंगच्या कलाकारांनी खरोखर आपल्या अभिनय रंगांची उधळण केल्याने ती प्रत्येकाला भावते.

LEAVE A REPLY

*